Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

कोल्हापुरात ‘दे धक्का’ मोर्चातील शिवसैनिकांची घुसखोरी
कोल्हापूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख हे गैरहजर राहिल्याबद्दल शिष्टमंडळाने घेतलेली आक्रमक भूमिका, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासमोर टेबलवर ओतलेल्या महाग पालेभाज्या, प्रशासनाविरुद्ध जोरदार केलेली घोषणाबाजी आणि नेत्यांच्या आवाहनामुळे पोलिसांच्या बंदोबस्ताची पर्वा न करता घुसलेले शिवसैनिक, या शिवसैनिकांवर पोलिसांनी उगारलेल्या लाठय़ा,

सोलापूर जिल्ह्य़ात स्वाइन फ्लूबाबत प्रशासकीय यंत्रणेत गांभीर्याचा अभाव
सोलापूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

स्वाइन फ्लूची साथ पसरू नये म्हणून सोलापुरात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचा दावा केला जात असला, तरी त्यात गांभीर्याचा अभाव असल्याचे दिसून येते. दरम्यान, या संदर्भात महापालिकेची कालपर्यंत झोपलेली यंत्रणा जागी झाली असून सोमवारी पालिकेच्या संसर्गजन्य रोग दवाखान्यात तीन संशयित रुग्ण दाखल झाले आहेत.

स्वाइन फ्लूचे पाचगणीत आणखी सहा रुग्ण
जिल्ह्य़ाबाहेरून येणाऱ्या रुग्णसंपर्कातील लोकांनी माहिती द्यावी -विकास देशमुख
सातारा, १० ऑगस्ट/प्रतिनिधी
पाचगणी येथे नवीन सहा विद्यार्थ्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, आणखी दोन संशयितांच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. या व्यतिरिक्त सातारा शहर व जिल्ह्य़ात इतरत्र एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. पुणे, मुंबई अथवा बाहेर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती जिल्ह्य़ात आल्यास त्यांनी जिल्हा रुग्णालयात माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केले.

नवसमाज निर्मितीसाठी अक्षरक्रांती आवश्यक- सुशीलकुमार शिंदे
सोलापूर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

नवसमाज निर्मितीसाठी रक्तक्रांतीपेक्षा अक्षरक्रांतीची गरज असल्याचे मत केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. येथील हुतात्मा स्मृतिमंदिरात महाराष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने आयोजित चर्मकार समाजाच्या मेळाव्याचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते संत रोहिदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी समाजकल्याणमंत्री, आमदार बबनराव घोलप हे होते.

विलासराव देशमुख यांनी शिवसेनेला काढले चिमटे
वाई, १० ऑगस्ट/वार्ताहर

मी खासदार झालो सारी शिवसेनेची कृपा, असे हवेलीचे खासदार गजानन बाबर यांना सांगून अवजड उद्योगमंत्री विलासराव देशमुख म्हणाले, तुम्ही असेच मराठी माणसांच्या मागे उभे राहा म्हणजे काँग्रेसला आणि काँग्रेसच्या नेत्यांना चांगले दिवस येतील. दिल्लीही अशीच आमच्या मागे खंबीरपणे उभी राहील, असे सांगत शेदमउख यांनी खासदार गजानर बाबर यांच्या उपस्थितीच शिवसेनेला आपला खुमासदार शैलीत भरपूर चिमटे काढले.निमित्त होते किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावरील २२ मेगवॉटच्या सहवीज निर्मिती केंद्राच्या भूमिपूजनाचे...

