Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

नवनीत

जी व न द र्श न
नजरेचा नजराणा

 

देवाचा सेवक मोझेस रानात मेंढरे चारीत होता. त्यावेळी तो चिंतन, मनन करीत होता. एकदा प्रार्थना करता करता तो उन्मनी अवस्थेला पोहोचला. स्थळकाळाच्या बंधनापासून तो क्षणभर मुक्त झाला. तो क्षण त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. आपल्या समोरील झुडूप अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे, त्याच्यातून अग्नीच्या जिभा लवलवत आहेत असे त्याला जाणवले; परंतु त्याची पालवी मात्र हिरवीगार होती. तिला आच पोहोचत नव्हती. मोझेस अनिमिष नेत्रांनी त्या वृक्षाकडे पाहातच राहिला. अचानक त्याला एक अगम्य अशी वाणी ऐकू आली, ‘मोझेस, मोझेस’. त्याने उत्तर दिले, ‘काय आज्ञा?’ देव बोलला, ‘इकडे जवळ येऊ नको. तू आपल्या पायातील जोडे काढ. कारण ज्या भूमीवर तू उभा आहेस ती पवित्र आहे.’ देवाच्या दर्शनामुळे मोझेस भारावून गेला. त्याने आपला चेहरा झाकला. ‘जुलमाखाली जाचलेल्या माझ्या लोकांना मुक्त करण्यासाठी मी तुला निवडले आहे’, देव म्हणाला. मोझेसची भीतीने गाळण उडाली. त्याने विचारले, ‘तुझे नाव काय?’ देवाने उत्तर दिले, ‘मी जो आहे तो!’
‘अस्तित्वस्वरूप’ हीच परमेश्वराची व्याख्या आहे. तेच त्याचे नाव आहे. त्याला भूतकाळ नसतो नि नसतो भविष्यकाळ. त्याच्यासाठी एकच काळ- वर्तमान. तो आहे. त्याला लाख लाख डोळे असून, तो नित्य पाहात असतो. जे जे अस्तित्वात आहे त्याच्यावर त्याची नजर असते. म्हणूनच त्याला सर्वसाक्षी म्हणतात. माणसाचे अस्तित्व म्हणजे देवाच्या नजरेच्या टप्प्यात असणे होय. पोप बेनेडिक्ट यांनी म्हटल्याप्रमाणे, ”Man’s living is a being seen. काहींना देवाची नजर जाचक वाटते, कारण तो आपले स्वातंत्र्य मर्यादित करतो, असे त्यांना वाटते. अ‍ॅडम आणि इव्ह यांच्या हातून पाप घडले तेव्हा आपण देवाच्या नजरेस पडू नये म्हणून ती लपून बसली. बुभुक्षूंना देवाची नजर कासवीच्या नजरेसारखी वाटते. कासवी दूर सागरात असते; परंतु आपल्या नजरेने ती पिलांचे पोषण करीत असते. कळय़ांची फुले करणाऱ्या पहाटकिरणांसारखी देवाची नजर माणसाला फुलविणारी असते.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो
francised43@gmail.com

