Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

डिस्कव्हरी वाहिनीवर ‘सव्‍‌र्हायव्हरमॅन’
डिस्कव्हरी वाहिनीवर ‘सव्‍‌र्हायव्हरमॅन’ ही नवी मालिका सुरू झाली आहे. वाइल्डरनेस सव्‍‌र्हायव्हल तज्ज्ञ आणि चित्रपटनिर्माते लेस ‘सव्‍‌र्हायव्हरमॅन’स्ट्रॉड हे स्वत:च जगभरातील विविध निर्जन ठिकाणी जाणार आहेत. जिथे अन्न, पाणी नाही तिथे ते सात दिवस राहणार आहेत. निसर्गवेडे लेस स्ट्रॉड या मालिकेद्वारे प्रतिकूल परिस्तिथीत तग धरण्याची प्रश्नत्यक्षिके दाखवणार आहेत. प्रतिकूल नैसर्गिक वातावरणात सात दिवस राहण्याची किमया कशी घडते ते पाहणे खचितच उत्कंठावर्धक ठरेल. लेस स्ट्रॉड येत्या गुरुवारी रात्री ९ वाजता दाखविण्यात येणाऱ्या भागात विमानातून कॅनेडियन रॉकीज या बर्फाच्छादित खडकाळ व डोंगराळ प्रदेशात उतरणार आहेत. शुद्ध पाणी, निवारा आणि अन्न यांचा अभाव असलेल्या या प्रदेशात स्ट्रॉड सात दिवस कसे राहिले ते पाहायला मिळेल. स्वत: अवजड कॅमेरा घेऊन स्ट्रॉड यांनी चित्रण केले आहे. चित्तथरारक आणि प्रतिकूल परिस्थितीशी कठोर संघर्ष करत जगण्याची इच्छा याचे दर्शन या मालिकेद्वारे घडणार आहे.

कमाल अभियांत्रिकीची
डिस्कव्हरीच्या अफलातून कार्यक्रमांमध्ये रविवारी रात्री ८ वाजता ‘एक्स्ट्रीम इंजिनीअरिंग’मध्ये जगातील सर्वाधिक उंच इमारतीचे बांधकाम कसे सुरू आहे ते पाहायला मिळेल. उत्तर युरोपात स्कायस्क्रॅपर इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. ६०० फूट उंचावर या इमारतीचा शेवटचा मजला आहे. हवामानाचे आव्हान पेलत या इमारतीचे बांधकाम कसे केले जात आहे याचे चित्रण ‘एक्स्ट्रीम इंजिनीअरिंग’ कार्यक्रमात पाहता येईल.

‘स्वप्न एका घराचे’
आता ई टीव्ही मराठी वाहिनीवरही प्रश्नॅपर्टीविषयक मार्गदर्शन करणारा कार्यक्रम सुरू झाला आहे. दर रविवारी सकाळी ९ वाजता दाखविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात विविध ठिकाणी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती सांगत त्या जागा दाखविण्यात येतील. सुनील खेडेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनश्री देशपांडे, शंतनु मोघे, रुपाली मोडक यांनी केले आहे. फ्लॅट्स, बंगले यांची माहिती देण्याबरोबरच रिअल इस्टेट व्यवसाय, गृहसजावट, फर्निचर, वास्तूशास्त्र, वास्तूरचना, प्रश्नॅपटीसंदर्भातील वकिलांचा सल्ला असे विविध विभाग यात आहेत. घरबसल्या गृहसजावट आणि घर घेण्याचे ठरविणाऱ्यांसाठी कर्जविषयक सल्ला मिळण्याची सोय या कार्यक्रमामुळे उपलब्ध होऊ शकेल.

कृष्णं वंदे जगद्गुरू..
