Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबई, १० ऑगस्ट / प्रतिनिधी
मुंबईत ‘एच १एन १’ म्हणजे ‘स्वाईन फ्लू’ नियंत्रणात असून रुग्णांची तपासणी करण्यासाठी आणखी सहा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मुंबईतील एकाही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नाही. तसेच औषधांचा भरपूर साठा उपलब्ध असून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचीही कमतरता नसल्याची माहिती आज पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा पाटणकर -म्हैसकर यांनी दिली. सध्या मुंबईत ‘स्वाईन फ्लू’ची बाधा झालेले २० रुग्ण असून शाळेत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतेही प्रमाणपत्र मागू नये, संशयित रुग्णांनी किमान आठ-दहा दिवस घरीच राहवे, असे निर्देश आज केंद्र सरकारने जारी केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आतापर्यंत गोरेगाव येथील सिद्धार्थ, भगवती (बोरिवली), भाभा (वांद्रे), राजावाडी (घाटकोपर), ए. टी. अग्रवाल (मुलुंड) या ठिकाणी संशयित रुग्णांची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. त्याबरोबरच आजपासून आणखी सहा केंद्रे सुरू करण्यात आली असून कूपर (विलेपार्ले), व्ही. एन. देसाई (सांताक्रूझ), कन्नमवार विक्रोळी, एस. के. पाटील (मालाड), भाभा (कुर्ला), शताब्दी (गोवंडी) याचा समावेश आहे. आता एकूण १२ ठिकाणी तपासणी करणे शक्य झाले आहे.

 


गेल्या दोन दिवसांत एक हजार २९८ लोकांची तपासणी करण्यात आली असून यापैकी २८६ रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. २३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. हिरानंदानी रुग्णालयातील दोन रुग्ण वगळता इतर एकाही रुग्णाची स्थिती चिंताजनक नाही, अशी माहिती मनीषा पाटणकर -म्हैसकर यांनी दिली. पालिका आणि खासगी शाळांतील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. एखाद्या विद्यार्थ्यांला ताप येत असेल तर त्यांच्या पालकांना आणि रुग्णालयाला कळवा, असे त्यांना बजावण्यात आले आहे. शाळा बंद करण्याबाबत कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत, मात्र काही शाळा चालकांनी खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवल्या आहेत. यात वांद्रे -कुर्ला संकुलातील धीरुभाई अंबानी, दादर येथील जे. बी. वाच्छा आणि अंधेरी येथील रिम्स या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. रिम्स मधील दोन मुलींना लागण झाली असून त्या दोघी बहिणी आहेत.
एच१एन१ची लागण झाल्याचे स्पष्ट होताच त्या रुग्णांवर उपचार सुरू करण्यात येतात. मात्र आता ज्या रुग्णांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घेतल्यास अशा रुग्णांना ‘टॅमिफ्लू’ ही गोळी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही साथ आटोक्यात आणणे शक्य होईल, असे मनीषा पाटणकर -म्हैसकर यांनी सांगितले.