Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

लोकमानस

बळीराजाचा हवामानाचा अंदाज

 

पावसासंबंधीचे हवामान खात्याचे बहुतेक अंदाज चुकले, पण गावाकडच्या शेतकऱ्यांचे पावसाचे अंदाज अचूक कसे येतात? २० मे रोजी मी देवरुखजवळच्या निवे गावी होतो. त्या दिवशी संगमेश्वर तालुक्यामध्ये, तसेच मुंबई व ठाणे येथे पाऊस पडला होता. रात्री एका शेतकऱ्याच्या घरी टीव्हीवर, पावसाळा आठ दिवस लवकर सुरू होणार असल्याची बातमी पाहिली. मी त्यांना आघोटची कामे (पावसाळ्यापूर्वीची) पुरी झाली का, असे विचारले. मुंबईत आठ दिवस अगोदर पाऊस म्हणजे ३१ मे रोजी पडणार होता. याचा अर्थ कोकणात त्याही आधी तीन-चार दिवस. याला एक-दोन दिवसच उरलेले होते.
तेथे आणखीही पाच-सहा गाववाले होते. त्यांनी एकमुखाने पाऊस आणखी १५ दिवस तरी येत नाही, असे ठामपणे सांगितले. हवामान खात्याला सणसणीत कोंकणी शिव्या हासडल्या व पुन्हा पाऊस १५ दिवस येणार नसल्याचे सांगितले. त्याची कारणेही सांगितली की, १) अजून काजवे पुरेशा प्रमाणात झालेले नाहीत. २) फळे मोठय़ा प्रमाणात एकदम पिकायला हवीत. ती पिकलेली नाहीत. ३) मुंग्या व वाळवीला पंख फुटलेले नाहीत. ४) सरडय़ांची तोंडे लाल झालेली नाहीत. ५) बेडूक ओरडत नाहीत व त्यांचे आकारही बदललेले नाहीत. ते अद्याप थोराड दिसू लागलेले नाहीत ६) कावळे अजून घरटी बांधण्यासाठी काटक्या गोळा करत आहेत. पाऊस जवळ आला असेल तर एव्हाना त्यांची अंडी घालून व्हायला हवी होती. ७) विहिरींची व नद्यांची पाण्याची पातळी एकदम खाली गेलेली नाही.
निसर्गाप्रमाणे अनुभवी खेडुताचाही अंदाज असतो. पाऊस सुरू होण्यापूर्वी दोन-तीन दिवस आधी विहीर साफ करण्यासाठी माणूस विहिरीत उतरला, तर तेव्हा पाण्याची वाफ इतकी उष्ण असते की माणूस आत राहू शकत नाही. पण त्या दिवशी तर विहिरीत माणूस तासभर राहू शकत होता. म्हणजेच पाऊस जवळ आलेला नव्हता.
विशेष म्हणजे, आमच्या या संवादानंतर बरोबर १५ दिवसांनी, ४ जूनला तिकडे पाऊस सुरू झाला.
दत्तात्रय राजवाडे, ठाणे

हे तर स्वाईन फ्लूचे सेलिब्रेशन
दुष्काळ, स्वाईन फ्लूची जीवघेणी साथ, महागाई, अपुऱ्या विजेमुळे होणारी होरपळ अशा संकटांनी महाराष्ट्र घेरलेला असला तरी राजकीय नेते मात्र ढिम्म आहेत. या समस्यांचे सेलिब्रेशनच जणू तिकडे दिल्लीमध्ये सुरू असावे याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन, तसेच अनुभवी खासदार हे एका जेवणावळीत मग्न असल्याचे छायाचित्र नुकतेच काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले.
पुण्यापाठोपाठ मुंबई, नाशिक, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि ग्रामीण भागांतही या साथीने हातपाय पसरण्यास प्रारंभ केला आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना लोकप्रतिनिधी मात्र याबाबत जागरूक नसल्याचे दिसते. दिल्लीत जाण्याची संधी मिळालेले महाराष्ट्रातील नेते तर आता महाराष्ट्राशी आपले काहीएक देणेघेणे नसल्याच्या अविर्भावात वागत आहेत. राज्यात स्वाईन फ्लू पसरलेला असताना ही मंडळी दिल्लीत स्नेहभोजनाची मजा घेताना दिसत होते. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत महाराष्ट्रातील सहकारी खासदार, मंत्रिगणांना शाही स्नेहभोजन खिलविले त्या वेळी नव्या अनुभवी खासदार, तसेच मंत्र्यांनी आवर्जून हजेरी लावली.
तामिळनाडू राज्यातील नेत्यांनी आपल्या नागरिकांना महाराष्ट्रापासून दूर राहण्याचा सल्ला दिला असताना आपले नेतेमात्र नागरिकांपासून दूर गेले आहेत. हे नैतिकतेचे धिंडवडे आहेत. दुष्काळासह अन्य गंभीर समस्यांमुळे महाराष्ट्र जेरीला आलेला असताना महाराष्ट्रातील सर्वच पक्षांचे नेते आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.
या पाश्र्वभूमीवर येत्या १५ ऑगस्टला आपण आपला ६२ वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत. देशाने स्वातंत्र्याची अवघी साठी ओलांडली असली तरी आपल्या स्वार्थी राजकारण्यांनी देशाला वार्धक्याकडे नेऊन सोडले आहे.
सतीश कुलकर्णी, औरंगाबाद

