Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

प्रादेशिक

कस्तुरबा रुग्णालय समोर असल्याने न्यायालय परिसरातही ‘स्वाईन फ्लू’बाबत घबराट!
मुंबई, १० ऑगस्ट / प्रतिनिधी
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तानी हल्लेखोर अजमल अमीर कसाब याच्याविरुद्ध ज्या न्यायालयात खटला चालविण्यात येत आहे ते आर्थर रोड तुरूंगातील विशेष न्यायालय कस्तुरबा रुग्णालयासमोरच आहे. याच रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.

एक कोटीचे चरस जप्त
मुंबई, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाने (एएनसी) शहरात गेल्या दोन दिवसांपासून केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवाईत चरसची तस्करी करणाऱ्या दोन मोठय़ा टोळ्यांकडून सुमारे एक कोटी रुपयांचे एक क्विंटल चरस जप्त केले. याप्रकरणी चरसची तस्करी करणाऱ्यांना आठ जणांना अटक करण्यात आली असून जम्मू आणि उत्तर प्रदेशातून मोठय़ा प्रमाणावर चरसची तस्करी होत असल्याचे या कारवाईमुळे उघड झाले आहे.

झोपडय़ा अधिकृत करण्याचा निर्णय तद्दन फसवा - मधू चव्हाण
मुंबई, १० ऑगस्ट / खास प्रतिनिधी

शहरातील २००० सालापर्यंतच्या बेकायदा झोपडय़ा अधिकृत ठरविण्याचा राज्य शासनाचा निर्णय तद्दन फसवा असून गिरणी कामगारांच्या प्रश्नांबाबतही अशीच पोकळ घोषणा निवडणुकीच्या तोंडावर करण्याचा राज्य शासनाचा इरादा असल्याचा आरोप भाजप प्रदेश प्रवक्ते आमदार मधु चव्हाण यांनी केला.

ऑनलाइन प्रक्रिया संपली; १७ हजार विद्यार्थी प्रवेशाविना
मुंबई, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

इयत्ता ११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आज संपल्यानंतर अजूनही सुमारे १७,७०० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत, अशी माहिती राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयास देण्यात आली. या ऑनलाइन प्रवेशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर झालेल्या कथित गोंधळाची मुंबई उच्च न्यायालयाने काहीशी उशीरा का होईना पण स्वत:हून दखल घेतली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत वेतनवाढ!
मुंबई, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन करार मुद्दय़ावरून गेल्या १५ महिन्यांपासून निर्माण झालेला तिढा आज सुटला. नव्या फॉम्र्युल्यानुसार ‘ग्रेड पे’मध्ये कोणतीही वाढ न देता महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करून त्यावर १७.५ टक्के वाढ देण्यात येणार आहे. या करारामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे तर प्रशासनावर सुमारे ७१२ कोटींचा बोजा पडण्याचा अंदाज आहे.

जागावाटपाबाबत शरद पवार यांची सूचना काँग्रेसने
फेटाळली; रिपब्लिकन नेत्यांना चुचकारण्याचा प्रयत्न
मुंबई, १० ऑगस्ट / खास प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालान्वये नव्हे तर २००४च्या विधानसभा निकालाच्या आधारे जागावाटप झाले पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका काँग्रसने फेटाळून लावली असून, स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थिीतीनुसार जागावाटप झाले पाहिजे, असा पवित्रा आज काँग्रेसने घेतला आहे. तसेच रिपब्लिकन ऐक्यानंतर विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप या जातीयवादी पक्षांचा फायदा होईल अशी भूमिका रिपब्लिकन नेते घेणार नाहीत, असा विश्वासही काँग्रेसने व्यक्त केला आहे.

‘अतिरेक्यांचे मृतदेह पाकिस्तानने तात्काळ ताब्यात घ्यावेत’
मुंबई, १० ऑगस्ट/ खास प्रतिनिधी

