Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सुधीर रसाळ हे प्रतिभावंत समीक्षक - देशमुख
औरंगाबाद, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

डॉ. सुधीर रसाळ हे प्रतिभावंत समीक्षक आहेत. समीक्षक हा काव्याचा समीक्षक असावा लागतो. तो त्यांनी जाणीवपूर्वक जोपासला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ साहित्यिक व माजी प्रश्नचार्य

 

भगवंतराव देशमुख यांनी डॉ. रसाळ यांचे कौतुक केले.
ज्येष्ठ समीक्षक आणि साहित्यिक डॉ. सुधीर रसाळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हेमंत व वंदना मिरखेलकर, सचिन व अर्चना अकोलकर यांनी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. डॉ. सुधीर रसाळ व त्यांच्या पत्नी सुमती यांचा सत्कार भगवंतराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
श्री. देशमुख पुढे म्हणाले, मी त्यांचा नाममात्र गुरु आहे. मात्र हा शिष्य गुरुला समाधान देणारा आहे. रसाळांची ओळख त्यांच्या कार्याशी आहे. कविता आणि प्रतिमा हा त्यांचा ग्रंथ मराठी साहित्यात अद्वितीय वाटावा असा ग्रंथ आहे. साहित्य क्षेत्रातील कवितेचा मागोवा त्यांनी घेतला आहे. कवीची संवेदनशीलता कशी असते याचे मौलिक विवेचन रसाळ यांनी या पुस्तकात केले आहे. ‘काही मराठी कवी : जाणिवा व शैली’ या पुस्तकात सुधीर रसाळ यांनी केशवसुतांपासून बोरकर आदी अनेक कवींच्या काव्यांचा शोध घेतलेला आहे. ‘ना. घ. देशपांडे यांची कविता’ हे पुस्तक आज प्रकाशित होऊ शकले नाही. डॉ. रसाळांनी ना. घ. देशपांडे यांना नव्या रुपात या पुस्तकात उभे केले आहे. त्यांचे हे सामथ्र्य समाधान देणारे आहे, असेही ते म्हणाले.
गुरुवर्य भगवंतराव यांच्याकडून वाढदिवसाच्या दिवशी सत्कार व्हावा याचे मला समाधान आहे. नव्हे ती एक आनंददायी घटना आहे, असे डॉ. सुधीर रसाळ यांनी आपल्या भाषणात सांगितले. खऱ्याखुऱ्या रसिकत्वाची ओळख त्यांच्यामुळेच झाली. वाङ्मयावर एक शब्द लिहिला तरी त्यांच्या नजरेखालून गेल्याशिवाय ते प्रसिद्ध केले जात नाही, असे डॉ. रसाळ म्हणाले. त्यांच्या हातून सत्कार व्हावा ही एक भाग्याची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले. या वेळी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख ग. मा. पवार, सेवानिवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर आदी उपस्थित होते.