Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणे १० दिवस बंद करा -उद्धव ठाकरे
मुंबई, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

 

पुण्यातील सार्वजनिक ठिकाणे स्वाईन फ्लूच्या प्रादूर्भावामुळे सात दिवस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबईतील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लास, मल्टीप्लेक्स, मॉल्स पुढील दहा दिवस बंद करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज केली.
मुंबई महापालिकेचे मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी जयराज ठाणेकर व अन्य अधिकाऱ्यांची महापौर निवासस्थानी ठाकरे यांनी बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. ठाकरे म्हणाले की, स्वाईन फ्लूचा फैलाव झाल्यापासून ‘मेक्सिकन पॅटर्न’ची चर्चा सुरू आहे. हा पॅटर्न म्हणजे सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद करणे हाच आहे. मुंबईत कामानिमित्त दररोज लाखो लोक रेल्वे व बेस्टने प्रवास करतात. त्यांना हा प्रवास करण्यापासून थांबवणे शक्य नाही. परंतु महत्वाच्या कामाखेरीज लोकांनी घराबाहेर पडू नये. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सुदैवाने स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव झालेला नाही. मात्र ज्या खासगी शाळांमध्ये या तापाचे रुग्ण आढळत आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला पाहिजे.