Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

वसईत राडा!
खासदार बळीराम जाधव, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वाहनांवर दगडफेक
ठाणे, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

 

वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतून ग्रामीण भाग वगळण्याच्या मागणीवरून आत्तापर्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी रात्री हिंसक वळण लागले. वाघोली परिसरात वसई विकास आघाडीचे बॅनर लावण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान रविवारी खासदार बळीराम जाधव व आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या गाडय़ांवर तुफान दगडफेक होण्यात झाले. या दगडफेकीत १० ते १२ गाडय़ांची मोडतोड होऊन त्यात ठाकूर व जाधव यांच्यासह सुमारे २० ते २५ कार्यकर्ते जखमी झाले..
खासदार जाधव व आमदार ठाकूर यांच्यावरील हल्ला, श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी ९ ऑगस्टपासून सुरू केलेले बेमुदत उपोषण आणि गाव बचाव संघर्ष समितीने आज पुकारलेले गावबचाव आंदोलन या पाश्र्वभूमीवर आज दिवसभर वसई, विरार, नालासोपारा भागातील वातावरण तणावपूर्ण होते. काही ठिकाणी एस. टी. बसेसवर दगडफेक झाली व जाळपोळीच्या घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. वेगवेगळ्या ठिकाणी जमलेल्या हिंसक जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना तीन ठिकाणी लाठीमार करावा लागला.
आपल्यावरील हल्ला पूर्व नियोजित असल्याचा आरोप आमदार ठाकूर यांनी केला आहे. बॅनर लावण्यावरून वाद झाल्याची चर्चा खोटी असल्याचे सांगून ते म्हणाले की, खासदार व आपण नालासोपारा येथील कार्यक्रम आटोपून वसईकडे जात असताना रात्री १०.३० च्या सुमाराला वाधोलीजवळ अचानक १०० ते १५० च्या जमावाने तुफान दगडफेक सुरू केली. त्यात आठ ते १० गाडय़ांची मोडतोड होऊन आपल्यासह सोबत असलेले कार्यकर्तेही जखमी झाले. महापालिकेविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनाशी संबंधित काही नेत्यांचा या हल्ल्याशी संबंध असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. जिल्हा पोलीस अधीक्षक मधुकर पांडे हे रविवारी रात्रीपासून वसई भागात तळ ठोकून आहेत. त्यांनी सांगितले की, बॅनर लावण्यावरून आमदार व स्थानिकांत बाचाबाची झाली. त्यातून वाद वाढला.
अचानक जमलेल्या जमावाने गाडय़ांवर दगडफेक केली. ही घटना काल रात्री १०.३० वा. घडली. परंतु या संदर्भात दोन्ही बाजूकडून अद्याप कोणतीच लेखी तक्रार दाखल केलेली नाही. याप्रकरणी आत्तापर्यंत १५ जणांना ताब्यात घेतले असून, या भागातील परिस्थिती तणावपूर्ण परंतु नियंत्रणाखाली असल्याचे त्यांनी सांगितले.