Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

अग्रलेख

वातावरणातला ‘व्हायरस’!

 

पुणे शहरात शाळा आणि महाविद्यालये ‘स्वाईन फ्लू’मुळे सलग सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे. चित्रपटगृहे आणि मॉल्सही तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. हा निर्णय चांगला असला तरी त्याने भयग्रस्तताही वाढता कामा नये. ‘स्वाईन फ्लू’ने पुणे, मुंबई, अहमदाबाद या शहरांबरोबरच आता चेन्नई शहरातही प्रवेश केला आहे. या चारही ठिकाणी ‘स्वाईन फ्लू’चे बळी पडले आहेत. चेन्नई शहरात सर्वाधिक काळजी घेतली जाऊनही तिथे काल एका चार वर्षांच्या मुलाचा बळी पडला आहे. पुणे शहरात सध्या वातावरणातच ‘विषाणूं’नी एवढी गर्दी केली आहे की, त्यांचे काय करायचे, असा प्रश्न आहे. या विषाणूंमध्ये राजकीय जिवाणूंनीही भर घातली आहे. पुणे शहरातल्या शाळा बंद केल्या तर आकाश कोसळणार आहे काय, म्हणणाऱ्यांनी आपल्या पक्षातर्फे १०-१२ हजारांचे मोर्चे काढून आपल्या शक्तीचे प्रदर्शन मांडले आहे. सरकारला बेजबाबदार म्हणायचा यांना अधिकार आहे, तो असायलाही हवा; पण मग यांच्या बेजबाबदारीचे काय? त्यांच्या मोच्र्यात सहभागी असणाऱ्यांपैकी कुणाला उद्या ‘स्वाईन फ्लू’ झाला, तर त्याची जबाबदारी मोच्र्याची नेतेमंडळी घेणार आहेत काय, हा प्रश्न आहे. त्यांच्या मोच्र्यात नेत्यांखेरीजची जी काही शहाणी मंडळी होती, त्यांनी निदान तोंडावर ‘मास्क’ घालायची खबरदारी तरी घेतली होती. शाळा बंद ठेवायची जबाबदारी आपलीही आहे, असे वाटणाऱ्या पुणेरी रिक्षावाल्यांनी आपण यापुढे मुलांना शाळेत नेणार नाही, अशी धमकी द्यायचा उद्योग करून पाहिला आहे. एकेका रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवणारे, स्टेशन वा एसटी स्टँडवर गिऱ्हाईक नाकारणार आहेत काय? शाळा बंद करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, असेच काही पुढाऱ्यांना वाटत असल्याने त्यांनीही आयत्या पिठावर आपल्या रेघोटय़ा ओढायला मागेपुढे पाहिलेले नाही. काही नेत्यांना प्रसिद्धीची एवढी हाव की, त्यांनी त्या फ्लूप्रमाणेच रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली फलकांवर आपल्या छबीसह क्रमांकवार सल्ले दिले आहेत. त्यांनी डॉक्टरांची बैठक बोलावून काही उपाययोजनांची चर्चा केली असती आणि काही ठाम सूचना केल्या असत्या, तर त्या अधिक उपयुक्त ठरल्या असत्या. आरोग्याधिकारी, सरकारी अधिकारी आणि एकूणच प्रशासन यांना नेमके काय करायला हवे, तेच बहुधा कळले नसावे. एखादा संशयित रुग्ण आधी खासगी दवाखान्यात वा डॉक्टरकडे का जातो, तर त्याला शासकीय रुग्णालयांविषयी खात्री वाटत नाही, उलट तो अधिक भयग्रस्त होत असतो. यातून कुणीच कुणाचा वाली नाही, अशी अवस्था निर्माण होते. हल्ली काही राजकीय पक्ष आपल्याकडे ‘वैद्यकीय सेल’ असल्याचे मोठय़ा अभिमानाने सांगत असतात. काही पक्षांना अशा सेलची आवश्यकताच वाटत नाही, पण ज्यांच्याकडे हे ‘सेल’ आहेत, त्यांनी ‘स्वाईन फ्लू’बद्दल काय केले किंवा साधी जागृती तरी केली का, असे विचारले तर उत्तर नकारात्मक मिळते. त्यांना आपल्या ‘सेल’च्या उद्घाटनाचा सोहळा हवा असतो. मोठा नेता आला आणि भपकेबाज भाषणे केली की, आपली वर्णी कुठे तरी नक्कीच, ही त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे त्याही अंगाने बोंब आहे. थोडक्यात आज पुणे शहराला कुणी वाली उरलेला नाही. पुणे शहराचीच एक मोठी कचराकुंडी बनलेली आहे. गर्दीची ठिकाणे शक्यतो टाळायला हवीत, असे म्हणावे, तर मुंबईत उपनगरी गाडय़ांचा प्रवास टाळता येणार आहे का? नेमके हेच मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. एकमेकांच्या अंगाला खेटून आणि जमल्यास एका पायावरच उभे राहायची कसरत करणाऱ्या लोकल प्रवाशांची काळजी आहे कुणाला? ते आपले बिचारे कसाबसा जीव मुठीत धरून कामाला जातात आणि संध्याकाळी हातापायांना बोलके करीत घरी परततात. त्यांना कामाला जाऊ नका, असे सांगता येणे शक्य तरी आहे का? सरकार काही करीत नाही, हे सांगणे ही आजची फॅशन आहे. आम्ही नागरिक म्हणून काय जबाबदारी पार पाडतो, याचे