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्याप्रमाणेच देशवासियांच्या मनामनांत घर केलेला दुसरा आदर्श पुरुष म्हणून जगद्गुरू श्रीकृष्णाचे वर्णन करावे लागते. विचित्र परिस्थितीत झालेला त्याचा जन्म, त्याचे रोमांचकारी बालपण, तरुणवयात स्थापलेली द्वारका नगरी आणि नंतर कौरव-पांडव वादामध्ये पांडवांच्या बाजूने युद्धात उतरलेला धुरंधर सेनानी आणि शेवटी स्वत:चे यादवकुळ वाचविण्यात आलेले अपयश या सर्व घडामोडींमधून एका नायकाला लागणारे जीवन त्याला मिळतेच. पण त्यातही अर्जुनाला त्याने केलेला गीतोपदेश, त्याच्या बासरीचे सूर आणि संगीतातील त्याची स्वत:ची निर्मिती आणि प्रत्येक नात्यामध्ये आदर्श होण्यासाठी त्याने केलेला जीवनसंघर्ष हे सर्वच त्याला जगद्गुरू बनविण्यासाठी अलौकिक असते. महाराष्ट्रात आता दोन ते तीन दिवसांनंतर जन्माष्टमी साजरी होईल. दहीहंडीचा खेळ उत्तरेत विकसित न होता महाराष्ट्रात विकसित झाला हे आणखी एक आश्चर्य..भावगीतांच्या महाराष्ट्रातील सुवर्णयुगातही सर्वाधिक संख्येने कृष्णलीलांवर आधारित गीते निर्माण झाली, हे आणखी या मराठी मुलुखाचे वैशिष्टय़ मानावे लागेल. यंदाच्या कृष्णजन्माष्टमीनिमित्त फार काही नवीन दिसत नसले तरी टाइम्स म्युझिक कंपनीने चार नवे संग्रह दाखल केले आहेत. मराठी भावगीतांच्या गायनातून पुढे आलेल्या गायिका संजीवनी भेलांडे हिचा संत मीराबाईच्या गाजलेल्या रचनांवरील अल्बम वेगळा मानावा लागेल. हरिप्रसाद चौरसिया यांचे पुत्र राकेश चौरसिया यांच्या बासरी वादनाचा संग्रहही चांगला आहे. भजनसम्राट अनुप जलोटा यांचे कृष्ण नामसंकिर्तन जोडीला आहे व अनुराधा पौडवाल आणि साधना सरगम यांनी कृष्णलीलांच्या पारंपरिक रचना सादर केल्या आहेत. हे चारही संग्रह सांगितिक गुणवत्तेच्या दृष्टीने चांगले असून जन्माष्टमीच्या सोहळ्यानिमित्त त्यांची खास दखल घ्यावी लागते.
मीरा और मै-संजीवनी भेलांडे
मराठी भावगीत गायनाच्या माध्यमातून नावारुपाला आलेली गायिका म्हणून संजीवनी भेलांडे यांची मराठी रसिक जनाला ओळख आहे. या संग्रहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे भेलांडे यांनी संत मीराबाईंच्या रचना पूर्णपणे नव्या ढंगात आणि आपल्या स्वत:च्या अवतारात गाण्याचा प्रयत्न येथे केला आहे. हा एक वेगळा प्रयोग आहे. ‘पायो जी मैने राम रतन धन पायो’, ‘चाला वाही देस’, ‘म्हारो प्रणाम’ आणि ‘होरी, पिया बिन लगा री खारी’ या चार रचना सोडल्या तर इतर रचना तिने वेगळ्या मूडमध्ये गाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये संगीतकार बंकिम, कैलाश खेर आणि मराठीतील ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांची तिने मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे. ‘मेरे तो गिरिधर गोपाल, दुसरो ना कोई’ ही पारंपरिक रचना तिने स्वतंत्र ढंगात गायली आहे. ‘बरसे बदरिया सावन की, सावन की मनभावन की’ ही रचना हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतात लतादीदींनीच अत्यंत सुरेख गायली आहे. पण इथे त्याची चाल पुन्हा स्वतंत्र आहे. ‘सांवरिया के रंग रची’ ही सुरेश वाडकर यांची रचना तिने इथे वेगळ्या मूडमध्ये पेश केली आहे. याबाबत वाडकरांनी केलेल्या सहकार्याचा ती आपल्या संग्रहात कृतज्ञतापूर्वक उल्लेख करते. संत मीराबाईच्या रचना सध्याच्या आधुनिक काळातील तरुणाईलाही साद घालाव्यात अशी तिची प्रश्नमाणिक इच्छा आहे. संगीताच्या मूळ ढाच्यामध्ये फार फरक न करता तिने यात आधुनिक बाज आणण्याचा प्रयत्न केला आहे. या रचना लोकांना कितपत आवडू शकतील, याचे उत्तर काळच देईल. पण एक वेगळा संग्रह रसिकांसमोर आणण्याचा टाइम्स म्युझिकने यातून प्रयत्न केला आहे, एवढे नक्की. खरे तर पहिला मोगल बादशहा बाबर याला टक्कर देणाऱ्या राणा संग्रामसिंग याची सून म्हणून मीराबाईचे जीवन मध्ययुगीन भारतात सामोरे येते. राणा हमीरदेवची पत्नी असलेल्या मीराबाईने कृष्णालाच आपले जीवन अर्पण केले व राजपूत राजघराण्यात बंडखोरी केली. तिच्या रचनांमधून तिची व्यक्त होणारी तळमळ आणि राजस्थानी भाषा असूनही तिच्या रचना सर्वसामान्य भारतीयाच्या मनात करीत असलेल्या घर पाहून मीरा हा शतकानुशतके अभ्यासकांचा मोठा विषय राहिला आहे, यांत शंका नाही. लतादीदींनी जी मीराबाईंची गीते गायली त्याने प्रेरित होऊनच या संग्रहाची निर्मिती झाली आहे. पण काहीतरी वेगळे देण्याचा टाइम्स म्युझिकने जरूर प्रयत्न केला आहे.
