Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘विनायक’च्या कामगारांचे आजपासून मुंबईत उपोषण
औरंगाबाद, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

वैजापूर तालुक्यातील विनायक सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी उद्या (मंगळवार) पासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. ४५० कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे, भविष्य निर्वाह निधी, विमा रक्कम देण्यास होत असल्याच्या टाळाटाळीच्या निषेधार्थ हे

 

आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
राज्यातील वेगवेगळ्या विभागांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याचा धडाका राज्य शासनाने लावला आहे. साखर कारखान्यांच्या कामगारांसाठीही अशाच प्रकारचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. साखर कारखान्याचे कामगार देशोधडीला लागले असून त्यांना वेळीच हातभार लावला नाही तर त्यांच्यावर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले.
एकेकाळी दिमाखात चालणारा हा कारखाना डबघाईला आल्यामुळे २००४ मध्ये कारखान्यावर अवसायक नेमण्यात आला होता. अवसायक म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्रे स्वीकारली. १९९५ ते २००१ या कार्यकाळात साडेचारशे कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी ९ कोटी ५० लक्ष रुपये थकलेले होते. भविष्यनिर्वाह निधीचेही ९ कोटी रुपये देणे होते. दोन्ही मिळून कामगारांचे १८ कोटी रुपये थकलेले आहेत. ही रक्कम मिळावी म्हणून कामगारांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही केले होते. मात्र आतापर्यंत त्यांची ही मागणी मान्य झाली नाही. नोकरी नाही आणि थकलेली रक्कमही नाही, यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
आता कोणत्याही परिस्थिती माघार घ्यायची नाही, अशा इराद्याने हे कामगार मुंबईला रवाना झाले आहे.