मुंबईवर २६ नोव्होंबर रोजी पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या नऊ अतिरेक्यांपैकी चारजण पाकिस्तानी असल्याचे पाक सरकारने मान्य केले आहे.भायखळा येथील जे. जे. रुग्णालयात ठेवलेल्या या सर्व अतिरेक्यांचे मृतदेह पाकिस्तानी सरकारने लवकरात लवकर ताब्यात घ्यावे, अशी मागणी केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाने केली असल्याचे गृहमंत्री जयंत पाटील यांनी आज सांगितले.मुंबईवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामधील कसाब हा एकमेव अतिरेकी जीवंत आहे. उर्वरित नऊ अतिरेक्यांचे मृतदेह जे. जे. रुग्णालयात असून ते अधिक काळ ठेवता येणे शक्य नाही. यातील चार अतिरेकी पाकिस्तानी असल्याचे पाक सरकारने मान्य केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही पाकिस्तानी सरकारला हे सर्व मृतदेह लवकरात लवकर नेण्याची विनंती केली आहे. येत्या दहा दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास राज्य शासनाला या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घ्यावा लागेल असे जयंत पाटील यांनी मंत्रालयात पत्रकारांना सांगितले. मुंबईवर यापुढे असा हल्ला होऊ नये यासाठी सर्वप्रकारची काळजी घेण्यात येत असून मुंबईसाठी १००० पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आल्याचे जयंत पाटील म्हणाले. इस्त्रायलला प्रशिक्षणासाठी एक पथक पाठविण्यात आले होते तसेच इस्त्रायलकडून चांगल्या प्रकारची तीन हजार बुलेटप्रुफ जॅकेट घेण्यात येणार आहेत.

‘टोल’माफियांना दणका देऊ - उद्धव ठाकरे
मुंबई, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

आधीच सर्व काही महाग झाले असताना मुंबईकरांवर ‘टोल’च्या रूपाने आणखी ओझे सरकार लादणार असेल तर बिल्डरांप्रमाणे निर्माण झालेल्या नव्या टोलमाफियांविरुद्ध शिवसेना उभी राहील, असा सणसणीत इशारा आज उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबईच्या प्रवेशद्वारावर जास्तीत जास्त ‘टोल’नाके उभारून जनतेकडून खंडणी वसूल करण्याचा परवाना सरकारने मर्जीतील कंत्राटदारांना दिला आहे. सरकारात कायम दलालीची कामे करून भ्रष्टाचाराचे पाटबंधारे वाहणारे एक कंत्राटदार या खंडणीखोरीत सामील असून जनतेची लूट करून राजकारण्यांना त्यातला वाटा देण्याचे हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘‘सध्या जनतेला नागरी सुविधा काहीच नाहीत व सगळ्यांवरच ‘टोल’ व ‘कर’ आकारला जातोय. आता फक्त ‘हवे’वरच कर लावायचे बाकी आहे व सामान्यांना स्वत:च्या घरात या खोलीतून त्या खोलीत जायलाही ‘टोल’ लावतील, अशी परिस्थिती आहे. बिल्डरांची व ‘टोल’वाल्यांची ही माफियागिरी शिवसेना सहन करणार नाही. खंडणीखोरीचे नवे ‘टोल’ नाके शिवसेना उभे राहू देणार नाही. समझने वालोंको इशारा काफी है.’’

सरकारच्या धोरणावर शिक्षणसंस्था चालक नाराज
मुंबई, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाईन फ्लूचा प्रसार होऊ नये याकरिता शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण संस्थांनी घ्यावा या राज्य शासनाच्या जबाबदारी झटकण्याच्या प्रवृत्तीवर शिक्षण संस्थांच्या चालकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. सरकारनेच शिक्षणसंस्था बंद करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. त्याचबरोबर घटकचाचणी रद्द करण्याचीही घोषणा सरकारनेच केली तर पालक व विद्यार्थ्यांवरील ओझे कमी होईल, असे संस्थाचालकांनी सांगितले. मुंबईत सुमारे २७ शाळा चालविणाऱ्या एका शिक्षण संस्थेच्या चालकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, आमच्या शिक्षण संस्थेत ५८ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. सरकारच्या धोरणानुसार आम्ही जर स्वतहून शाळा बंद केली व अन्य शाळा सुरू राहिल्या तर पालकांत असा भ्रम निर्माण होईल की, या संस्थेच्या शाळांमधील काही विद्यार्थ्यांना स्वाईन फ्लूची लागण झाली असल्याने त्यांनी शाळा बंद केल्या. दुसरीकडे मुलांचा अभ्यास बुडतो व ते अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात म्हणून काही पालक हवालदिल होतील व शाळा सुरू करण्याकरिता दबाव टाकतील. त्यामुळे सरकारने सरसकट सर्व शाळा बंद केल्या तरच पालक व विद्यार्थी धास्तावणार नाहीत.

