Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

तुळजापूर तालुक्यात नऊजणांना डेंग्यू आणि चिकुनगुण्याची लागण
उस्मानाबाद, १० ऑगस्ट/वार्ताहर

तुळजापूर तालुक्यातील किलज येथे डेंग्यू आणि चिकुनगुण्या या रोगाची नऊजणांना बाधा झाली. उस्मानाबाद शहरात स्वाईन फ्ल्यूच्या दहशतीखाली प्रत्येकजण वावरत आहे. नाकाला रुमाल बांधून

 

फिरणाऱ्यांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे.
तुळजापूर तालुक्यातील किलज या गावी डेंग्यू आणि चिकुनगुण्याचे नऊ रुग्ण आढळले आहेत. २८ जुलैला डेंग्यूचे आय. जी. जी. हे विषाणू असणारे रोगी आढळल्याचे हिवताप अधिकारी रमेश पाटील यांनी सांगितले. नऊपैकी दोघांना चिकुनगुण्या आणि डेंग्यू हे दोन्ही आजार झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर घरातील पाणी फेकून देऊन कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, सूर्यग्रहणामुळे बहुतेक नागरिकांनी पिण्याचे पाणी फेकून दिले आणि नवे पाणी भरल्यामुळे ही साथ पसरली नाही.
दोन्ही आजार गावात किलज येथे आल्याने गावातील एका बनावट डॉक्टरने चांगलाच हात धुवून घेतला. बंगाली डॉक्टरचा दवाखाना तेजीत आणि प्रश्नथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण नाही, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे नऊजणांपैकी बानोबी जमीर शेख, नीता तानाजी गवळी या दोघींना डेंग्यू आणि चिकुनगुण्या हे दोन्ही आजार झाले. आता वैद्यकीय अधिकाऱ्याने किलज गावी एक आरोग्य सेवक व एक शिपाई यांची साथ संपेपर्यंत नेमणूक केली आहे. वैद्यकीय अधिकारी या गावाला भेटी देत आहेत.
उस्मानाबादमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या भीतीने घबराहट निर्माण झाली आहे. विषाणूची बाधा होऊ नये म्हणून गावात सर्वत्र तोंडाला रुमाल बांधून नागरिक फिरत आहेत.