Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

आदिवासींचा योजनांमध्ये सहभाग हवा -जमीर
नांदेड, १० ऑगस्ट/वार्ताहर

आदिवासी भागाच्या विकासासाठी ६० टक्के योजना आहेत. त्यात समाजाने ४० टक्के श्रम द्यावेत म्हणजे मागासलेपण दूर होण्यास वेळ लागणार नाही, असे मत राज्यपाल एस. सी. जमीर यांनी व्यक्त केले. एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आदिवासी जनतेशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. व्यासपीठावर आमदार प्रदीप नाईक, विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डिकर आदींची उपस्थिती होती. राज्यपालांनी इंग्रजीत भाषण केले.

सुधीर रसाळ हे प्रतिभावंत समीक्षक - देशमुख
औरंगाबाद, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

डॉ. सुधीर रसाळ हे प्रतिभावंत समीक्षक आहेत. समीक्षक हा काव्याचा समीक्षक असावा लागतो. तो त्यांनी जाणीवपूर्वक जोपासला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्रश्नचार्य भगवंतराव देशमुख यांनी डॉ. रसाळ यांचे कौतुक केले. ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हेमंत व वंदना मिरखेलकर, सचिन व अर्चना अकोलकर यांनी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. सुधीर रसाळ व त्यांच्या पत्नी सुमती यांचा सत्कार भगवंतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. श्री. देशमुख पुढे म्हणाले, मी त्यांचा नाममात्र गुरु आहे. मात्र हा शिष्य गुरुला समाधान देणारा आहे.

गंगाखेडमध्ये शेतक ऱ्यांचा महामोर्चा!
गंगाखेड, १० ऑगस्ट/वार्ताहर

गंगाखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा तात्काळ बंदोबस्त करावा यासह अन्य मागण्यांसाठी आज (सोमवारी) हजारो शेतकऱ्यांनी बैलगाडय़ा व जनावरे तहसील कार्यालयासमोर आणून सोडीत थंडावलेल्या प्रशासनाला हादरून सोडले.
आज तीन मोर्चे एकाच दिवशी निघाल्याने प्रशासन गडबडून जागे होण्याची शक्यता आहे.

‘स्वाइन फ्लू ’ चे नांदेडमध्ये दोन संशयित रुग्ण
नांदेड, १० ऑगस्ट/वार्ताहर

संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात हादरवून सोडणाऱ्या स्वाईन फ्ल्यू या आजाराचे दोन संशयित रुग्ण नांदेडमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांना नांदेडच्या गुरुगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्रासह देशात स्वाईन फ्ल्यू पाय पसरत असल्याचे चित्र सध्या आहे. पुणे, मुंबईत फैलाव झाल्यानंतर नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सतर्कता बाळगण्यात येत आहे. स्वाईन फ्ल्यूसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून औषधांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.

स्वाइन फ्लूच्या आणखी १८ संशयितांचे नमुने घेतले
तपासणीसाठी रुग्णालयांत गर्दी
औरंगाबाद, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लूची व्याप्ती वाढत असून शासकीय रुग्णालयात आज (सोमवार) आणखी १८ संशयीत रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याबरोबरच ही संख्या ३३ इतकी झाली आहे. औरंगाबाद शहरात या साथीने चंचुप्रवेश केल्याच्या संशयामुळे सर्दी झालेल्या अनेक नागरिकांनी तपासणीसाठी रुग्णालयांमध्ये धाव घेतल्याने शासकीय रुग्णालयासह पालिकेच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी तोबा गर्दी झाल्याचे चित्र सोमवारी दिसून आले.

प्रश्नध्यापकांचे आज जेलभरो आंदोलन
औरंगाबाद, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