आत्मनिरीक्षण व्हायला हवे. रोगराईचा संबंध हा प्रामुख्याने स्वच्छतेशी आहे. आपण आपल्या घरातला कचरा शेजारी टाकून मोकळे होतो, तेव्हा आपण शेजारचे अनारोग्य मागल्या दाराने आपल्या घरात घेत असतो, हे कुणी ध्यानात घेत नाही. म्हणूनच हा प्रश्न एवढा गंभीर बनला आहे. स्वच्छता ज्याचे घरी, आरोग्य तेथे वास करी, हे म्हणणे बहुतेकांनी स्वत:च्या घरापुरते मर्यादित केल्याने बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. नदीत सांडपाणी सोडून नामानिराळय़ा होणाऱ्या नगर परिषदा आणि महापालिका यांना आजवर जाब विचारला गेलेला नाही. प्रदूषण मंडळाच्या नोटिशींना कचऱ्याची टोपली दाखवणाऱ्यांना कधीही खडसावले गेलेले नाही आणि त्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींना तुरुंग दाखवलेला नाही, त्यातून साऱ्या रोगराईच्या गोष्टी बोकाळल्या आहेत. ‘स्वाईन फ्लू’ पसरला म्हणून आता हातपाय आपटणे चालू झाले आहे. ‘स्वाईन फ्लू’ हा एका अर्थाने ‘नॉर्थ अमेरिकन फ्लू’ म्हणून ओळखला जातो. १९७५-७६ मध्ये अमेरिकेत न्यू जर्सी ते पेन्सिल्व्हानिया या दरम्यान या फ्लूने धुमाकूळ घातला होता. ‘गलियन बेरी सिन्ड्रोम’ने बाधित किमान ५०० जणांवर तेव्हा उपचार चालू होते. अमेरिकेत त्यावेळी लसीकरणाची मोठी मोहीम उघडली गेली. जनतेने त्यास प्रतिसाद द्यावा म्हणून अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष गेराल्ड फोर्ड यांनी टीव्ही कॅमेरामन आणि पत्रकारांना ‘व्हाइट हाऊस’वर पाचारण करून त्यांच्यासमक्ष फ्लूची लस टोचून घेतली होती. सर्वाना प्रोत्साहन मिळावे आणि लसीकरणाचे उद्दिष्ट पुरे व्हावे म्हणून त्यांनी हे केले होते. लसीकरणाचा तेव्हा अतिरेक झाला आणि त्यातच २५ जणांचे प्राण गेले. अमेरिकेतला हा फ्लू थोडय़ा काळाने मागे पडला आणि आता जेव्हा औषध कंपन्यांकडे फ्लूच्या लसीविषयी विचारणा करण्यात आली, तेव्हा त्या कंपन्यांनी या लसीमध्ये फायद्याचे प्रमाण फारच अल्प आहे आणि आम्ही घातलेला पैसाही त्यातून भरून निघू शकत नाही, असे सांगून कानावर हात ठेवले. औषध कंपन्यांची ही बेजबाबदारी खपवून घेतली गेली नसती, तर आज कदाचित वेगळे चित्र दिसले असते. १९१८ मध्ये ‘स्पॅनिश फ्लू’ने आठ कोटी जनतेला प्राण गमवावे लागले, असे आपण म्हणतो, तेव्हा १९७६ मध्ये त्या मानाने फार जणांना मृत्यूने घेरले नाही, हे सांगायला आपण विसरता कामा नये. राजकीय कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलपाशी गर्दी करू नये, हे अजित पवारांनी केवळ गोपीनाथ मुंडे आणि त्यांची राजकीय पिलावळ यांना उद्देशूनच म्हटलेले नाही. परवा मुंडे तिथे होते, पण बरेच राजकीय कार्यकर्ते नेतेगिरी करायला तिथे मुक्काम ठोकूनच असतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या बातम्यांमध्ये आपण दिसलो तर ते त्यांना हवे असते. हे विचित्र वाटले तरी ती वस्तुस्थिती आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती पाहून आपला ‘शिवसंवाद दौरा’ आटोपता घेतला ही बाब राजकीय पोक्तपणाची आहे. आपल्याकडेही काही गोष्टी सामोपचाराने, तर काही सक्तीने म्हणजेच कायद्याने केल्या जायला हव्यात. ‘स्वाईन फ्लू’चा धोका तीव्र आहे आणि या दरम्यानच आता आधी गोकुळाष्टमीच्या पारण्याला गोविंदा वाजत गाजत येणार आहेत आणि त्यानंतर गणेशचतुर्थीपासून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यांचे काय करायचे, ते पवारांनी सांगितलेले नाही. दही-हंडी कमी उंचीवर बांधणे आणि त्यासाठी कमी बक्षीस लावणे हे उपाय असले तरी नागरिकांनी तिकडे न फिरकणे हा उपाय अधिक नामी होय. काही मंडळांनी आपण होऊन दही-हंडीचा कार्यक्रम रद्द केला आहे. त्याचे स्वागत व्हायला हवे. एरवी कुणी काही म्हटले तरी हे उत्सव धूमधडाक्यात साजरे होत असतात. यंदा दुष्काळ आणि ‘स्वाईन फ्लू’ हे १८९७-९८ च्या दुष्काळ आणि प्लेग यांच्यासारखेच हातात हात घालून आले आहेत. दुष्काळाचा बंदोबस्त वेगळय़ा मार्गाने होईल, पण ‘स्वाईन फ्लू’चे काय, असा प्रश्न उरतोच. त्यासाठी वातावरणात शिरलेला हा ‘व्हायरस’ दूर केला जायलाच हवा, अन्यथा यापुढला काळ आणखी कठीण आहे.