धनगर समाज जिल्हाध्यक्षाने प्रवेशद्वारावर डोके आपटले
कोल्हापूर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

वारंवार आंदोलने करून, निवेदने देऊन राज्य शासनाला जाग येत नसेल तर करायचे काय ? या वैफल्याच्या भावनेतून आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोखंडी प्रवेशद्वारावर डोके आपटून, रक्तबंबाळ होऊन धनगर समाजाच्या छगन नांगरे या जिल्हा नेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर मात्र निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी धनगर समाजाच्या मागण्यांबाबत शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली.आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध पक्ष, संघटनांचे मोर्चे, धरणे आंदोलने होती. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

..अन्यथा धनगर समाज गुर्जरांसारखे आंदोलन करील- डांगे
सांगली, १० ऑगस्ट/ प्रतिनिधी

शासनाने धनगर समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा राजस्थानातील गुर्जर समाजाप्रमाणे आदोलन करण्यात येईल, त्यावेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सरकारच जबाबदार राहील, असा इशारा माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी दिला. त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चात ते बोलत होते.

पालकमंत्र्यांच्या आजारपणामुळे ध्वजारोहणाची जागा बदलणार?
सांगली, १० ऑगस्ट/ गणेश जोशी
सांगली जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या आजारपणामुळे स्वातंत्र्यदिनी करण्यात येणारे ध्वजारोहणाचे ठिकाण बदलण्याचा प्रकार सांगलीत घडणार आहे. दरवर्षी गणेशदुर्गातील मुख्य बुरुजावर असलेल्या ध्वजस्तंभावर स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण केले जाते. सध्या डॉ. पतंगराव कदम हे पाठीच्या दुखापतीमुळे आजारी असल्याने बुरुजाच्या पायऱ्या त्यांना चढता येणे अशक्य असल्याने यंदाचा ध्वजारोहण कार्यक्रम दरबार हॉलसमोरील प्रांगणात घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून ध्वजस्तंभ उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

सोलापुरात एस.टी. जाळली
सोलापूर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

कोळी समाजाच्या आंदोलनात धुळे येथे हिंसक वळण लागून गोळीबार झाल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात सोमवारी सायंकाळी अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक करून एस.टी. बस जाळली.सोलापूर आगाराची एमएच २० डी ९४०० ही औरंगाबादहून सोलापूरला येणारी बस शहरात रूपाभवानी मंदिराजवळ सायंकाळी सहाच्या सुमारास आली असता अचानकपणे पाच-सहा अज्ञात तरुण समाजकंटकांनी या बसवर दगडफेक करून त्यातील सर्व प्रवाशांना बाहेर पडण्यास भाग पाडले. या दगडफेकीत प्रवाशांपैकी संजय गुलाबराव शिरसट (वय ३८, रा. कुमठा, सोलापूर) हे जखमी झाले. त्यांना मुका मार लागला. नंतर बसमध्ये घुसून समाजकंटकांनी रॉकेल ओतून संपूर्ण बस पेटवून दिली. यात बसचे मोठे नुकसान झाले.

जिल्हा संघातील खेळाडूंना गणवेश देणार- महाडिक
पेठवडगाव, १० ऑगस्ट / वार्ताहर

राज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळणाऱ्या जिल्हा संघातील खेळाडूंना गणवेश देऊन असोसिएशनच्या उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे कोल्हापूर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयात खेळीमेळीच्या चर्चेत होऊन विषयपत्रिकेवरील सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले. अध्यक्षस्थानी आजीव अध्यक्ष एच.डी. ऊर्फ बाबा पाटील होते. त्या वेळी महाडिक यांनी असोसिएशनने राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन संघटनेच्या स्वत:च्या क्रीडांगणासाठी प्रयत्न करूया असेही सांगितले व उपक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या वेळी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.प्रा. संभाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सहकार्यवाह अजित पाटील यांनी स्वागत केले. राज्य व राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंच्या अभिनंदनाचा ठराव डॉ. रमेश भेंडीगिरी यांनी मांडला.

