Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

गंगाखेडमध्ये शेतक ऱ्यांचा महामोर्चा!
गंगाखेड, १० ऑगस्ट/वार्ताहर

गंगाखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा तात्काळ बंदोबस्त करावा यासह अन्य मागण्यांसाठी आज (सोमवारी) हजारो शेतकऱ्यांनी बैलगाडय़ा व जनावरे

 

तहसील कार्यालयासमोर आणून सोडीत थंडावलेल्या प्रशासनाला हादरून सोडले.
आज तीन मोर्चे एकाच दिवशी निघाल्याने प्रशासन गडबडून जागे होण्याची शक्यता आहे.
पंचायत समितीचे सभापती राजेश फड, प्रल्हाद मुरकुटे, शेकापचे भाई गोपीनाथ भोसले, बाजार समितीचे माजी सभापती रामप्रभू निरस, रामराव राठोड गुरुजी आदींनी मोर्चाचे नेतृत्व केलेल्या या मोर्चासाठी ग्रामीण भागातून सुमारे चारशे ते साडेचारशे बैलगाडय़ा तसेच शेकडो जनावरांना हाती घेऊन हजारो शेतकरी मोठय़ा तळमळीने आले होते. रेल्वे स्थानक येथून निघालेला हा मोर्चा शहराच्या प्रमुख मार्गावरून तहसील कार्यालयावर येऊन धडकला.
येथील डॉ. आंबेडकर चौकात बैलगाडय़ा व जनावरांमुळे सुमारे दोन तास राज्य हमरस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. कुठल्याही राजकारणाशिवाय स्वयंस्फूर्तीने सामील झालेले हजारो शेतकरी या मोर्चाचे विशेष महत्त्व सिद्ध करून गेले.
तहसील कार्यालयासमोरही मोर्चेकरी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत प्रशासनाला भंडावून सोडले होते. मोर्चेकऱ्यांच्या भावनेचा उद्रेक होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक सतीश देशमुख यांनी विशेष पोलीस बल तसेच अश्रुधुरांच्या नळकांडय़ाही मागविल्या होत्या. मात्र मोर्चेकऱ्यांनी निवेदन देऊन शांतपणे गावाकडे जाणे पसंत केल्याने प्रशासनाने निश्वास सोडला.