Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पुण्यात शाळा, महाविद्यालये, क्लासेसना सात; तर चित्रपटगृहांना तीन दिवस टाळे!
पुणे, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

 

‘स्वाईन फ्लू’च्या संसर्गापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व परिसरातील सर्व शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे, खासगी शिकवणी, क्लासेस सात दिवसांकरिता बंद करण्याचा निर्णय अखेर आज जाहीर करण्यात आला. चित्रपटगृहे-मल्टिप्लेक्सना तीन दिवसांसाठी टाळे ठोकण्यात येणार आहे.
‘शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना मौजमजा करण्यासाठी ही सुटी देण्यात आली नसून त्यांना घरीच ठेवून संसर्गापासून बचाव करण्याबाबत सर्वतोपरी काळजी घ्यावी. दरम्यान, शिक्षण संस्थांमधील वर्ग बंद करताना शिक्षक-शिक्षकेतर व कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मात्र ही सुटी देण्यात आलेली नाही. त्यांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे,’ असे स्पष्ट करण्यात आले.
‘स्वाईन फ्लू’च्या उद्रेकानंतर पुणेकरांमध्ये घबराटीचे वातावरण होते. विशेषत: विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांच्या मनात प्रचंड भीती होती. गेल्या आठवडय़ापर्यंत ९० टक्क्यांपर्यंत असलेली उपस्थिती आज ५० टक्क्यांवर आली. दुपापर्यंत बऱ्याच शाळांनी आठवडाभरासाठी सुटी जाहीर केली. दरम्यान, विधानभवनामध्ये पालकमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली. पवार म्हणाले की, ‘मंत्रिमंडळाच्या गेल्या आठवडय़ामध्ये झालेल्या बैठकीत शाळाबंदीबाबतचा प्रस्ताव आपण सादर केला होता. शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही त्याला सहमती दर्शवली होती; परंतु एवढा मोठा निर्णय घेताना मतभिन्नता होती. सरसकट सर्व शाळा बंद केल्यास विनाकारण घबराट पसरेल, असे मत व्यक्त करण्यात आल्याने हा निर्णय टाळण्यात आला. त्यानंतर जिल्हास्तरावर निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी बहाल केल्यानंतर लगेचच आपण सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था बंद ठेवत आहोत.’