‘भान, मान आणि शान राखून प्रसारमाध्यमांचा वापर व्हावा’
सोलापूर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात कितीही वृत्तवाहिन्या आल्या तरी वृत्तपत्रांचे महत्त्व कमी होणार नाही. वृत्तपत्रांमध्ये सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आहे. परंतु त्याचा वापर गांभीर्याने आणि भान, मान आणि शान राखून व्हावा, अशी अपेक्षा मुंबई दूरदर्शन केंद्राचे वरिष्ठ निर्माते जयू भटकर यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास आणि सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शिवस्मारक सभागृहात ‘प्रसार माध्यमे-बदलते प्रवाह आणि आव्हाने’ या विषयावर परिसंवाद आयोजिला होता. त्या वेळी ते बोलत होते. हरियानाच्या कुरुक्षेत्र विद्यापीठातील वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख डॉ. बी. के. कुटयाला अध्यक्षस्थानी होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अभय दिवाणजी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला.दूरचित्रवाणी, आकाशवाणी व वृत्तपत्र या प्रसारमाध्यमांच्या प्रत्येक घटकाचे महत्त्व आपापल्या जागी कायम आहे.

आवाडे जनता सहकारी बॅंकेत लवकरच कोअर बँकिंग सुविधा
इचलकरंजी, १० ऑगस्ट / वार्ताहर

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी शेडय़ुल्ड बँक इन्फ्रासॉफ्ट टेक.इंडिया लि. यांच्यात शुक्रवारी कोअर बँकिंग प्रणालीचा करार करण्यात आला. यामुळे ब्राऊजर बेस सॉफ्टवेअरचा अवलंब करणारी ही महाराष्ट्रातील सहकारी बँकांमधील पहिली बँक ठरली आहे.बँकेचे अध्यक्ष अशोक सौंदत्तीकर व इन्फ्रासॉफ्टचे अध्यक्ष मनिंदर सिंग यांनी या करारावर सह्य़ा केल्या. या कंपनीने सुमारे ६० सहकारी बँकांमध्ये कोअर बँकिंग सिस्टिमसाठीचे सॉफ्टवेअर कार्यान्वित केलेले आहे. यावेळी सौंदत्तीकर म्हणाले, या सुविधांमुळे ग्राहकांना फार मोठा लाभ होणार आहे. हा कोअर बँकिंग प्रणालीमुळे ग्राहकास बँकेच्या कोणत्याही शाखेमधून आपला बँकिंग व्यवहार करणे सुलभ होणार आहे. तसेच बँकेच्या कोणत्याही शाखेच्या एटीएममधून २४ तास ग्राहकाला हवे असलेले पैसे काढण्याची सुविधा प्राप्त होणार आहे. नजिकच्या काळामध्ये इतर बँकेच्या एटीएममधून केव्हाही व कोठेही पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

डॉल्बीस परवानगी न दिल्यास मंडप, साऊंड, जनरेटर नाही
इचलकरंजी,१० ऑगस्ट / वार्ताहर

डॉल्बीच्या परवान्यावरून गणेशोत्सवातील वादाचा घणघणाट सुरू झाला असून हातकणंगले तालुक्यातील डॉल्बी लावण्यास परवानगी न दिल्यास मंडप, साऊंड सिस्टिम, लाईट, जनरेटर यांचा पुरवठा न करण्याचा निर्णय या व्यवसायिकांनी घेतला आहे. हा निर्णय इचलकरंजी लाईट मंडप व साऊंड सिस्टिमच्या मेळाव्यात घेण्यात आला. व्यावसायिकांनी डॉल्बी लावल्यास १ लाख रूपये दंड व ५ वर्षांची शिक्षा करण्यात येईल अशा आशयाच्या नोटिसा बजावण्यात आल्या. यामुळे डॉल्बी चालकांत खळबळ उडाली आहे.

