Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

पुण्यात शाळा, महाविद्यालये, क्लासेसना सात; तर चित्रपटगृहांना तीन दिवस टाळे!
पुणे, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

‘स्वाईन फ्लू’च्या संसर्गापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील सर्व शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, खासगी शिकवणी, क्लासेस सात दिवसांकरिता बंद करण्याचा निर्णय अखेर आज जाहीर करण्यात आला. चित्रपटगृहे-मल्टिप्लेक्सना तीन दिवसांसाठी टाळे ठोकण्यात येणार आहे. ‘शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना मौजमजा करण्यासाठी ही सुटी देण्यात आली नसून त्यांना घरीच ठेवून संसर्गापासून बचाव करण्याबाबत सर्वतोपरी काळजी घ्यावी. दरम्यान, शिक्षण संस्थांमधील वर्ग बंद करताना शिक्षक-शिक्षकेतर व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मात्र ही सुटी देण्यात आलेली नाही.

पुण्यात एकाच दिवसात दोन बळी
पुणे, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

तब्बल चार दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या आयुर्वेदचे टिंगरेनगर येथील डॉ. बाबासाहेब लक्ष्मण माने यांचा आज सकाळी ‘स्वाइन फ्लू’ने ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. या आठवडय़ात पुण्यातच स्वाइन फ्लूने तिसरा बळी घेतला आहे. तर रात्री आठच्या सुमारास हडपसर येथील औषध विक्रेता संजय भाऊसाहेब टिळेकर (वय ३५) यांचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. डॉ. माने यांच्या पाठोपाठ टिळेकर यांच्या मृत्युमुळे एकाच दिवसात दोन जणांचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे.

वसईत राडा!
खासदार बळीराम जाधव, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाहनांवर दगडफेक
ठाणे, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतून ग्रामीण भाग वगळण्याच्या मागणीवरून आत्तापर्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी रात्री हिंसक वळण लागले. वाघोली परिसरात वसई विकास आघाडीचे बॅनर लावण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान रविवारी खासदार बळीराम जाधव व आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या गाडय़ांवर तुफान दगडफेक होण्यात झाले. या दगडफेकीत १० ते १२ गाडय़ांची मोडतोड होऊन त्यात ठाकूर व जाधव यांच्यासह सुमारे २० ते २५ कार्यकर्ते जखमी झाले..

मुंबई, १० ऑगस्ट / प्रतिनिधी
मुंबईत ‘एच १एन १’ म्हणजे ‘स्वाईन फ्लू’ नियंत्रणात असून रुग्णांची तपासणी करण्यासाठी आणखी सहा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मुंबईतील एकाही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नाही. तसेच औषधांचा भरपूर साठा उपलब्ध असून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचीही कमतरता नसल्याची माहिती आज पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर -म्हैसकर यांनी दिली. सध्या मुंबईत ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झालेले २० रुग्ण असून शाळेत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेही प्रमाणपत्र मागू नये, संशयित रुग्णांनी किमान आठ-दहा दिवस घरीच राहवे, असे निर्देश आज केंद्र सरकारने जारी केले असल्याचेही त्यांनी सांगितले. आतापर्यंत गोरेगाव येथील सिद्धार्थ, भगवती (बोरिवली), भाभा (वांद्रे), राजावाडी (घाटकोपर), ए. टी. अग्रवाल (मुलुंड) या ठिकाणी संशयित रुग्णांची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली.

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे १० दिवस बंद करा -उद्धव ठाकरे
मुंबई, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

पुण्यातील सार्वजनिक ठिकाणे स्वाईन फ्लूच्या प्रादूर्भावामुळे सात दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास, मल्टीप्लेक्स, मॉल्स पुढील दहा दिवस बंद करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज केली.

सरकार निष्काळजी -राज ठाकरे
पालकांनीच आता मुलांना १० दिवस शाळेत पाठवू नये
मुंबई, १० ऑगस्ट/ खास प्रतिनिधी
‘स्वाईन फ्लू’ने आपली दहशत निर्माण केल्यानंतरही त्याला आटोक्यात आणण्यासाठी ठोस निर्णय घेण्याऐवजी सरकार आपली जबाबदारी टाळत असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. सुट्टी देण्याबाबत निर्णय शाळाचालकांनीच घ्यावा, असे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वर्तन निव्वळ बेजबाबदारपणाचे असल्याचे सांगून पालकांनीच आता आपल्या मुलांना पुढील १० दिवस शाळांमध्ये पाठवू नये, असे आवाहन राज यांनी केले.

दहीहंडीची उंची व पारितोषिकांची रक्कम यावर बंधन?
मुंबई, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

राज्यातील पुणे, मुंबई यासारख्या शहरांत स्वाईन फ्लूचा फैलाव झाला असतानाच दहीहंडी, गणेशोत्सव, रमजान यासारखे सण तोंडावर असल्याने गर्दी टाळण्याकरिता काय करावे याचा विचार सरकारने सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून यंदा दहीहंडीची उंची कमी ठेवावी व भरमसाठ रकमेची बक्षिसे लावू नये, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गणेशोत्सव व दहीकाला मंडळांना केले आहे.

चार अतिरेक्यांचे मृतदेह स्वीकारण्यास पाकिस्तान तयार
मुंबई, १० ऑगस्ट/ खास प्रतिनिधी

मुंबईवर २६ नोव्होंबर रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या नऊ अतिरेक्यांपैकी चारजण पाकिस्तानी असल्याचे पाक सरकारने मान्य केले आहे.भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात ठेवलेल्या या सर्व अतिरेक्यांचे मृतदेह पाकिस्तानी सरकारने लवकरात लवकर ताब्यात घ्यावे, अशी मागणी केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाने केली असल्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज सांगितले. मुंबईवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामधील कसाब हा एकमेव अतिरेकी जीवंत आहे. उर्वरित नऊ अतिरेक्यांचे मृतदेह जे. जे. रुग्णालयात असून ते अधिक काळ ठेवता येणे शक्य नाही. यातील चार अतिरेकी पाकिस्तानी असल्याचे पाक सरकारने मान्य केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही पाकिस्तानी सरकारला हे सर्व मृतदेह लवकरात लवकर नेण्याची विनंती केली आहे. येत्या दहा दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास राज्य शासनाला या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे जयंत पाटील यांनी सांगितले.

 

प्रत्येक शुक्रवारी