श्रीकृष्ण शरणम्
या टाइम्स म्युझिकच्याच संग्रहात ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल आणि साधना सरगम यांनी ‘गोपी गीत’ आणि ‘दामोदर अष्टकम’ या पारंपरिक रचना सादर केल्या आहेत. पैकी अनुराधा पौडवाल यांची रचना ब्रज भाषेत आहे तर दामोदर अष्टकम संस्कृतात आहे. गोपी आणि श्रीकृष्णाच्या रासक्रीडेवर आधारित हे गोपी गीत असून गोपींची कृष्णाप्रती असलेली अनन्यसाधारण भक्ती आणि प्रेमभावना यातून व्यक्त होतात. एकदा यमुनाकिनारी खेळत असताना कृष्ण अचानक गायब होतो, या गोपी त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात, पण तो कुठेही सापडत नाही. शेवटी त्या राधेला आपले साकडे घालतात असा गोपी गीताचा आशय आहे. संगीतकार जे. एस. आर. मधुकर यांनी सतार, संतूर आणि बासरी या वाद्यांचा सुरेख मेळ घालून ही ब्रज भाषेतील रचना खुलविण्याचा प्रयत्न केला आहे. अनुराधा पौडवाल यांनीही त्यासाठी चांगली मेहनत घेतली आहे. दामोदर व्रताचा महिमा कार्तिक महिन्यात सांगितला गेला आहे आणि कार्तिकात हे अष्टक साधकाने सातत्याने म्हणावे, असे सांगितले जाते. साधना सरगम यांनी ते येथे चांगल्या पध्दतीने साकार केले आहे.
द फ्ल्यूट ऑफ क्रिश्ना
ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे पुत्र राकेश चौरसिया यांनी या सीडीमध्ये बासरीवर राग हंसध्वनी खुलविला आहे. त्यांना तबल्यावर सत्यजित तळवलकर यांनी तर पखवाजवर पं. भवानी शंकर यांनी साथ केली आहे. मूळ बिलावल थाटाचा राग हंसध्वनी हा कर्नाटक संगीत शैलीतील वेगळा राग ओळखला जातो. आलाप, जोड आणि साध्या व द्रूत लयातील तीन तालाच्या गतमध्ये राकेश चौरसिया यांनी या सीडीत रंग भरले आहेत. टाइम्स म्युझिकनेच ही सीडी बाजारात आणली आहे.
गोविंद बोलो
भजन सम्राट अनुप जलोटा यांच्या आवाजातील गोविंद बोलो हरी गोपाल बोलो या नामसंकिर्तनाची ही सीडी आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने अर्थातच ती खास करून बाजारात आणण्यात आली आहे. सकाळ व सायंकाळच्या सुमारास घरात लावण्यासाठीही ही सीडी तशी उपयुक्त आहे. संत मीराबाईच्या आयुष्यावर ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन अशा अनुप जलोटा यांच्या आवाजातील भक्ती रचना प्रसिध्द आहेतच. येथे मात्र पारंपरिक कृष्णधून आहे. satpat2007@rediffmail.com