इमरान हाश्मीचे घूमजाव
मुंबई, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

मुस्लिम असल्याने निबण्णा हाऊसिंग सोसायटीने फ्लॅट नाकारल्याचा आरोप करून वादंग माजवणारा सिने अभिनेता इमरान हाश्मी याने घूमजाव केले असून संवादाच्या अभावामुळे चुकीचे वक्तव्य प्रसिद्धी माध्यमांनी प्रसारित केले, अशी सारवासारव त्याने केली आहे. सोसायटीचे पदाधिकारी आणि माझ्यात असलेला वाद आता संपला असून सोसायटीने माझ्याविषयी भेदभाव केलेला नाही, असा खुलासाही इमरानने आज पत्रकारांशी बोलताना केला. इमरान हाश्मी याने सोसायटीविरुद्ध राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे फ्लॅट नाकारल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर आज सुनावणी झाल्यानंतर त्याने अचानक घूमजाव केले. हाश्मीचे वकील माजीद मेनन म्हणाले, हाश्मी धर्माने मुस्लिम असल्याने त्याला सोसायटी फ्लॅटची विक्री करू इच्छित नसल्याचे या व्यवहारात ब्रोकर असलेल्या जगजीत अरोराने हाश्मीला सांगितले होते. त्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला होता. परंतु, सोसायटीचे सचिव जे.पी. छत्री याबाबत हाश्मीजवळ लेखी खुलासा केला असून धर्मावरून भेदाभेद करण्याचा सोसायटीचा कधीही उद्देश नव्हता, असे स्पष्ट केले आहे. तसेच विकणारा जर तयार असेल तर तो फ्लॅट हाश्मी काय कोणत्याही मुस्लिम कुटुंबाला देण्याची सोसायटीची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

मनसेच्या धाडीमुळे सापडली ७० हजार पोती तूरडाळ..
मुंबई, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

तुरीच्या डाळीसह सर्व डाळींचे भाव गगनाला भिडल्यामुळे साठेबाजीला उधाण आले आहे. या साठेबाजांविरुद्ध कारवाईच्या घोषणा होऊनही सरकारकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना साठेबाजांविरोधात मोहीम उघडण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी रायगड जिल्ह्यात आज तूरडाळीची ७० हजार पोती पकडून दिली. रायगड जिल्ह्यातील मनसेचे संघटक गोवर्धन पोलसानी, अभिषेक दरगे, आशिष आंग्रे, शेखर विचारे आदी कार्यकर्त्यांनी खालापूर, वडवळ येथील मयुरेश प्रोटीन या गोदामावर छापा मारला असता तेथे अख्या तुरीची ४० हजार पोती आणि तूरडाळीची ३० हजार पोती आढळून आली. याप्रकरणी मनेसेच्या कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना बोलाविल्यानंतरही त्यांनी येण्यास तसेच कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे गोवर्धन यांनी सांगितले. एकीकडे साठेबाजीला आळा घालण्यास शासनाला अपयश येत असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज यांच्या आदेशानुसार आता साठेबाज शोधण्याची मोहीम उघडली आहे. सरकार डाळीच्या वाढत्या भावाला आळा घालू शकत नाही की साठेबाजांना रोखू शकत नाही, त्यामुळेच मनसेने हा निर्णय घेतला आहे. राज्यात तुरीच्या डाळीचे भाव गगनाला भिडल्यानंतर रेशनवर ५५ रुपये भावाने तुरीची डाळ उपलब्ध करून देण्याचे सरकारने जाहीर केले होते मात्र अद्यापि ५५ रुपये दराने डाळ उपलब्ध करून दिलेली नाही. सरकारकडून केवळ सर्वसामान्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप मनसेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने केला आहे.

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे सहा रूग्ण
ठाणे, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

ठाण्यातील अे.के. जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थीनीला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे निदान झाल्याने काही पालकांनी आज मुख्याध्यापकांना घेराव घालीत तीन दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्यास भाग पाडले. या पालकांच्या उद्रेकानंतर अन्य दोन शाळेतील विद्यार्थ्यांना सोडण्यात आल्याने घबराहटीमध्ये आणखीच भर पडली आहे. आतापर्यंत ठाणे आणि नवी मुंबईत सहा जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवून खास हेल्प लाईन सुरू करण्यात आल्याची
माहिती जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली.