Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

भोकर पालिका स्थापनेसाठी प्रश्नरूप अधिसूचना
नांदेड, १० ऑगस्ट/वार्ताहर

जिल्ह्य़ातल्या भोकर येथे नगरपालिका स्थापनेच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिल्यानंतर

 

जिल्हा प्रशासनाने यासंबंधीची प्रश्नरूप अधिसूचना जाहीर केली आहे.
भोकर येथे नगरपालिका स्थापन करण्यात यावी, अशी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोकर येथे ग्रामपंचायत असल्याने विकास खुंटला होता. भोकर शहरासाठी नगरपालिका स्थापन करण्यात यावी, शक्य झाल्यास लगतची गावे त्यात समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी होती.
अधिसूचना जारी
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मतदारसंघासाठी वाट्टेल ते देण्याच मनस्थितीत असलेल्या अशोक चव्हाण यांनी नगरपालिका स्थापण्याला परवानगी दिली. त्यानुसार राज्य शासनाने अधिसूचना जारी केली. शनिवारी त्यासंबंधीचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्रश्नप्त झाल्यानंतर प्रशासनाने आता दावे-हरकतीसाठी ३० दिवसांची मुदत दिली आहे.
निर्णयाचे स्वागत
भोकर येथे नगरपालिका स्थापन करण्याच्या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. भोकर हा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा संभाव्य मतदारसंघ आहे. याच मतदारसंघाचे अनेक वर्षे कै. शंकरराव चव्हाण यांनी नेतृत्व केले होते. मतदारसंघातील अनेक गावांशी असलेले ऋणानुबंध लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी शक्य तेवढय़ा समस्या सोडविण्याचा सपाटा सुरू केला आहे. भोकर शङरातल्या पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता नगरपालिका स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याने मतदारसंघात समाधानाचे वातावरण आहे.
‘महसूल कार्यालय व्हावे’
भोकर येथे नगरपालिका स्थापन करण्यात यावी, ही मागणी आता मान्य झाली असली तरी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भोकर येथे प्रस्तावित महसूल विभागाचे उपविभागीय कार्यालय मंजूर करण्यात यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. हे कार्यालय झाल्यानंतर सर्वसामान्यांची छोटी-मोठी कामे विनासायास पार पडतील, असे मानले जाते. मुख्यमंत्री अशोक चव्हाण ११ आणि १२ ऑगस्टला नांदेड जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्याकडे उपविभागीय कार्यालयासंदर्भात साकडे घातले जाणार आहे.