Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सरकार निष्काळजी -राज ठाकरे
पालकांनीच आता मुलांना १० दिवस शाळेत पाठवू नये
मुंबई, १० ऑगस्ट/ खास प्रतिनिधी

 

‘स्वाईन फ्लू’ने आपली दहशत निर्माण केल्यानंतरही त्याला आटोक्यात आणण्यासाठी ठोस निर्णय घेण्याऐवजी सरकार आपली जबाबदारी टाळत असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केला. सुट्टी देण्याबाबत निर्णय शाळाचालकांनीच घ्यावा, असे आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे वर्तन निव्वळ बेजबाबदारपणाचे असल्याचे सांगून पालकांनीच आता आपल्या मुलांना पुढील १० दिवस शाळांमध्ये पाठवू नये, असे आवाहन राज यांनी केले. पुणे व मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी स्वाईन फ्लू पसरत चालला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद यांच्या म्हणण्यानुसार येत्या दोन वर्षांत ३३ टक्के लोकांना स्वाईन फ्लूची लागण होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री ठोस निर्णय घेण्यास तयार नाहीत ही दुर्देवी गोष्ट आहे. सुट्टी देण्याबाबत निर्णय संबंधित शाळांनी घ्यावा, हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन हे जबाबदारी टाळण्याचा प्रकार असल्याचे राज यांनी सांगितले. राजगड येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज म्हणाले की, मेक्सिको येथे ज्यावेळी स्वाईन फ्लूचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी या साथीला आटोक्यात आणण्यासाठी तेथील सरकारने सर्व शाळांना १० दिवस सुट्टी जाहीर केली होती. प्रमुख्याने लहान मुले व वयोवृद्ध लोकांना याचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व शाळा तसेच सिनेमागृहे सरकारने पुढील दहा दिवस बंद ठेवली पाहिजेत. मुख्य भीती आहे ती गोविंदा आणि गणेशोत्सवाच्या काळात काय होणार याची. यासाठी सरकारने ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे, असेही राज म्हणाले. अन्यथा तोंडाला मास्क लावून गोविंदा खेळावा लागेल. गोविंदा पथकांनीही लहान मुलांना यावेळी दूर ठेवावे असे आवाहन राज यांनी केले.