Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

स्वाईन फ्ल्यू तपासणीसाठी उसळली गर्दी
नवी मुंबई/प्रतिनिधी -
एरवी सरकारी रुग्णालय म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयाकडे पाठ फिरविणाऱ्या उच्चभ्रूंपासून थेट झोपडपट्टय़ांमध्ये राहणाऱ्या गरिबांपर्यंत शहरातील सर्व स्तरातील नवी मुंबईकरांनी आज सकाळपासूनच महापालिका रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. नवी मुंबईत नेरुळ आणि कोपरखैरणे येथे स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळल्याने शहरात काहीसे घबराटीचे वातावरण पसरले आहे.

मुस्लिम कलाकाराने साकारली अमरनाथची प्रतिकृती!
पनवेल/प्रतिनिधी

कलेला कोणताही धर्म नसतो, याची प्रचिती मुंबईतील बादशाह या कालाकाराने दिली आहे. येथील प्रसिद्ध श्री विरुपाक्ष मंदिरामध्ये श्री अमरनाथ सेवा मंडळातर्फे श्रावणी सोमवारनिमित्त श्री अमरनाथ येथील शिवलिंगाची प्रतिकृती उभारण्यात आली असून, ती पाहण्यााठी भाविकांची रीघ लागली आहे. बर्फाच्या या चार फुटी प्रतिकृतीला भाविक मनापासून दाद देत आहेत. विशेष म्हणजे या प्रतिकृतीचा कलाकार मुस्लिम आहे, हे कोणालाही ठाऊक नाही. १९९२ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळातर्फे दरवर्षी अमरनाथ यात्रेचे आयोजन केले जाते. आजच्या घडीला या मंडळाचे ४५० कार्यकर्ते आहेत. २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महापुरादरम्यान या मंडळाने ३० वैद्यकीय शिबिरे आयोजित करून, तसेच अन्य आपत्कालीन सेवा पुरवून सामाजिक जबाबदारी निभावली होती. गेली १९ वर्षे ही यात्रा निर्विघ्न पार पडल्याने यंदा प्रथमच या मंदिरात श्री अमरनाथ शिवलिंगाची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आणि त्यासाठी बादशाह या कलाकाराला आमंत्रित करण्यात आले. बादशाहने कौशल्य पणाला लावून चार फुटी बर्फाचे शिवलिंग साकारले. हे शिवलिंग दोन दिवस टिकणार आहे. ज्या भाविकांना प्रत्यक्ष अमरनाथ येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हा उपक्रम केल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुनील आचोलकर यांनी सांगितले.

नवी मुंबईत भाजपतर्फे जेल भरो आंदोलन
बेलापूर/वार्ताहर

९ ऑगस्ट रोजी क्रांतीदिनानिमित्त भाजपतर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आघाडी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करीत जेल भरो आंदोलन करण्यात आले. यावेळी ५०० कार्यकर्त्यांना अटक करून सोडण्यात आले. या जेल भरोचे नेतृत्व भाजप प्रदेश नेते सुरेश हावरे यांनी केले. गेल्या ४० वर्षांत राज्यावर आघाडी सरकारची सत्ता असताना दिवसेंदिवस महागाईत वाढ होत आहे. मागील १० वर्षांत एक मेगाव्ॉट वीजनिर्मिती न करणाऱ्या सरकारने भारनियमन करून जनतेला अंधारात लोटले. नवी मुंबईत दिवसाढवळ्या होत असलेली लुटमारी, घरफोडय़ा यामुळे नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. देशावरील दरडोई कर्जाचा बोजा वाढत आहे.यामुळे अशा आघाडी सरकारला चले जाव म्हणण्याची वेळ आल्याचे हावरे म्हणाले. याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष भगवान ढाकणे, सरचिटणीस सी.व्ही. रेड्डी आदींनी भाषणे केली. नंतर सर्व कार्यकर्त्यांनी रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी सर्वांना अटक केली. यामुळे काही काळ चौकात वाहतूक विस्कळीत झाली होती.

‘देशाला स्वाईन फ्ल्यूपेक्षा अतिरेक्यांच्या फ्ल्यूचा मोठा धोका’
बेलापूर/वार्ताहर

देशात सध्या नागरिकांनी स्वाईन फ्ल्यूचा धसका घेतला आहे; मात्र या फ्ल्यूपेक्षा देशाला अतिरेक्यांच्या ‘फ्ल्यू’चा मोठा धोका असल्याचे मत हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ते रमेश शिंदे यांनी वाशी येथे जाहीर धर्मजागृती सभेत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश नेते सुरेश हावरे, दोपहर का सामनाचे संपादक प्रेम शुल्क, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आदी मान्यवर उपस्थित होते. अतिरेकी कसाबला प्रसारमाध्यमांनी सेलिब्रेटी आतंकवादी बनवले आहे. क्रांतीदिनी गांधींनी ‘चले जाव’चा संदेश दिला होता, आता काँग्रेस परदेशी कंपन्यांना ‘चले आव’चा संदेश देत देशाला बुडवत आहे, असे शिंदे म्हणाले. हिंदू समाजात राजनैतिक जागृतीचा अभाव आहे. हिंदूंनी एकत्र येऊन या स्थितीत सुधारणा केली पाहिजे. निधर्मीवादाच्या नावाखाली हिंदूंचे खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप सुरेश हावरे यांनी यावेळी केला.

रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू
बेलापूर/वार्ताहर
-रेल्वेने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी तुर्भे रेल्वे स्थानकाजवळ घडली. शिवपुत्र सान्नप्पा म्हेत्रे (४२) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. म्हेत्रे हा सकाळी तुर्भे रेल्वे स्थानकाजवळील रूळ ओलांडत होता. यावेळी ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या लोकलने त्याला जोरात धडक दिली. झाला.