Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पुण्यात एकाच दिवसात दोन बळी
पुणे, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

 

तब्बल चार दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या आयुर्वेदचे टिंगरेनगर येथील डॉ. बाबासाहेब लक्ष्मण माने यांचा आज सकाळी ‘स्वाइन फ्लू’ने ससून रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. या आठवडय़ात पुण्यातच स्वाइन फ्लूने तिसरा बळी घेतला आहे. तर रात्री आठच्या सुमारास हडपसर येथील औषध विक्रेता संजय भाऊसाहेब टिळेकर (वय ३५) यांचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. डॉ. माने यांच्या पाठोपाठ टिळेकर यांच्या मृत्युमुळे एकाच दिवसात दोन जणांचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. त्यामुळे पुण्यात बळींची संख्या ही चापर्यंत गेली आहे.
टिळेकर हे हडपसर येथे औषधविक्रेता म्हणून काम करीत होते. त्यांना ताप आणि श्वसनाचा विकार सुरू झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्या घशातील द्रव आणि रक्ताचे नमुने घेऊन ते एनआयव्हीला पाठविले. तेथून आलेल्या अहवालात हा रुग्ण पॉझिटिव्ह असल्याने त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. तेथे औषधोपचार सुरू करण्यात आल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावत होती. आज रात्री आठच्या सुमारास त्यांची हृदयाची प्रक्रिया बंद पडल्याने डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण त्यांचा मृत्यू झाला, असे रुग्णालयातून सांगण्यात आले. दरम्यान, रिदा शेख हिच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी डॉ. माने यांच्याकडे एक रुग्ण उपचारासाठी आला होता. हा स्वाइन फ्लूचा संशयित रुग्ण होताआणि त्याच्यापासून डॉ. माने यांना स्वाईन फ्लूचा संसर्ग झाला.
चेन्नईत मुलाचा मृत्यू
दिल्ली आणि महाराष्ट्रात भीतीचा हाहाकार माजविणाऱ्या ‘स्वाईन फ्लू’ने आज तामिळनाडूत पहिला बळी घेतला. स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे आज येथील संजय बी नावाच्या एका साडेचार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे संजयच्या ११ वर्षांच्या भावाला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे तपासणीत उघडकीस आले.