कर नसेल तर डर कशाला?
सध्या तापलेला ‘वाडा’चा वाद वेगळाच सूर छेडत आहे. खरे तर याबद्दल वाद व्हायचे काही कारणच नाही. क्रिकेटचा ऑलिम्पिकसारख्या खेळात समावेश न होणे हे तर त्या मागचे कारण नाही ना? ‘वाडा’च्या कार्यामागील उद्देश चांगला आहे. कोणत्याही स्पर्धा उत्तेजकमुक्त व निरोगी व्हाव्यात, असे प्रत्येक खेळाडूला व क्रीडाप्रेमीला वाटत असते. त्यामुळे ‘वाडा’च्या नियमांना जगभरातील सर्व खेळांच्या सर्व प्रकारातील सर्व खेळाडूंनी होकार दिला आहे व ते तसे बांधील असतील असे करार करून मान्यही करतात. यात अनेक क्रिकेट खेळणाऱ्या देशांचाही समावेश आहे.
असे असताना भारतीय क्रिकेटपटूंनीच अडमुठेपणा का करावा? उत्तेजके घेऊन इतर प्रामाणिक खेळाडूंच्या फसवणुकीवर ‘वाडा’ संघटनेचा अंकुश बसवण्याबाबत कुणाची हरकत असण्याचे कारणच नाही. यात कुणा एकाचे वर्चस्व मान्य करण्याचा प्रश्नच नाही. तसेही क्रिकेटपटूंवर आयसीसी किंवा बीसीसीआयचे व इतर संबंधित नियामक मंडळांचे काही कमी र्निबध नसतात, त्यामुळे या ‘वाडा’च्या करारामुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला होण्याचा संबंध कुठेही येत नाही आणि भारतीय क्रिकेटपटूंना मुख्य म्हणजे कर नसेल तर (वा कर भरल्यावर) ‘वाडा’ची डर कशाला?
खेळाडूंना वाटणारी वैयक्तिक सुरक्षिततेची काळजी हास्यास्पद आहे. एक तर दर तीन महिन्यांनी व्हेअरअबाउटस् सांगितल्याने सर्व जण संपर्कात राहतील. त्यामुळे ‘पद्म पुरस्कारा’सारखे शासकीय महत्त्वाचे व प्रतिष्ठेचे अतिमहत्त्वाचे कार्यक्रम न टाळता प्रायोजकांच्या जाहिराती करण्यासाठी ‘वाडा’चीच काय पण बीसीसीआयचीही हरकत असण्याचे कारणच नाही. त्यासाठी बीसीसीआयचे नियम आहेतच. सुरक्षेची हमी आपण अज्ञातवासात राहिल्यानेच कशी काय देता येईल?
फक्त ‘वाडा’च्या नियमावलीत किरकोळ बदल सुचवावासा वाटतो. तीन-तीन महिन्यांनी हजेरी देऊन उत्तेजकविरोधी चाचण्यांचा आग्रह न धरता आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या तीन दिवस ते एक आठवडा आधी त्या आवश्यक कराव्यात. ऑलिम्पिकसारख्या तीन-तीन, चार-चार वर्षांनी होणाऱ्या स्पर्धासाठीही आठवडय़ाभराची मुदत परिणामकारक व उत्तेजकमुक्त स्पर्धाचे उद्दिष्ट साध्य करण्यात उपयोगी ठरेल.
आयसीसी किंवा बीसीसीआयसह अन्य नियामक मंडळांनीही ‘वाडा’शी बोलणी करून नियम शिथिल करून घेतले तर ते सर्वाच्याच फायद्याचे ठरेल.
विजय देशपांडे, माहीम, मुंबई

‘गोविंदा’ म्हणजे पिरॅमिड स्पर्धा नव्हे
गोपाळकाला सणाला आलेले व्यावसायिक स्वरूप, बक्षीस रकमेच्या मोहापायी उंच थर व त्यासाठी लहानग्यांना शेवटाच्या थरावर चढविण्याची क्लृप्ती या वृत्तीमुळे लहानग्यांना इजा पोहोचण्याचे प्रकार घडू लागले. ते टाळण्याच्या अपेक्षेने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाने लहानग्यांना शेवटच्या थरावर चढविण्यास मनाई करण्यास नकार दिला व दही-हंडीसाठी पिरॅमिड रचणे हा क्रीडा प्रकाराचा भाग असल्याचे म्हटले. पण गोपाळकाला म्हणजे स्पर्धा नव्हे. या दिवशी गोविंदांच्या अंगावर एकतर पाऊस पडत असतो किंवा पाण्याच्या बादल्या रिकाम्या होत असतात (बऱ्याच ठिकाणी पालिकेच्या कृपेने होजपाइपनीही पाणी फवारणी सुरू असते.) परिणामी खांद्यांवर निसरडेपणा असतो. शेवटच्या थरावर चढविले जाणारे लहानगे तर थंडीने कुडकुडत असतात. थर व्यवस्थित लागून दही-हंडीपाशी पोहोचायच्या तयारीत असलेल्या गोविंदावर पाण्याने भरलेल्या फुग्यांचा माराही होतो. या सर्व धोकादायक व इजा पोहोचविणाऱ्या बाबी न्यायालयाने विचारात न घेतल्याचे वा सपोर्ट इंडियाच्या वतीने मांडल्या न गेल्याचे आश्चर्यच वाटते. न्यायालयाने सुरक्षेची नियमावली करण्याची सूचना केली आहे. पण लहानग्यांना शेवटच्या थरावर चढविण्यापासून परावृत्त कोण करणार? त्याच्या जोडीला आजकाल दारू पिऊन उत्सव करण्याची फॅशन झाली आहे. त्यामुळे जेथे पायाच ‘डळमळीत’ तेथे वरचा ‘डोलारा’ कोण सांभाळणार?
मनस्वी म्हात्रे, दहिसर, मुंबई