Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

आयुक्तांनी मागितली सभागृहाची माफी
वैद्यकीय अधिकाऱ्याची वेतनश्रेणी चुकीची
नगर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी
सत्ताधारी व विरोधक असा सामना होण्याऐवजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज सर्व नगरसेवक व प्रशासन अशी लढाई झाली. दीड कोटी खर्चाच्या बंद पाईप गटार कामाची तपासणी करण्यासाठी प्रशासनाला सर्वपक्षीय पाहणीला मान्यता द्यावी लागली व वैद्यकीय अधिकाऱ्याची वेतनश्रेणी चुकीची नमूद केल्याबद्दल तर सभागृहाची माफीच मागावी लागली.

उपाध्यक्ष कोल्हेंची अध्यक्ष ससाणेंवर टीका
‘संस्थानमध्ये विश्वासात घेत नाहीत’
राहाता, १० ऑगस्ट/वार्ताहर
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे आपणाला विश्वासात न घेताच अनेक निर्णय घेतात. संस्थानमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना सापत्नपणा व काँग्रेसच्या नेत्यांचा मात्र मानसन्मान केला जात असल्याचा थेट आरोप संस्थानचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी केला. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आता स्थानिक संस्थांमध्येही काँग्रेस व राष्ट्रवादीचे संबंध ताणत असल्याने खळबळ उडाली आहे.

साखर आणखी महागली!
नगर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

गेल्या आठवडय़ात साखरेचे दर क्विंटलमागे दोन्ही रुपयांनी वधारले. आज पुन्हा २०० रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे साखरेचा किरकोळ विक्रीचा दर ३० रुपयांच्या पुढे सरकला आहे.सणासुदीमुळे साखरेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी केंद्र सरकारने या महिन्यासाठी उपलब्ध केलेला १६ लाख ५० हजार टनांचा कोटाही अपुरा पडला आहे. मागणी वाढल्याने गेल्या आठवडय़ात साखरेच्या दरात क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली होती. आज पुन्हा २०० रुपयांनी दरवाढ झाली.

..तर मुख्यमंत्र्यांनाही न्यायालयात खेचू - पिचड
आदिवासींचा राजूरला ‘रास्ता रोको’
राजूर, १० ऑगस्ट/वार्ताहर
खऱ्या आदिवासींची भाकरी कुणी हिसकावण्याचा प्रयत्न केल्यास उभा महाराष्ट्र पेटून उठेल. धर्माध शक्तींच्या पुढाऱ्यांचे ऐकून ९५च्या अध्यादेशाला मुदतवाढ दिल्यास मुख्यमंत्र्यांनाही न्यायालयात खेचू, असा इशारा अ. भा. आदिवासी विकास परिषदेचे नेते आमदार मधुकरराव पिचड यांनी आज दिला. आदिवासी विकास परिषद, महादेव कोळी संघटना, आदिवासी विद्यार्थी संघटना व कर्मचारी संघटनांनी राजूर येथे काळे झेंडे दाखवत व काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला.

टंचाईग्रस्त गावांच्या यादीत नगरचा समावेश नाही!
आढावा बैठकीत आमदारांकडून नाराजी
नगर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी
जिल्ह्य़ात पावसाअभावी गंभीर टंचाई परिस्थिती असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी पाणी, चारा व मजुरांना काम उपलब्ध करण्यासाठी दर सोमवारी आढावा बैठक घ्यावी, असा आदेश शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज दिला. राज्य सरकारने जाहीर केलेल्या टंचाईग्रस्त यादीत जिल्ह्य़ातील एकाही तालुक्याचा समावेश न केल्याने आमदार व पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत नजर आणेवारीने पीक पाहणी करण्याची मागणी केली.