प्रश्नध्यापकांच्या प्रलंबित जिव्हाळ्याच्या मागण्या राज्य शासनाने त्वरित मान्य कराव्यात या हेतूने गेल्या महिनाभरापासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू आहे. शासनाचे लक्ष वेधण्याच्या हेतूने राज्यातील सर्व महाविद्यालयीन प्रश्नध्यापक मंगळवारी विद्यापीठाच्या आवारात जेलभरो आंदोलन करणार आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने ८० टक्के अर्थसाह्य़ देण्याचे आदेश काढले आहे. प्रश्नध्यापकांना समग्र योजना युजीसीप्रमाणे जशीच्यातशी लागू करावी, १९ सप्टेंबर १९९१ ते डिसेंबर १९९९ या काळातील प्रश्नध्यापकांना कायद्याने नेट-सेटची अट लागू केलेलीच नव्हती हे उच्च शिक्षणमंत्र्यांनी विधिमंडळात मान्य केलेले आहे; त्यामुळे या प्रश्नध्यापकांना नेमणुकीच्या तारखेपासून त्यांची सेवा ग्राह्य़ धरून वरिष्ठ व निवड श्रेणी द्यावी, अशी मागणी बामुक्टाने केली आहे. कंत्राटी व तासवारी प्रश्नध्यापक, ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावे, कायम विनाअनुदानित धोरण रद्द करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या १४ जुलैपासून काम बंद आंदोलन सुरू आहे. उच्च शिक्षण सचिव आणि शिक्षण संचालकांच्या आडमुठय़ा धोरणामुळे मंगळवारी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय येथील मिलिंद विज्ञान महाविद्यालयात घेण्यात आलेल्या बामुक्टाच्या बैठकीत मान्य करण्यात आला. आंदोलनात प्रश्नध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सचिव डॉ. शुजात कादरी आणि प्रश्न. राजन शिंदे यांनी केले आहे.

जनतेने घाबरून जाऊ नये - खैरे
औरंगाबाद, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

स्वाईन फ्लूचा प्रश्नदुर्भाव पसरू नये यासाठी प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य विभागाची आढावा बैठक खासदार चंद्रकांत खैरे यांनी घेतली. जनतेने घाबरून न जाता संयम ठेवून योग्य तपासणीची काळजी घ्यावी, असे आवाहन खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. पुणे येथे शाळा आणि महाविद्यालयांना सुटय़ा दिल्यामुळे जवळपास पाच हजार विद्यार्थी व नागरिक औरंगाबाद शहरात दाखल होणार आहेत. योग्य काळजी घेण्यासाठी २० हजार टॅमीफ्लू गोळ्या, ५०० एन.९५ मास्क आणि २००० साधे मास्क आदी साहित्याची मागणी आपण करणार आहोत, असेही खासदार म्हणाले. महानगरपालिकेतर्फे पाच तपासणी केंद्र सुरू आहेत. औरंगाबाद शासकीय इस्पितळात डॉक्टरांची कायम नियुक्ती करण्यात आली आहे. शाळांना काळजी व उपाययोजनेचे पत्र पाठविण्यात आले आहे. होर्डिग्ज, पोस्टर आणि विविध मार्गाद्वारे स्वाईन फ्लूच्या विरोधात जनजागृतीवरही चर्चा करण्यात आली. बैठकीला महापौर विजया रहाटकर, आरोग्य उपसंचालक डॉ. लक्ष्मीकांत डोळस, अधिष्ठाता डॉ. नंदकुमार द्रविड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पी. एस. गवळी, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण देगावकर उपस्थित होते.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक जोशी सेवानिवृत्त
औरंगाबाद, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशनचे औरंगाबाद विभागाचे सरचिटणीस आणि बँकेचे मुख्य व्यवस्थापक एन. के. जोशी हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या संघटनेच्या मुंबई शाखेतर्फे सत्कार करण्यात आला. संघटनेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष केशव ठावकर, सरचिटणीस पंढरीनाथ दिघुळे यांच्या उपस्थितीत एन. के. जोशी व त्यांची पत्नी शैला जोशी यांचा सत्कार करण्यात आला. मुंबई, नागपूर, पुणे आणि पणजी येथील संघटनेचे पदाधिकारी होते. एन. के. जोशी यांचे संघटन कौशल्य, कामाची धडाडी, अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची जिद्द आणि चिकाटी याचे कौतुक सर्वच अधिकाऱ्यांनी केले. भारतीय स्टेट बँक कर्मचारी संघटना, भारतीय स्टेट बँक निवृत्तिधारक, एस.सी.एस.टी. बँक कर्मचारी संघटना, एन.ओ.बी. डब्ल्यू. आणि एस.बी.ओ.ए. पब्लिक स्कूल यांच्यातर्फे जोशी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जहागीरदार आणि पी. एम. देशमुख यांनी केले. शेवटी मुकुल देशपांडे यांनी आभार मानले.

