Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

पश्चिम रेल्वेविरुद्ध असंतोष धुमसतोय!
प्रतिनिधी

वारंवार कोलमडणारे लोकलचे वेळापत्रक.. विनावापर उभ्या असलेल्या एमयूटीपीच्या नव्या लोकल.. रखडलेले रेल्वे प्रकल्प.. छोटय़ा-मोठय़ा अपघातांचे वाढते प्रकार.. प्रवाशांमध्ये धुमसत असलेला असंतोष.. कर्मचारीवर्गातील नाराजी.. या साऱ्या गोष्टींमुळे पश्चिम रेल्वेमध्ये सध्या सारे काही आलबेल नाही. ऐकेकाळी वक्तशीरपणा, प्रभावी अंमलबजावणी आणि तत्पर सेवेसाठी नावाजलेल्या पश्चिम रेल्वेविरुद्ध प्रवाशांमध्ये असंतोष धूमसत असल्याचे चित्र आहे.

मुकुंद मॅन्शनमधील महिला आघाडी
प्रिया बापट

आमच्या बिल्डिंगमध्ये मुलांपेक्षा मुलीच जास्त आहेत. त्यामुळे सर्व सण साजरे करण्यात महिलांचाच पुढाकार जास्त असतो. दहीहंडीची वर्गणी काढण्यापासून ते दहीहंडी फोडण्यापर्यंत सर्व कार्यामध्ये मी सक्रिय सहभागी असते. गेली अनेक वर्षे नित्यनेमाने आमच्या बिल्डिंगमध्ये दहीहंडी बांधली जाते. मुकुंद मेन्शनमधील महिला आघाडीची दहीहंडी, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आमच्या बिल्डिंगमध्ये २० घरे आहेत. प्रत्येक घरातून दहा-पंधरा रुपये वर्गणी काढण्यात येते. कीर्तीकर मार्केटमधून दहीहंडी, दोरी, फळे आणण्यात येतात.

‘स्मार्ट’ नागरिक बना!
मुंबईकरांच्या दैनंदिनीतील असंख्य अडचणींना वाचा फोडण्यासाठी अद्ययावत तक्रार निवारण यंत्रणा मुंबई महानगरपालिकेकडे आहे. 1916 या दूरध्वनी क्रमांकावर केवळ एक फोन करून आपली तक्रार नोंदविण्याची सुविधा मुंबईकरांना अक्षरश ‘बारा महिने तेरा काळ’ उपलब्ध आहे. परंतु, या यंत्रणेबाबत प्रचार आणि प्रसार झाला तर महापालिकेची अकार्यक्षमता आणि कारभारातील त्रुटी उघड होतील, या भीतीपोटीच की काय या यंत्रणेला पालिकेने प्रसिद्धी दिलेली नाही. पालिकेच्या कारभारात ‘पारदर्शकता’ आणण्यासाठी ‘रामबाण’ ठरू शकेल अशा या यंत्रणेचे महत्त्व सुधीर बावकर यांनी ओळखले.

पुष्कर-प्रसाद दिग्दर्शनाच्या वाटेवर
सुनील डिंगणकर

मुंबईचा पुष्कर श्रोत्री आणि पुण्याचा प्रसाद ओक एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी २५ दिवस नेपाळमध्ये होते. रुम पार्टनर असल्यामुळे भरपूर गप्पा होत असत. कविता, गाणी आणि दुसऱ्याची टर उडवणे या तीन समान आवडी असल्याने त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये त्यांनी सोबत काम केले. आता हे दोघेही ‘हाय काय, नाय काय’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. अभिनयाबरोबरच या दोघांच्या दिग्दर्शनाचा श्रीगणेशाही या चित्रपटापासून होत आहे.