श्रीनाथ पतसंस्थेच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन
नगर, १० ऑगस्ट/वार्ताहर
राज्यात सहकार चळवळीच्या वाईट काळात श्रीनाथ नागरी पतसंस्थेने अडचणीतील कोपरगावची सुवर्ण नागरी पतसंस्था घेऊन ठेवीदारांना जीवदान दिले. श्रीनाथ पतसंस्था ही सहकार चळवळीतील आदर्श असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील श्रीनाथ पतसंस्थेच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले होते. या वेळी माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा उपनिबंधक के. डी. वाबळे, जिल्हा कृषी अधीक्षक घावटे, नगर बाजार समितीचे सभापती भानुदास कोतकर, संपदा पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे, रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पवार, राजीव गांधी पतसंस्थेचे अध्यक्ष उद्धव दुसुंगे, सह्य़ाद्री पतसंस्थेचे अंबादास गारुडकर, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब शेळके, प्रताप शेळके, डॉ. बबनराव डोंगरे, संपतराव गुंजाळ उपस्थित होते.

बँकेची बदनामी केल्याचा काही संचालकांवर ठपका
नगर अर्बन बँक सर्वसाधारण सभा
नगर, १० ऑगस्ट / प्रतिनिधी
सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नांचे भांडवल करून नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष, खासदार दिलीप गांधी यांनी ‘प्रथम मोटर्स’ व ‘लोढा हाइट्स’ च्या वादग्रस्त कर्जप्रकरणांबाबत संचालक मंडळातील अंतर्गत विरोधकांना प्रत्युत्तर दिले. अर्धवट माहितीच्या आधारावर बँकेची बदनामी केल्याचा ठपका त्यांनी काही संचालकांवर नाव न घेता ठेवला.बँकेची ९९ वी वार्षिक सभा आज सायंकाळी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात तब्बल दोन तास चालली. अध्यक्षस्थानी गांधी होते.

कोपरगावच्या महालक्ष्मी पतसंस्थेत २८ लाख रुपयांचा गैरव्यवहार
संचालकांसह ४४ जणांवर गुन्हा
कोपरगाव, १० ऑगस्ट / वार्ताहर
येथील श्रीमहालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे १८ संचालक आणि बचत ठेव गोळा करणारे २६ एजंट अशा तब्बल ४४ जणांविरुद्ध २७ लाख ८५ हजार १९९ रुपयांच्या अफरातफरीचा गुन्हा आज पोलिसांत दाखल झाला. लेखापरीक्षक पांडुरंग गायकवाड यांनीच ही फिर्याद दिली आहे.सरकारी लेखापरीक्षणात हा गैरव्यवहार उघडकीस आला. संबंधित ४४ जणांवर संगनमताने नोंदींमध्ये खाडाखोड केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अनिल आमले, बाबाराव इंगळे, वसंत आमले, दीपक चौधरी, अविनाश शिवशरण, अरुण मुठाळ, भाऊसाहेब दुखंडे, साहेबराव खैरनार, अशोक गगे, सारिका महेंद्र पाटणी, संस्थेचा व्यवस्थापक लक्ष्मीकांत ठोंबरे यांच्यासह ४४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दि. १ एप्रिल २००३ ते ३१ मार्च ०८ दरम्यान कुटुंब मंगल ठेव योजनात हा गैरव्यवहार झाला आहे. दरम्यान, या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ग्रामोद्योग संघाच्या सचिवास लाच घेताना रंगेहाथ पकडले
संगमनेर, १० ऑगस्ट/वार्ताहर
कर्जप्रकरण मंजुरीसाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना येथील विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाचे सचिव सतीश दुसाने यांना अटक करण्यात आली. तालुक्यातील चिंचोली गुरव येथील शेतकरी सतीश गोडगे यांनी टेलिरग व्यवसाय सुरू करण्यासाठी पंतप्रधान स्वयंरोजगारनिर्मिती कार्यक्रमांतर्गत राज्य खादी ग्रामोद्योग महासंघाकडे दीड लाखाचे कर्जप्रकरण सादर केले होते. हे प्रकरण मंजूर करण्यासाठी आरोपी दुसाने याने पाच हजार रुपये मागितले. त्यावर गोडगे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे पोलीस उपअधीक्षक विजय धोपावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज येथे सापळा लावला. ठरलेल्या रकमेपैकी आज तीन हजार रुपये देण्याचे कबूल केले होते. गोडगे यांच्या तक्रारीनुसार सापळा लावण्यात आला होता. त्यात सतीश दुसाने अलगद अडकला. याबाबत धोपावकर यांनी संगमनेर पोलिसांत रात्री उशिरा तक्रार दाखल केली. त्यावरून दुसाने यास अटक करण्यात आली.

