Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘स्वाइन फ्लू ’ चे नांदेडमध्ये दोन संशयित रुग्ण
नांदेड, १० ऑगस्ट/वार्ताहर

संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशात हादरवून सोडणाऱ्या स्वाईन फ्ल्यू या आजाराचे दोन संशयित रुग्ण नांदेडमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांना नांदेडच्या गुरुगोविंदसिंघजी शासकीय

 

रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रासह देशात स्वाईन फ्ल्यू पाय पसरत असल्याचे चित्र सध्या आहे. पुणे, मुंबईत फैलाव झाल्यानंतर नांदेडमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सतर्कता बाळगण्यात येत आहे. स्वाईन फ्ल्यूसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून औषधांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. आतापर्यंत नांदेड जिल्ह्य़ात २२ जणांची तपासणी करण्यात आली. पुणे येथे शिकण्यासाठी असलेल्या आणि दोन दिवसांपूर्वी नांदेडमध्ये परतलेल्या दोघांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. धम्मदीप पाटील व महेश ओहाळ हे दोन विद्यार्थी पुणे येथे शिकण्यासाठी होते. स्वाईन फ्ल्यू या आजारासारखी लक्षणे आढळल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघांच्या रक्ताची तसेच घशातील स्रावांची तपासणी करण्यासाठी नमुने पुणे येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्व्हायरॉलॉजी या संस्थेत पाठविण्यात आले आहेत. या दोघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुणे येथील प्रयोगशाळेचा अहवाल प्रश्नप्त झाल्यानंतरच त्यांना स्वाईन फ्ल्यू आहे की नाही, याचा उलगडा होईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. नांदेडमध्ये घशातील स्राव घेऊन तो प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी लागणारी संपूर्ण कीट उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तीन-चार दिवसांत संबंधित रुग्णाच्या प्रयोगशाळेचा अहवाल प्रश्नप्त होणार आहे.
आज कार्यशाळा
स्वाईन फ्ल्यूबाबत नागरिकांमध्ये कमालीची भीती पसरली असल्याने जिल्हा प्रशासनाने उद्या (दि. ११) दोन स्वतंत्र कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. कै. शंकरराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या पहिल्या कार्यशाळेत डॉक्टरांना मार्गदर्शन केले जाणार आहे. स्वाईन फ्ल्यूचा फैलाव रोखण्यासाठी तसेच स्वाईन फ्ल्यू झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार करण्यासंदर्भात या बैठकीत मार्गदर्शन होणार आहे. दुपारच्या सत्रात महाविद्यालयातील प्रश्नचार्य व मुख्याध्यापकांची कार्यशाळा होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डिकर आदी याप्रसंगी मार्गदर्शन करणार आहेत.