Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

दहीहंडीची उंची व पारितोषिकांची रक्कम यावर बंधन?
मुंबई, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

 

राज्यातील पुणे, मुंबई यासारख्या शहरांत स्वाईन फ्लूचा फैलाव झाला असतानाच दहीहंडी, गणेशोत्सव, रमजान यासारखे सण तोंडावर असल्याने गर्दी टाळण्याकरिता काय करावे याचा विचार सरकारने सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून यंदा दहीहंडीची उंची कमी ठेवावी व भरमसाठ रकमेची बक्षिसे लावू नये, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गणेशोत्सव व दहीकाला मंडळांना केले आहे.
स्वाईन फ्लूच्या निमित्ताने हिंदू धर्मियांच्या सणांवर र्निबध लादू नये, अशी भूमिका शिवसेना, भाजप यांनी घेतली. मात्र असे र्निबध लागू केले जाणार नाही, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, धार्मिक उत्सवाच्या काळात गर्दी होते. त्यामुळे नागरिकांनी स्वत दक्षता घेण्याची गरज आहे. विशेषत सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. दहीहंडीची ऊंची आणि पारितोषिकांची रक्कम कमीत कमी ठेवावी. दहीहंडीच्यावेळी पाण्याचा वापर करू नये. शासनाच्या उपाययोजनांना नागरिकांचे सहकार्य लाभले तरच स्वाईन फ्लूवर मात करणे शक्य होईल.
स्वाईन फ्लूमुळे जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. नियमित आणि वेळेवर औषधोपचार केल्यास हा ताप बरा होतो. नागरिकांनी भीती न बाळगता दक्षता घेण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले. राज्यात आतापर्यंत २७६ व्यक्तींना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यापैकी १९४ व्यक्ती उपचारानंतर बऱ्या झाल्या आहेत. जे संशयित रुग्ण तपासणीकरिता आले होते त्यापैकी ८४९ जणांना घरी पाठवले आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, शिवसेनेचे सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, मनसेचे बाळा नांदगावकर, भाजपचे एकनाथ खडसे, गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हजर होते.

स्वाईन फ्लूसंदर्भात दहीहंडी समन्वय समितीची आज तातडीची बैठक
स्वाईन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनावर समन्वय समिती विचार करीत असून, दहीहंडीची उंची आणि पारितोषिकांची रक्कम या विषयावर उद्या महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. सर्व सार्वजनिक मंडळांना आम्ही एक निवेदन पाठविणार असून, जे कोणी स्वाईन फ्लूचे रुग्ण असतील त्यांना उत्सवात सहभागी करून घेऊ नये, असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले आहे.