ढसाळांच्या निवडक कविता लवकरच हिंदूीत
शेखर जोशी

जीवनातील दाहक आणि भेदक वास्तवाला आपल्या कवितांमधून शब्दरुप देऊन मराठी साहित्य विश्वात आपली स्वतंत्र ओळख आणि स्थान निर्माण केलेले नामदेव ढसाळ यांच्या काही निवडक कविता आता लवकरच हिंदूीत अनुवादित होणार आहेत. ज्येष्ठ कवी-समीक्षक चंद्रकांत पाटील हे ढसाळ यांच्या कवितांचा हिंदीत अनुवाद करत आहेत. पाटील यांनी ढसाळ यांच्या काही कवितांचा हिंदूी अनुवाद यापूर्वी काही नियतकालिकांसाठी केला होता.

‘कोटक-इन-सर्च-ऑफ-एक्सलन्स’ शिष्यवृत्ती
प्रतिनिधी

कोटक एज्युकेशन फाऊंडेशन (केईएफ) या स्वयंसेवी संस्थेतर्फे मुंबई आणि रायगडमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थी तसेच युवकांना शिक्षण घेता यावे यासाठी आर्थिक साहाय्य केले जाते. शिक्षण घेणे आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्यामुळे अनेकदा मुलांना शिकायला मिळत नाही. अशा शाळकरी मुलांना तसेच युवकांना ही संस्था आर्थिक मदत करते. याअंतर्गत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमाला ‘लोकसत्ता’चे संपादक कुमार केतकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ३४ विद्यार्थ्यांना ‘कोटक-इन-सर्च-ऑफ-एक्सलन्स’ ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

‘कॅम्लिन’तर्फे इकोफ्रेण्डली सजावट कार्यशाळा
प्रतिनिधी

गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाची काळजी घेतली जावी व मुलांच्या कल्पनाशक्तीला योग्य चालना मिळावी यासाठी ‘कॅम्लिन’तर्फे १४, १५ व १६ ऑगस्ट रोजी ‘इकोफ्रेंडली’ सजावटी संदर्भातील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलुंड येथील रोटरी क्लबच्या सहाय्याने मुलुंड जिमखान्यात १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.००, १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० व १६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० यावेळेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्यदिनी ‘क्लीन-अप मॅरेथॉन’
प्रतिनिधी

येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून ‘नटुरा आऊटडोअर एज्युकेशन ट्रस्ट’तर्फे ‘द ट्रश डॅश’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘द ट्रश डॅश’मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘क्लीन-अप मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात येणार आहे. या मॅरेथॉन अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरातील कचरा गोळा करण्यात येणार आहे. ‘द ट्रश डॅश’ या कार्यक्रमाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. यावर्षी या कार्यक्रमात ७५० नागरिक सहभागी होणार असून या परिसरातून सुमारे पाच टन कचरा गोळा करण्यात येईल असा अंदाज संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईतील ४० जणांनी एकत्र येऊन सुरू केलल्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षी या उपक्रमांतर्गत सुमारे १० टन कचरा गोळा करण्यात आला होता. यावर्षी या उद्यानाच्या बोरिवली आणि येऊर या दोन्ही ठिकाणांहून या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. बोरिवली येथे ५००, तर येऊर येथे सुमारे २५० नागरिक या अभियानात सहभागी होतील, असेही संस्थेने कळविले आहे.

टेबल टेनिस स्पर्धेत ममता, ओंकारचे यश
प्रतिनिधी

डोंबिवली येथील यश जिमखान्यात आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात मुंबईचा ओंकार तोरगलकर याने, तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या ममता प्रभू हिने यश मिळविले आहे. या दोघांनी सरळ लढत देऊन टॉपस्पिन, बॅकहॅण्ड आणि फोरहॅण्ड करत ही स्पर्धा जिंकली.
ज्युनिअर गर्ल्स गटात नागपूरच्या मल्लिका भांडारकर, पुरुष गटात ठाण्याच्या आकाश दामले, युवा तरुण गटात पुण्याच्या सन्मय परांजपे, युवती गटात ठाण्याच्या प्रीती मोकाशी हिने यश मिळवले आहे. यशस्वी स्पर्धकांना नगरसेवक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते चषक, स्मृतिचिन्ह आणि बक्षिसांची रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी यतिन टिपणीस, सचिन चिटणीस, शिरीष बेणारे, राजून वडनेरकर, दिलीप वडनेरकर उपस्थित होते.