Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

धुळे : गटबाजीमुळे काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह
वार्ताहर / धुळे

लोकसभा, जिल्ह्य़ातील पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेतली सत्ता पाहिल्यानंतर एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या धुळ्यात भविष्यात काँग्रेस अस्तित्वासाठी तरी शिल्लक राहील का अशी चर्चा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेस अंतर्गत धुसफूस कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याच्या घटना घडत आहेत. पक्ष निरीक्षकांसमोर गटबाजीचे उघड प्रदर्शन करण्याचे धाडस सगळ्याच नेत्यांनी अंकीकारल्याने काँग्रेस पक्षात कुणाचा कुणात पायपोस राहीला नसल्यासारखी स्थि आहे. जिल्ह्य़ात रोहिदास पाटील, अमरीश पटेल यांच्या अनुक्रमे जवाहर आणि अँकर गट आहेत. या दोघांमधला संघर्ष पुन्हा शिगेला गेला आहे. नुकत्याच झालेल्या पक्ष निरीक्षकाच्या दौऱ्याप्रसंगीही त्याची प्रचिती आली. पूर्वीचा कुसुंबा (ता. धुळे) आणि सध्याच्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आ. रोहिदास पाटील आणि शिरपूरचे आ. अमरिश पटेल यांच्या अनुक्रमे जवाहर आणि अँकर या गटातला तिढा सुटूच शकणार नाही हे कधीच स्पष्ट झाले आहे.

उड्डाणपुलावरील टोल वाचविण्यासाठी २१ कोटीचा निधी - डॉ. गावित
नंदुरबार / वार्ताहर

शहरातील दोन मोठे उड्डाणपूल पार करण्यासाठी सामान्य जनतेला टोल आकारणीचा भार पडू नये म्हणून रस्ते विकास महामंडळाला आवश्यक असलेले २१ कोटी ५० लाख रुपये निधी आदिवासी विकास विभागाच्या निधीतून उपलब्ध करून देणार आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा कुमुदिनी गावित, माजी गृहराज्यमंत्री आर. पी. वळवी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कमलाताई मराठे, डॉ. भगवान पाटील, प्रकाश गावित, घुगे विजय निर्माण कंपनीचे संचालक ए. एश. महाल्ले, सुधाकर थोरात, कार्यकारी अभियंता अरविंद ओक, नगरसेवक आदी उपस्थित होते.

अवघ्या साडेचार वर्षात येवल्याची भरभराट -भुजबळ
येवला / वार्ताहर

गेल्या ५० वर्षात झाला नाही एवढा विकास अवघ्या साडेचार वर्षातच मार्गी लागला. माझी ओळख नसतांना आपण मला भरघोस मतदान केले अन् त्याची परतफेड देखील आपण विकासाने करण्याचा प्रयत्न केला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व येवला मतदार संघाचे आमदार छगन भुजबळ यांनी केले. तालुक्यातील धुळगांव ते अनकई रस्त्याच्या भूमीपूजन सोहळ्याचे आयोजन धुळंगाव येथे करण्यात आले होते. यावेळी भुजबळ म्हणाले, १२.५० किमी लांबीचा व ६० लाख रूपये खर्चाचा हा रस्ता गुणवत्तापूर्ण व्हावा व वाहतूक सुलभ व्हावी अशी अपेक्षा आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, सचिवालय अशी एक ना अनेक कामे मतदार संघात झालीत. याचा निश्चित उपयोग माझ्या येवलेकरांना होतोय याबाबतचे समाधान व आनंद वाटत आहे. सुरूवातीला धुळगांव व अनकाई रस्त्याचे उद्घाटन भुजबळ यांनी सरपंच दत्ता आहेर यांना नारळ वाढवून करण्यास सांगितले. दरम्यान, सोसायटीचे अध्यक्ष आप्पा गायकवाड, शेतकरी संघटना नेते मोहन गुंजाळ, योगेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दौलत कदम, माजी सरपंच आण्णा गायकवाड यांनी भुजबळ यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमस्थळी भुजबळांचे आगमन होताच नारायणराव पवार माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांंनी ढोलताशाच्या गजरात स्वागत करून फटाक्यांची आतिषबाजी केली. कार्यक्रमास नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, पंचायत समिती सभापती संभाजी पवार, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पिंपरकर, प्रकाश बनकर, ज्ञानदेव कदम आदी उपस्थित होते. ग्रामसेवक रवींद्र शेलार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धुळगांव ग्रामस्थांसह नारयणराव पवार माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षकवृंदानी विशेष परिश्रम घेतले.

नवापूरच्या प्रस्तावित बस स्थानकाचे भूमीपूजन
नवापूर / वार्ताहर

उत्पन्न कमी व खर्च जादा ही परिस्थिती उद्भवल्यावर तोटय़ास सामोरे जाण्याची वेळ येते पण अशाही परिस्थितीत परिवहन महामंडळाने महागाई भत्ता देण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित प्रश्नांवर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री सुरूपसिंग नाईक यांनी येथे साकारणाऱ्या नव्या बसस्थानकाचे व व्यापारी संकुलाचे भूमिपूजन प्रसंगी केली. नवीन तीन हजार बसेस खरेदी करण्याचे नियोजन असून नवापूरच्या वाटय़ालाही काही बसेस येतील. नवीन बसस्थानक आकर्षक व सुंदर होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य परिवहन वाहतूक महाव्यवस्थापक व्ही. एस. बच्छाव यांनी प्रश्नस्तविक केले. मुख्य अभियंता इनामदार, कार्यकारी अभियंता काळोगे, विभागीय वाहतूक अधिकारी डी. पी. गावंडे, आदिवासी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरीष नाईक, उपाध्यक्ष भरत गावित, उपनगराध्यक्षा शैलाबाई टिभे, तहसीलदार देवराम अहिरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप गावित, शहराध्यक्ष नवल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दिलीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, तहसील कार्यालयासमोर खा. माणिकराव गावित यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटनही नाईक व खा. गावित यांच्या हस्ते झाले. तालुक्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५२ कोटी रुपयांच्या कामांसाठी मंजुरी मिळाली असून पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत साडेपंचेचाळीस कोटी रुपयांना मंजुरी मिळालेली आहे. तसेच स्थानिक विकास निधीतून हातपंप सामाजिक सभागृहासाठी एक कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.