पालिका कर्मचारी संपास कागलच्या नगराध्यक्षांचा पाठिंबा
कागल, १० ऑगस्ट / वार्ताहर

गेले पाच दिवस सुरू असलेल्या पालिका कर्मचारी संपास कागलच्या नगराध्यक्ष श्रीमती आशाकाकी माने यांनी पािठबा दर्शविला आहे. पालिका कर्मचारी संपामुळे कागल शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. आरोग्याच्या सुविधांचा प्रश्नही निर्माण झाला आहे. शासनाने इतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. परंतु नागरिकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याच्या व आरोग्य विभागात काम करून गावातील कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न शासनाने सोडविणे गरजेचे असताना त्यांना पाच दिवस संप करावयास लावणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घ्यावा. कागल येथे महिन्याभरापूर्वी झालेल्या नगरपालिका कर्मचारी मेळाव्यात मुश्रीफ यांनी सदरचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.

बनावट ओळखपत्रे देणाऱ्या माजी वार्ताहराला अटक
राधानगरी,१० ऑगस्ट / वार्ताहर
तहसीलदारांचे शिक्के चोरून बनावट ओळखपत्रे देणाऱ्या अनिल महीपती पाटील (रा.चंद्रे) या एका दैनिकाच्या माजी वार्ताहराला राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे. तहसील कचेरीतील अनागोंदीचा फायदा घेऊन पैसे उकळणारा दुसरा तोतया तहसीलदार पोलिसांच्या जाळय़ात सापडला आहे.राधानगरी तहसील कचेरीतील अनागोंदी कारभार टीकेचे लक्ष्य बनला आहे. दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात खुच्र्या मांडून बनावट ओळखपत्रांच्या माध्यमातून हजारो रुपये उकळणाऱ्या जितेंद्र कांबळे (रा.कोते) या तोतया तहसीलदाराला पकडले होते. त्याने तहसील कचेरीतील शिक्के चोरून पैसे उकळले होते. एका निनावी तक्रार अर्जावरून तहसीलदार दीपक शिंदे यांनी कारवाई केली.

नागरिकांनी घेतली स्वच्छता मोहीम हाती
इचलकरंजी, १० ऑगस्ट / वार्ताहर

पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरिकां-कडूनच स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येत आहे.नदीनाका परिसरात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता केली.सहावा वेतन आयोगाच्या मागणीसाठी पालिका कामगार संपावर गेले आहेत. गेले ८ दिवस संप सुरू असल्याने शहरात विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य मोठय़ा प्रमाणात पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विविध आजाराने बाधीत रुग्णांची संख्याही वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर नागरिक स्वयंस्फूर्तीने स्वच्छता मोहीम राबवित आहेत. तर काही ठिकाणी मंडळांच्या माध्यमातून स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जात आहेत. नदीवेस नाका परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांची शौचास जातानाही कुचंबणा होत होती. या पाश्र्वभूमीवर नदीवेस नाका परिसरातील नागरिकांनी विशेषत: युवक वर्गाने स्वच्छता मोहीम राबविली.

संपामुळे पंढरपूरमध्ये घाणीचे साम्राज्य
पंढरपूर, १० ऑगस्ट/वार्ताहर

महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषदेचे कर्मचारी संपावर असून, यात पंढरपूर नगर परिषदेचे ३५० कर्मचारी संपावर आहेत. संपाचा पाचवा दिवस असल्याने शहरातील सामान्य जनजीवनावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे पंढरीत रोगराई वाढण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात स्वाइन फ्लू असल्याने त्याची लागण महाराष्ट्रभर होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून संप मिटवावा, अशी मागणी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.शहरात घाण पसरली आहे. काही भागात जनावरे मरून पडली असून कमालीची दुर्गंधी पसरली आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज २० ते २५ हजार भाविक येतात. शिवाय सध्या चातुर्मास चालू असून वाडे, मठ, धर्मशाळा या ठिकाणी सुमारे एक लाख भाविक वास्तव्यास आहेत. त्यामुळे सर्वत्र कचरा साचला आहे. गटारी तुंबल्या असल्याने माशांचे प्रमाण वाढले आहे.