कु तू ह ल
गुरुत्वीय भिंग
गुरुत्वीय भिंग हे कसले भिंग आहे?
एखाद्या किंताऱ्याच्या (क्वेसार) किंवा दीर्घिकेच्या आणि आपल्या दरम्यान प्रचंड वजन असणारी वस्तू असली तर किंताऱ्याकडून येणाऱ्या प्रकाशावर या वस्तूच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होतो. व्यापक सापेक्षतावादानुसार होणाऱ्या या परिणामामुळे किंताऱ्याकडून येणाऱ्या प्रकाशकिरणांचा मार्ग बदलतो. प्रकाशकिरणांच्या या मार्गबदलामुळे त्या दूरस्थ किंताऱ्याच्या एकाहून अधिक प्रतिमा निर्माण होतात. काहीवेळा या प्रतिमांचं मिळून एखादं गोलाकार कडं निर्माण झालेलं दिसतं. या प्रतिमा मूळ किंताऱ्यापेक्षा किंवा दीर्घिकेपेक्षा मोठय़ा आणि अधिक तेजस्वी दिसतात. भिंगामुळे होणाऱ्या प्रकाशाच्या अपवर्तनासारखाच हा परिणाम असल्यामुळे या प्रकाराला गुरुत्वीय भिंग म्हणून ओळखलं जातं. भिंगासारखा परिणाम घडवून आणणारी वजनदार वस्तू ही एखादी दीर्घिका वा एखादं कृष्णविवरही असू शकतं. असा परिणाम घडून येण्याचा अंदाज प्रथम ओरेस्ट च्वोलसोन या रशियन शास्त्रज्ञाने इ.स. १९२४ साली व्यक्त केला होता. (इ.स. १९३६ साली खुद्द आईन्स्टाईननेही अशी शक्यता
वर्तवली होती.)
अशा प्रकारच्या गुरुत्वीय भिंगाचा पहिला शोध इ.स. १९७९ साली लागला. सप्तर्षी तारकासमूहातील सुमारे ८ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावरील किंताऱ्यांची जोडी ही मुळात एकाच किंताऱ्याच्या दोन प्रतिमा असल्याचे स्पष्ट झाले. या दोन प्रतिमांच्या निर्मितीला कारणीभूत ठरणारी दीर्घिका ही प्रचंड आकाराची दंडगोलाकृती दीर्घिका आहे. आपल्या आणि किंताऱ्यांच्या दरम्यान वसलेल्या या दीर्घिकेचं आपल्यापासूनचे अंतर ५.४ अब्ज प्रकाशवर्षे इतके आहे. गुरुत्वीय भिंगाच्या या पहिल्या शोधानंतर आतापर्यंत शंभराहून अधिक गुरुत्वीय भिंगे सापडली आहेत. गुरुत्वीय भिंगाचे वेध हे आता जमिनीवरून दुर्बिणीबरोबरच अंतराळातूनही घेतले जात आहेत. हबल अंतराळ दुर्बिणीद्वारे संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी अशा गुरुत्वीय भिंगांची संख्या ही तब्बल पाच लाखांच्या आसपास असावी, असा अंदाज व्यक्त केला आहे.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
अभिनव बिंद्रा
११ ऑगस्ट २००८ हा हिंदूुस्थानच्या क्रीडा इतिहासातील सोनेरी दिवस. अभिनव बिंद्रा याने १०० कोटींच्यावर असलेल्या भारतीयांचे १०० वर्षांपासून पाहिलेले स्वप्न बीजिंगमध्ये साकार केले. याच दिवशी अभिनव बिंद्राने दहा मीटर एअर रायफल प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. कारण त्याचे हे वैयक्तिक सुवर्णपदक भारताच्या ऑलिम्पिक इतिहासातले पहिले वैयक्तिक सुवर्णपदक ठरले आहे. त्याच्या नेमबाजीचा आलेख सतत उंचावणारा आहे. वयाच्या १५ व्या वर्षीच १९९८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील युवा खेळाडू असा मान मिळवला. २००१ च्या म्युनिक येथे विश्व नेमबाजीत कांस्यपदक पटकावून तो प्रकाशात आला. २००२ च्या मॅन्चेस्टर राष्ट्रकुल स्पर्धेतून सुवर्ण आणि रौप्यपदकांची कमाई केली. या कामगिरीची दखल घेऊन