राज्यपाल जमीर यांचे नांदेडमध्ये स्वागत
नांदेड, १० ऑगस्ट/वार्ताहर

राज्यपाल डॉ. एस. सी. जमीर यांचे आज नांदेडमध्ये स्वागत करण्यात आले. किनवट येथील आदिवासी भागातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी तसेच वेगवेगळ्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेण्यासाठी डॉ. जमीर यांचे आज सकाळी ११ वाजता विमानाने नांदेडमध्ये आगमन झाले. विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैशाली चव्हाण, महापौर प्रकाश मुथा, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डिकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शारदाप्रसाद यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यनारायण चौधरी आदींनी राज्यपाल डॉ. एस. सी. जमीर यांचे स्वागत केले. राज्यपालांना महिला पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

‘दयानंद’ राज्यातील नामांकित संस्था -दिलीप देशमुख
लातूर, १० ऑगस्ट/वार्ताहर

लातूर हे शिक्षणाचे केंद्र आहे. मराठवाडय़ातील पहिले महाविद्यालय दयानंद शिक्षणसंस्थेने सुरू केले. आज ही संस्था राज्यातील दहा नामांकित संस्थांपैकी एक असल्याचे मत पालकमंत्री दिलीप देशमुख यांनी व्यक्त केले. दयानंद शिक्षणसंस्थेच्या बीफार्मसी या पाचव्या महाविद्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी लक्ष्मीरमण लाहोटी, अरविंद सोनवणे, मुरलीधर इन्नानी, ललितभाई शहा, रमेश बियाणी, एस. आर. देशमुख, व्यंकट बेद्रे, मोईज शेख, लक्ष्मण कांबळे, खाजाबानू अन्सारी, सुरेश जैन, श्रीकांत उटगे आदी उपस्थित होते. श्री. देशमुख म्हणाले की, पत्राच्या शेडमध्ये सुरू झालेल्या दयानंद महाविद्यालयाचे आजचे स्वरूप डोळे दिपवून टाकणारे आहे. देखण्या इमारती, स्वच्छ परिसर, गुणवंत विद्यार्थी व प्रश्नध्यापक, गुणवत्तेची चढती कमान अशी अनेक वैशिष्टय़े महाविद्यालयाची आहेत. दयानंदचा विद्यार्थी म्हणून या संस्थेच्या प्रगतीसाठी जे करता येईल ते सहकार्य मी अवश्यक करेन. संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी गेल्या अडीच वर्षातील संस्थेच्या वाटचालीचा आलेख सादर केला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी यांनी संस्थेत पुढील वर्षी एमबीएचा स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचे सांगितले. ३०० विद्यार्थिनींसाठीच्या वसतिगृहाचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. अरविंद सोनवणे यांचेही भाषण झाले. आभार श्रीकांत उटगे यांनी मानले.

मुंदडा यांच्या पाठीशी उभे राहावे-आडसकर
अंबाजोगाई, १० ऑगस्ट/वार्ताहर

भावठाणा आणि परिसरातील गावामधील नागरिकांनी आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या प्रभागाच्या लोकप्रतिनिधी तथा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री डॉ. विमल मुंदडा यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन योगेश्वरी सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष रमेश आडसकर यांनी केले. भावठाणा येथे डॉ. विमल मुंदडा यांच्या स्थानिक विकासनिधी कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या उद्घाटन कार्यक्रमात रमेश आडसकर बोलत होते. अध्यक्षस्थानी अक्षय मुंदडा, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष शंकर उबाळे, कृउबाचे संचालक मधुकर काचगुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री. आडसकर पुढे म्हणाले, डॉ. विमल मुंदडा यांनी आजपर्यंत या विभागातील अनेक विकासकामे पूर्ण केली असून यापुढेही त्या या विभागातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता बसविण्यासाठी या विभागातील नागरिकांनी आपली सर्व शक्ती त्यांच्या पाठीशी उभी करावी, असे आवाहन केले.

खासगी शिक्षण संस्थाचालकांचा बंद यशस्वी झाल्याचा दावा
परभणी, १० ऑगस्ट/वार्ताहर

शिक्षण संस्थाचालकांच्या विविध मागण्यांसाठी आज पुकारलेल्या राज्यव्यापी शैक्षणिक संस्था बंदला परभणी जिल्ह्य़ात १०० टक्के प्रतिसाद मिळाला. खासगी,अनुदानित महाविद्यालयाचे २००० पासून तर खासगी अनुदानित माध्यमिक शाळांचे २००३ पासून वेतनोत्तर अनुदान शासनाने दिलेले नाही. वेतनेत्तर अनुदान नसल्याने राज्यातील शाळा महाविद्यालयांची दुरवस्था झाली आहे. ग्रंथालयात पुस्तके नाहीत, प्रयोगशाळेत साहित्य अपुरे आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेस्क नाहीत. पाणीपुरवठा विजेअभावी खंडित आहे. जिल्हा शिक्षण संस्थाचालक महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन राज्यव्यापी शैक्षणिक संस्था बंद आंदोलन सहभागी होऊन आज जिल्हाभर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनात संजय शेषेराव देशमुख यांनी दिला आहे.