साताऱ्यात शिवसेनेचा महागाईविरोधात मोर्चा
सातारा, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

शिवसेनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली महागाई व राज्यातील लोकशाही आघाडी सरकारच्या निषेधार्थ येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. जनतेच्या हितासाठी भगवी क्रांती करून राज्य सरकारला खाली खेचण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली दहा वर्षे महाराष्ट्र सरकारला भ्रष्टाचार, महागाई, गुंडागर्दी व लँडमाफियांनी घेराव घातला आहे. सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचार, महागाईचे व्यसन लागलेले असून, या आघाडी सरकारला हद्दपार करण्यासाठी सेना-भाजप युती व मित्र पक्षाचे शिवसैनिक, कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. राज्याला निवडणुकीच्या माध्यमातून जाहीरनाम्याचे गाजर दाखवून राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत आघाडी सरकारने हात दाखवून अवलक्षण करून घेतले आहे. उस्मानाबादच्या राष्ट्रवादीच्या खासदाराला खूनप्रकरणी संसदेत जाण्याऐवजी तुरुंगात जावे लागत आहे. हीच परंपरा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. लँडमाफियांच्या गुंडागर्दीने व सावकारी पाशाने शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. जे शेतकरी त्यातून वाचले त्यांच्या जमिनी पवनचक्क्यांच्या माध्यमातून लुटण्याचा सर्वत्र खुलेआम प्रयत्न झाला; परंतु काही ठिकाणी तो हाणून पाडल्यामुळे लँडमाफियांना आळा बसला आहे.

‘महागाईचा गरीब व मध्यमवर्गीयांना फटका’
फलटण, १० ऑगस्ट / वार्ताहर
केंद्रातील व राज्यातील सरकारने पेट्रोल डिझेलसह केलेल्या वाढीमुळे देशात महागाई प्रचंड प्रमाणात वाढत चालली असून, याचा फटका गरीब व मध्यमवर्गीयांना बसत असल्याने महागाई कमी करण्याच्या मागणीचे निवेदन बसपाच्या फलटण शाखेमार्फत तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी मंगेश मोरे, सुंदर कांबळे, उदय काकडे, श्यामराव रणदिवे, गौतम भोसले उपस्थित होते.

‘शिवशंकर बझार’च्या अध्यक्षपदी विजय शिंदे
माळशिरस, १० ऑगस्ट/वार्ताहर
वार्षिक दहा कोटींवर उलाढाल असलेल्या अकलूजच्या शिवशंकर बझारच्या अध्यक्षपदी विजय शिंदे, तर उपाध्यक्षपदी बाळासो. गिरमे यांची बिनविरोध निवड झाली आहे. बझारच्या सभागृहात संचालकांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीसाठी पंचायत समिती सभापती धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. बझारचे संस्थापक उदयसिंह मोहिते पाटील यांच्या निर्णयानुसार भीमराव मुळे यांनी अध्यक्षपदासाठी विजय शिंदे यांचे नाव सुचवले व सर्वानी त्याचे स्वागत केले. मावळते अध्यक्ष जगन्नाथ धुमाळ व संचालक कीर्ती ध्वजसिंह मोहिते पाटील यांनी शिंदे व गिरमे यांचा सन्मान केला. या वेळी बझारचा चढता आलेख तसाच पुढे नेण्याचे आश्वासन नूतन अध्यक्ष शिंदे यांनी दिले. व्यवस्थापक संभाजी पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आटपाडीत वृक्षदिंडी
आटपाडी, १० ऑगस्ट/ वार्ताहर
‘झाडे लावा, झाडे जगवा’ व ‘वृक्ष तोड थांबवा व पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा’ असा नारा देत ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून सामाजिक वनिकरण विभागाने आयोजित केलेल्या वृक्षदिंडीत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. आटपाडी बसस्थानकापासून निघालेल्या या वृक्षदिंडीत प्राथमिक शाळा, राजारामबापू हायस्कूल, वत्सलादेवी, भवानी विद्यालय, अध्यापक विद्यालय व लोणारी समाज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसह तहसीलदार एम. वाय. जावळे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, गट शिक्षणाधिकारी व्ही. पी. भागवत, लागवड अधिकारी सुनील कवडे व पी. बी. धायगुडे सहभागी झाले होते. तहसील कार्यालय परिसरात वृक्षारोपण, वृक्ष लागवडीचे महत्त्व व पर्यावरणाबाबत प्रबोधनपर कार्यक्रमानंतर या वृक्षदिंडीची सांगता झाली. यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणासंबंधी शपथ देण्यात आली.