त्याला ‘राजीव गांधी’ खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. २००४ मध्ये मात्र अथेन्स ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळाल्याने तो काहीसा निराश झाला. पण बीजिंग ऑलिम्पिकने त्याला अगदी झपाटून टाकले होते. पाठदुखीच्या आजाराने त्रस्त असूनसुद्धा त्याने कसून सराव केला. अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत सुरुवातीला तो तिसऱ्या क्रमांकावर होता. मग दुसरी, पहिली अशी आघाडी घेत ७००.५ गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
वाळूचा किल्ला
वाळूचा प्रचंड मोठ्ठा किल्ला तयार झाला. हसन आणि अमन दोघेही थकून वाळूत उताणे झाले. सकाळपासून त्यांची निर्मिती सुरू होती. किल्ला झाला आणि दोघांनाही भुकेची जाणीव झाली. दुपारही होऊन गेली होती. उन्हं तापली होती. त्याचे चटके आता जाणवायला लागले. स्वत:च्या कलेकडे दोघे समाधानाने पाहात होते. वाळू चकाकत होती. लाटा किनाऱ्यावर येऊन फुटत होत्या. अमनला वाटले, आज सकाळपासून आतापर्यंत आपण हसनशी किती कमी बोललो असू, कारण शब्दांवाचूनच एकमेकांची इच्छा त्यांना कळत होती. हात काम करीत होते. बादली, खोरे एवढेच साहित्य मदतीला होते. किल्ला तयार होत होता. त्याबरोबर दोघांमध्ये एक वेगळीच जवळीक, समज आकार घेत होती. अमनला वाटले, आज आपण हसनभय्याच्या जेवढे जवळ मनाने आणि हृदयाने आलो तेवढे कधीच आलो नव्हतो एका घरात राहून. बरं झालं, आज सकाळीच उठून त्याच्या मोटारबाईकवरून समुद्रकिनारी आलो. हसन शिक्षणासाठी परदेशात निघाला होता. अम्मी आणि अब्बू दोघे त्याच्या प्रवासाच्या तयारीच्या गडबडीत होते. अमनला वाटले, जायच्या आधी एक संपूर्ण दिवस हसनबरोबर घालवूया. पुन्हा लवकर भेट होणार नाही. घराची सुरक्षितता, ऊब सोडून तो मोठय़ा, खऱ्याखुऱ्या जगात निघालाय. तेथे त्यालाच सगळय़ाला तोंड द्यायचे आहे. अगदी एकटय़ाने! आणि मी मात्र आता इथे माझ्या स्वप्नांना कुरवाळत एकटाच शाळेत जाईन. अम्मी-अब्बू आता जरा थकले आहेत. त्यांचीही काळजी मला एकटय़ालाच घ्यावी लागेल. अमनने हसनचा हात हातात घेतला. तो हलक्या आवाजात म्हणाला, ‘भाई, तू परत येशील तेव्हा सगळे असेच असेल ना रे? यापूर्वी इतक्या काळासाठी तू घर सोडून कधीच गेला नव्हतास. आता येशील तेव्हा घरी सगळं कसं असेल?’ हसन गप्प राहिला. समुद्राच्या लाटा उंच होत चालल्या होत्या. रोरावत त्या किनाऱ्यावर येऊन फुटत होत्या. शुभ्र फेस पसरत होता. लाटा हळूहळू त्यांनी स्वत:साठी उभारलेल्या वाळूच्या किल्ल्याकडे येत होत्या. पाणी किल्ल्यापर्यंत येत होतं. हळूहळू किल्ला भोवतीच्या वाळूत एकरूप होऊ लागला. त्याच्याकडे पाहात हसन हलकेच म्हणाला, ‘आहे तसं काहीच कायम राहात नाही अमन. बदल होतातच.’ वस्तू गोळा करून तो उठला. अमनचा हात धरून घराकडे निघाला. वाळूत उठणारी त्यांची पावले पाण्याने पुसून जात राहिली.
कुठलीच गोष्ट कायम राहात नाही. निसर्गात आणि जीवनात बदल घडतातच. ते आपण आनंदाने स्वीकारायला शिकले पाहिजे. आजचा संकल्प : मी बदल स्वीकारेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com