माहितीचा अधिकार कायदा साखर कारखान्यांना लागू
कोपरगाव, १० ऑगस्ट / वार्ताहर

माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत माहिती देणे साखर कारखान्यांना बंधनकारक असून, ही जबाबदारी कार्यकारी संचालकांची आहे, असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले.सातवारी टाकळी येथील विजय सुधाकर जाधव यांनी माहितीच्या अधिकाराखाली कोसाका संदर्भात माहिती मागवली होती. कारखान्याने हा कायदा लागू नसल्याचे लेखी दिले. नंतर जाधव यांनी साखर आयुक्तांकडे माहिती मागितली. आयुक्तांनी हा कायदा साखर कारखान्यांना लागू असून, माहिती देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोपरगाव बाजार समितीत कांदा चाळ कक्ष सुरू
कोपरगाव, १० ऑगस्ट / वार्ताहर
येथील बाजार समितीत कांदा चाळ कक्ष सुरू करण्यात आला असून, शेतक ऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन उपसभापती संजय शिंदे यांनी केले आहे. कांदा चाळ अनुदानसाठी लागणारे नमुना अर्ज, आराखडे व इतर माहिती कार्यालयीन वेळेत या कक्षात मिळेल. शेतक ऱ्यांनी कांदा चाळीचे प्रस्ताव दोन प्रतींत सादर करावेत, असे शिंदे यांनी सांगितले.

पिंप्रीत विद्यालयातील सहा संगणकांची चोरी
राहाता, १० ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील पिंप्री निर्मळ येथील ‘रयत’च्या विद्यालयात संगणक कक्षाच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी ३८ हजारांचे ६ संगणक चोरून नेले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. ‘रयत’च्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ही चोरी झाली. चोरटय़ांनी सहा संगणक, मॉनिटर, सीपीओ, की बोर्ड, यूपीएस हे साहित्य चोरले. विद्यालयाचे शिक्षक पंढरीनाथ राऊत यांनी फिर्याद दिली. लोणी पोलिसांनी गुन्ह्य़ाची नोंद केली. मध्यंतरी लोणी येथील महाविद्यालयातही संगणक संचाची चोरी झाली होती. संगणक संच चोरणारी टोळी या भागात सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

‘आरोपी माळीला मदत करणाऱ्यांवरही गुन्हे नोंदवा’
राहुरी, १० ऑगस्ट/वार्ताहर
अट्टल गुन्हेगार सुभाष माळी याला मदत करणाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अन्यायग्रस्त नागरिकांनी केली आहे.तथाकथित पुढाऱ्यांच्या पाठबळामुळे गुन्हेगार माळीने अनेक गुन्हे केले. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या माळीची कसून चौकशी केल्यास, अनेकांचे पितळ उघडे पडेल. शहरातील अनेक नागरिकांची दुचाकी वाहने चोरीस गेली असून, ती बासगाव नांदूर परिसरात लपवून ठेवल्याची माहिती पुढे आली आहे.वाहनचोरीच्या अनेकांनी तक्रारी दिल्या, तर काहींनी देण्याचे टाळले. माळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शेती महामंडळाच्या व्यवस्थापकास जीवे मारण्याची धमकी
कोपरगाव, १० ऑगस्ट/वार्ताहर

शेती महामंडळाच्या शेतजमिनीत अतिक्रमणे करून मकापिकाची लागवड करताना अटकाव केला, म्हणून स्थावर इस्टेट शेती व्यवस्थापकास शिवीगाळ, धक्काबुक्की व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तालुक्यातील साकरवाडी शिवारात शेती महामंडळाच्या गट क्रमांक ८६मध्ये आरोपी प्रकाश सदाशिव करडे, नितीन प्रकाश करडे, शुक्लेश्वर गुलाब आहेर (सर्व कान्हेगाव, कोपरगाव), भरत धोंडीबा करडे व धृपद धोंडीबा करडे (चितळी, तालुका राहाता) यांनी महामंडळाच्या चार एकर जमिनीत अतिक्रमण करून मकापिकाची लागवड करीत असताना व्यवस्थापक अशोक रामचंद्र कोल्हे यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या पाचजणांनी त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे कोल्हे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