शिष्यवृत्ती परीक्षेत फलटणमधील विद्यार्थ्यांचे यश
फलटण, १० ऑगस्ट / वार्ताहर
महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत फलटण एज्युकेशन सोसायटीच्या फलटण शहरातील शाखांमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. मुधोजी प्राथमिक विद्या मंदिरातील स्वप्नील गायकवाड, निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिरातील संदेश शिंदे हे विद्यार्थी प्राथमिक शाळा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत शहरातील मुधोजी हायस्कूलमधील नीलांबरी काशीकर आणि अमोल बर्गे हे दोन विद्यार्थी पात्र ठरले. श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलमधील दोशी ही विद्यार्थिनीही शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.

जत लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी राजकुमार म्हमाणे
जत, १० ऑगस्ट/ वार्ताहर
जत येथील लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. राजकुमार म्हमाणे, तर लायनेस क्लबच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. श्रीमती वृषाली म्हमाणे यांची निवड करण्यात आली. पदग्रहण व शपथविधी कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे प्रांतपाल अशोक मेहता उपस्थित होते. यावेळी लायन्स इंग्लिश मीडियम स्कूलचे उद्घाटनही करण्यात आले. प्रारंभी डॉ. रवींद्र आरळी यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अनिता किट्टद यांनी केले. यावेळी राजेंद्र माळी, प्रकाश नाईक, सोलापूर विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, सुधीर जमगे व डॉ. भरत हेशी आदी उपस्थित होते. राजेंद्र आरळी यांनी आभार मानले.

महिला बचतगट फेडरेशनची आरगमध्ये गुरुवारी स्थापना
मिरज, १० ऑगस्ट/ वार्ताहर

महिला बचतगटांना व्यावसायिकता लाभावी, यासाठी फेडरेशन स्थापन करण्यात येत असून त्याचे उद्घाटन आरग (ता. मिरज) येथे दि. १३ ऑगस्ट रोजी होणार आहे. या फेडरेशनमध्ये मिरज तालुक्याच्या पूर्व भागातील एक हजार महिला बचतगटांचा सहभाग असणार आहे. यासंदर्भात प्रवर्तक श्रावण माने यांनी सांगितले की, पारंपरिक उद्योगातून महिलांची सर्वागिण प्रगती साध्य होऊ शकली नाही. याबाबत व्यवसाय निवडीपासून भांडवल उभारणीपर्यंतची माहिती देण्यासाठी एस. एल. तोरसकर टेक्नॉलॉजी अँड रिसर्च फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने आरग येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महिला प्रशिक्षण वर्ग, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, दूध व ताग व प्रक्रिया, गारमेंट व्यवसाय, तेलबिया व डाळी उत्पादन याबाबत या मेळाव्यात माहिती देण्यात येणार आहे.

‘लवकरच देश भारनियमनमुक्त’
सांगली, १० ऑगस्ट/ प्रतिनिधी
देशात सध्या ८० हजार मेगावॅट वीज निर्मितीचे काम सुरू आहे. काँग्रेस आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून सुमारे १५ हजार मेगाव्ॉट वीजनिर्मिती करण्यात यश आले आहे. सन २०१२ पर्यंत संपूर्ण देश वीज भारनियमनमुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.