Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

स्वाइन फ्लूच्या आणखी १८ संशयितांचे नमुने घेतले
तपासणीसाठी रुग्णालयांत गर्दी
औरंगाबाद, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लूची व्याप्ती वाढत असून शासकीय रुग्णालयात आज (सोमवार) आणखी १८ संशयीत

 

रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याबरोबरच ही संख्या ३३ इतकी झाली आहे. औरंगाबाद शहरात या साथीने चंचुप्रवेश केल्याच्या संशयामुळे सर्दी झालेल्या अनेक नागरिकांनी तपासणीसाठी रुग्णालयांमध्ये धाव घेतल्याने शासकीय रुग्णालयासह पालिकेच्या आरोग्य केंद्रात तपासणीसाठी तोबा गर्दी झाल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. शासकीय रुग्णालयातही मोठी रांग लागली होती.
सर्वानाच तपासणी करणे शक्य व्हावे यासाठी पालिकेच्या वतीने शहरातील ५ आरोग्य केंद्रात तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. या पाच आरोग्य केंद्रात दुपारी तीन वाजण्यापर्यंत ४५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. एका रुग्णाबद्दल संशय आल्याने त्याला तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण देगावकर यांनी सांगितले.
आजपासूनच सकाळी ९ ते रात्री ९ असे बारा तासांसाठी तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी ४५ रुग्ण तपासाणीसाठी आले असले तरी येत्या दोन दिवसांत रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असे गृहीत धरून तयारी करण्यात आली आहे. या केंद्रावर शासकीय रुग्णालयातील एका तज्ज्ञ डॉक्टरची नियुक्ती करण्यात आली आहे. येथे तपासणी केल्यानंतर थोडाजरी संशय आल्यास त्याला पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. शहराच पाच ठिकाणी सोय झाली असल्यामुळे अनेकजण आपल्या शंकाचे निराकरण करू शकतील, असा विश्वास आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
शासकीय रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. येथे येणाऱ्या संशयीत रुग्णांमुळे इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून अशा प्रकारच्या रुग्णांसाठी स्वतंत्र बाह्य़ रुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नंदकुमार द्रविड यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयात आज सकाळपासूनच रुग्णांनी तपासणीसाठी गर्दी करून रांगा लावल्या होत्या. १५ जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. ते तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
खासगी रुग्णालयांना तपासणीचे अधिकार
स्वाईन फ्लूच्या संशयितांची तपासणी करण्याचे अधिकार शहरातील खासगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. सकाळी महापौर विजया रहाटकर यांनी अधिष्ठाता डॉ. द्रविड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. देगावकर यांच्यासह शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयांच्या प्रमुख डॉक्टरांच्या बैठकीत हा निर्णय घेतला. यात कमलनयन बजाज, सेठ नंदलाल धूत, महात्मा गांधी मिशन, डॉ. हेडगेवार या रुग्णालयांचा समावेश आहे. पुण्याला जहांगीर रुग्णालयात जसा प्रकार घडला तसा येथे घडू नये म्हणून या रुग्णालयांनी विशेष परवानगी घेतली आहे. त्यांनी संशय आल्याबरोबर शासकीय रुग्णालयालयाला माहिती द्यावी, असे बंधन त्यांच्यावर घालण्यात आले आहे. शिवाय अशा रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात यावा, असेही या रुग्णालयांना बजावण्यात आले आहे.
पुण्याची धास्ती
स्वाइन फ्लू बरोबरच औरंगाबादकरांनी पुण्याच्या नावाची धास्ती घेतली आहे. पुण्याहून आलेला प्रत्येकजण स्वत:ची तपासणी करून घेत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी पुणे भेटीहून आलेल्यांनीही तपासणी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. साध्या सर्दीची लक्षणे दिसू लागताच फॅमिली डॉक्टरकडे जाणारे रुग्ण थेट आता शासकीय रुग्णालयात येत आहेत.
डॉक्टरांच्या सूचना
घसा दुखत असेल, सर्दी झाली असेल तर घराच्या बाहेर पडू नका
पुणे आणि मुंबईहून आला असाल तर लगेच तपासणी करून घ्या. अशा नागरिकांच्या संपर्कात कोणी नका, त्यांनीही इतरांजवळ जाण्याचे टाळावे
विद्यार्थ्यांला सर्दी जाणवल्यास शाळांनी पालकांकडून सक्तीने तपासणी करून घ्यावी
सर्दीमुळे विद्यार्थ्यांना सुटी घेण्यास परवानगी देण्यात यावी उपस्थितीसाठी नाहक सक्ती करू नये. मुलांच्या ७-८ दिवसांच्या अनुपस्थितीने काहीएक फरक पडत नाही
६ ते १४ वयोगटांतील मुला मुलींची विशेष काळजी घेण्यात यावी.
पालिकेची शहरातील तपासणी केंद्रे
बन्सीलालनगर, सिल्कमील कॉलनी, सिडको एन-८, हडको एन-११ आणि कैसर कॉलनी.
शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी होत असून नागरिकांनी या केंद्रांवर तपासणी करून घ्यावी. तेथेही तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध आहेत.