‘सरकारच्या पवित्र्यामुळे आदिवासींमध्ये वेगळा वाद’
संगमनेर१० ऑगस्ट/वार्ताहर
बनावट आदिवासी प्रकरणी अयोग्य निर्णय घेतल्यास मुख्यमंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार पिचड यांनी येथेही पत्रकारांशी बोलताना दिला. बनावट आदिवासी प्रश्नी राज्य सरकार चुकीचा निर्णय घेण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे राज्यातील आदिवासींमध्ये वेगळा वाद सुरू झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी चुकीच्या आदिवासींना बोलावून चर्चा केली. मात्र, खऱ्या आदिवासींमध्ये त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे नेते नितीन गडकरी, कम्युनिस्ट आमदार नरसय्या आडम यांनीही याच अनुषंगाने पत्रे दिली आहेत. त्यांच्या या मागणीला मंत्री गावित व मी विरोध केल्याने ठाण्यात आमचे पुतळे जाळण्यात आल्याचे श्री. पिचड यांनी सांगितले.

लेखणीबंद आंदोलन करून धुळ्यातील घटनेचा निषेध
नगर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी
धुळे येथे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आज येथे लेखणीबंद आंदोलन केले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष योगीराज खोंडे यांच्या नेतृतखाली सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्वलगन यांना याबाबतचे निवेदन दिले. माजी आमदार अनंत तरे यांनी धुळे येथे निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश वाघमोडे यांना धक्काबुक्की केली. कोळी समाजाचा मोर्चा घेऊन ते आले होते. चर्चा करताना त्यांनी हा प्रकार केला. मोर्चातील लोकांनी नंतर वाघमोडे यांच्या कार्यालयाची नासधूस केली, अशी माहिती खोंडे यांनी दिली. तरे यांच्यासह अन्य दोषींवर कारवाई झाली नाही, तर संघटना राज्यस्तरीय आंदोलन करेल, असा इशारा डॉ. अन्वलगन यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

पोलीस भरती स्थगित असतानाही इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी
नगर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी
पोलीस भरती स्थगित झाली असतानाही आज पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाने ६ हजार ८१५ उमेदवारांचे अर्ज स्वीकारले.पोलीस अधीक्षक सुहास राणे यांच्या नेतृत्वाखाली अर्ज स्वीकारण्यात आले. एकूण ९ हजार ७९३ अर्ज विकले गेले होते. त्यापैकी ६ हजार ८१५ अर्ज आले. त्यात ५७४ महिलांचा समावेश आहे. स्वाइन फ्लूच्या पाश्र्वभूमीवर राज्यभरात पोलीस भरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र तरीही उमेदवारांनी भरतीसाठी आज हजेरी लावली. तारीख जाहीर झाल्यानंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येतील, असे सांगण्यात आले.

हमालांचा गुरूवारी संप
नगर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी
हमालांच्या हक्कासंदर्भात येत्या गुरूवारी (दि. १३) हमालांचे कामकाज बंद राहणार असल्याने या दिवशी शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी भुसार बाजारात आणू नये, तसेच कांद्याचे लिलावही होणार नाहीत, अशी माहिती नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानुदास कोतकर यांनी दिली.

विमल चोभे यांचे निधन
नगर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी
नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील विमल गुलाबराव चोभे यांचे रविवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती, तीन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. नगर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष व ‘लोकसत्ता’चे नगर तालुका वार्ताहर लहू चोभे यांच्या त्या मातुश्री होत.

अध्यक्षपदी औताडे
श्रीरामपूर, १०ऑगस्ट/प्रतिनिधी

अशोक शिक्षण संस्था सेवक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भागचंद औताडे, तर उपाध्यक्षपदी विलास शिरसाठ यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या कर्ज समितीवर दत्तात्रय वाघमोडे व अरु ण थोरात यांची निवड झाली.