Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आदिवासींचा योजनांमध्ये सहभाग हवा -जमीर
नांदेड, १० ऑगस्ट/वार्ताहर

आदिवासी भागाच्या विकासासाठी ६० टक्के योजना आहेत. त्यात समाजाने ४० टक्के श्रम द्यावेत म्हणजे मागासलेपण दूर होण्यास वेळ लागणार नाही, असे मत राज्यपाल एस. सी. जमीर यांनी

 

व्यक्त केले.
एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आदिवासी जनतेशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. व्यासपीठावर आमदार प्रदीप नाईक, विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डिकर आदींची उपस्थिती होती.
राज्यपालांनी इंग्रजीत भाषण केले. त्याचा तात्काळ मराठी अनुवाद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हर्डिकर यांनी केला.
श्री. जमीर म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे विकसित राज्य आहे, पण मराठवाडा आणि विदर्भ या दोन भागांचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. परंतु या दोन्ही विभागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी स्वत: लक्ष घालीत आहे. आदिवासी जनतेने या विकासात आपला सहभाग नोंदवावा. ६० टक्के योजना व ४० टक्के श्रम झाले तर मागासलेपण दूर होण्यास जास्त काळ लागणार नाही. आपल्या राज्याची विभागणी ही भाषावार, प्रश्नंतवार आधारित असल्याने छोटे-मोठे भाग झाले. पण राष्ट्राच्या उभारणीत गरीब- श्रीमंत- आदिवासी या सर्वाचे योगदान समान आहे. देशातील आदिवासींचा विकास व्हावा तसेच ते समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, त्यांचे मागासलेपण दूर व्हावे यासाठी विविध योजना आखल्या गेल्या आहेत. त्या प्रभावीपणे अमलात येतात की नाही याकडे धाडसाने, निर्भीडपणे व प्रश्नमाणिकपणे लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. नकारार्थी दृष्टिकोन न ठेवता योजनांची माहिती मिळवून घेऊन त्याचा फायदा घ्यावा. समाजात निंदा करणारे खूप आहेत; परंतु सर्वसामान्य जनता सहकार्य करणारीच असते. आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, स्वच्छ पाणी व कसण्यासाठी जमीन या आदिवासींच्या प्रमुख मागण्या आहेत, याची आपल्याला जाणीव आहे. राज्य विकसित कसे होईल यासाठी सर्वानीच लक्ष दिले पाहिजे. राज्य घटनेच्या अधिकारानुसार मी गेल्या काही वर्षापासून विशेष लक्ष घालीत आहे. जनतेने राज्य शासनास सहकार्य करावे, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रश्न. तपनकुमार मिश्रा यांनी केले. उपविभागीय अधिकारी डॉ. विवेक घोडके, तहसीलदार जीवराज दापकर, कृषी अधिकारी पी. आर. देशमुख, प्रकल्प अधिकारी महेश मेघमाळे आदी अधिकारी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नरत होते. या कार्यक्रमानंतर राज्यपाल एस. सी. जमीर यांनी बेंदी तांडा या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. राज्यपालांनी आदिवासी मुलींचे वसतिगृह, आदिवासी मुलींच्या आश्रमशाळेला भेट दिली. कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने दौरा आटोपता घेण्यात आला.