Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

महाविहार बावरीनगर क्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटी रुपये
नांदेड, १० ऑगस्ट/वार्ताहर

पंढरपूर, देहू-आळंदी तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या धर्तीवर अर्धापूर तालुक्यातल्या महाविहार बावरीनगर क्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी २५ कोटी रुपये उपलब्ध करून

 

दिले आहेत.
या कामांचा प्रश्नरंभ बुधवारी (दि.१२) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तसेच खासदार खतगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. या क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आग्रही होते.
श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महाविहार, बावरीनगर या धम्मस्थळास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा सर्वप्रथम केली होती. श्री. खतगावकर यांच्या पाठपुराव्यामुळे या क्षेत्राच्या विकासाचा ५२ कोटी रुपये खर्चाचा आराखडा पर्यटन विभागाकडे सादर झाला होता. पण मधल्या तीन-चार वर्षात त्याकडे दुर्लक्ष झाले. या परिसरातील भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षणसंस्थेचे प्रमुख डॉ. एस. पी. गायकवाड यांनी आपल्या प्रत्येक निवेदनात श्री. खतगावकर यांच्या प्रयत्नांची व त्यांच्याकडून मिळणाऱ्या सहकार्याची नोंद घेतली आहे.
दाभाडजवळ असलेल्या महाविहार बावरीनगर परिसरात मागील २१ वर्षापासून अ.भा. बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन केले जाते. या निमित्ताने दरवर्षी तीन ते चार लक्ष बौद्ध अनुयायी एकत्र येतात. मानवी कल्याणाचा उपदेश देतानाच, या परिसरात महाविहार, विपश्यना केंद्र, ग्रंथालय इत्यादी सुविधा निर्माण करण्याची योजना डॉ. गायकवाड यांनी मांडली होती. ‘मुख्यमंत्र्यांचे औदार्य अन् भास्कररावांचे सहकार्य’ यामुळेच ही योजना आता मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले.
बौद्ध धम्मीयांचे प्रेरणास्थान बनलेल्या या परिसरात वर्षभर धम्मसंस्कार, विपश्यना, सामूहिक विवाह, व्यसनमुक्ती कार्यक्रम आदी समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संयोजकांचा मानस आहे.
बावरीनगर क्षेत्र विकास कार्यक्रमात ध्यान केंद्र, बहुउद्देशीय सभागृह, भिक्कू निवास, भिक्कुनी निवास, श्रामनेर व अंगारक निवास, भोजन कक्ष, अशोक स्तंभ, अंतर्गत रस्ते इत्यादी कामे करण्यात येणार असून त्यासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ही सर्व कामे जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या नियंत्रणाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येतील.