Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

आहे तेच सांभाळण्याचे आघाडीपुढे आव्हान!
उत्तर महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्य़ातून सेना-भाजप युतीला सर्वाधिक यशाची अपेक्षा आहे, त्या जळगावमध्ये लोकसभा निवडणुकीत बसलेल्या पराभवाच्या धक्क्यातून अद्यापही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सावरू शकलेली नाही. उलट त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधील हाणामाऱ्यांचे प्रकरण तर पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासमोरच गाजले. अशा स्थितीत नवीन काही मिळविण्यापेक्षा आहे तेच मतदारसंघ सांभाळण्याचे आव्हान आघाडीपुढे आहे.

काँग्रेसला स्वकीयांकडून धोका
हिंगोली जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षाची ताकद चांगली असताना आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या पराभवाला काँग्रेसअंतर्गत गटबाजीचा लाभ विरोधकांना मिळाल्याचा इतिहास आहे. जिल्ह्य़ात हिंगोली, वसमत व कळमनुरी हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघाच्या फेररचनेत या तिन्ही मतदारसंघांत केवळ १० ते १२ गावे इकडून तिकडे आली आहेत. मोठा फरक झालेला नाही.

काँग्रेससाठी पोषक, बंडखोरीची भीती
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत राज्यासाठी विशेषत: नांदेड जिल्ह्य़ासाठी घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे जिल्ह्य़ात काँग्रेस व मित्रपक्षाला अनुकूल वातावरण असले तरी इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने बंडखोरीचाही मोठा धोका आहे.
पुनर्रचनेनंतर नांदेड विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन दोन मतदारसंघ निर्माण झाले. पूर्वी आठ विधानसभा मतदारसंघ असलेल्या नांदेड जिल्ह्य़ात आता नऊ मतदारसंघ झाले आहेत.

महम्मद रफीची गाणी किती?
अलिकडेच एक उत्सव पर्व संपले. गणेशोत्सव, नवरात्री उत्सवाप्रमाणेच जुलैचा महिना म्हटला म्हणजे स्व. रफी उत्सवच असतो. नेहमीप्रमाणेच या वर्षी ही ठिकठिकाणी त्यांच्या गाण्यांवर आधारित विविध कार्यक्रम झाले व संगीतप्रेमी रसिकांनी ही मेजवानी मनसोक्त लुटली. पण या कार्यक्रमादरम्यान निवेदक त्यांच्या गाण्यांची संख्या सांगताना नेहमी चुका करतात. तसे कुठल्याही कलाकाराच्या गाण्यांच्या संख्येवर त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध होत नसले तरी गाण्यांची आकडेवारी हा महत्त्वाचा भाग असतो व तो एक इतिहास आहे. आपण इतिहासाबद्दल बेफिकीर असतो ही आपली एक संस्कृतीच आहे.
कुणी निवेदक सव्वीस हजार गाणी गायली असे सांगतो तर कुणी रफीसाहेबांनी तीस हजार गाणी गायली असे सांगतो. दूरदर्शनसारख्या प्रमुख वाहिनीवर, रफीसाहेबांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात ‘‘उन्होंने छब्बीस हजार गीत गाये’’ असे सांगण्यात आले. सर्वात कहर केला तो अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘फिल्म्स डिव्हिजनच्या’ स्व. महम्मद रफीवरील डॉक्युमेन्ट्रीत. ही संख्या चक्क तीस हजार सांगण्यात आली. भारतातील सर्वश्रेष्ठ व सर्वप्रिय गायकाच्या गीतसंख्येत एवढी तफावत? अशा महत्त्वपूर्ण माध्यमात ही संख्या कशाच्या आधारावर सांगण्यात येत असावी?
मी या महान गायकाच्या संगीतमय जीवनावर एक गीतकोश (Enoyclopedia) तयार केला होता व डोंबिवलीच्या नितीन पब्लिकेशन ने तो ‘मेरे गीत तुम्हारे’ या शीर्षकाचा तो कोश, महान संगीतकार स्व. ओ. पी. नय्यर यांच्या हस्ते १९९८ साली प्रकाशित केला होता. त्या आधारावर स्व. मुहम्मद रफीसाहेबांच्या गाण्यांची ठळक संख्या अशी आहे.
एखाद्या कलाकाराच्या जीवनावर फिल्म डिव्हीजनसारख्या संस्थेने जर डॉक्युमेंटरी काढली तर ती एक विश्वसनीय (Authentic) मानली जाते. या आधारावर ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ अथवा तत्सम एखाद्या पुस्तकात नोंद करण्याच्या हेतूनेही ती माहिती विश्वसनीय मानली जाते. मग ही तीस हजार गाण्यांची संख्या कुठल्या आधारावर काढली गेली असेल?
जर रफी साहेबांचे नाव ‘गिनीजबुक’मध्ये आले तर निश्चितच ती आनंदाची गोष्ट ठरेल. पण.. खरी आकडेवारी कळल्यावर ते नाव वगळण्यात आले तर ही बाब त्या महान गायकाला व संपूर्ण भारत देशाला अपमानास्पद नाही का ठरणार? आपणापैकी बरेच जणांना आठवत असेल की, १९९२ साली जेव्हा भारतातील सर्वश्रेष्ठ व सर्वप्रिय गायिका लता मंगेशकरांचे नाव गिनीज बुकात नोंद करून नंतर त्यातून वगळण्यात आले होते, तेव्हा हा कटु अनुभव आपण घेतला होताच! तेव्हा फिल्म्स डिव्हीजनने पुस्तकाचा आधार घेऊन व आकडेवारीची शहानिशा करून ही त्रुटी सुधारावी असा आग्रह आपण धरला पाहिजे.
रसिकांना स्व. महम्मद रफी साहेबांबद्दल व त्यांच्या कारकिर्दीची खरीखुरी व विश्वसनीय माहिती मिळावी म्हणूनच नव्हे तर एकूणच आकडेवारीकडे वास्तवाच्या पुराव्यांच्या उजेडातच पाहिले जावे म्हणून प्रयत्न झाला पाहिजे. कला क्षेत्राच्या विश्वासार्ह माहितीबद्दल अनेकदा अक्षम्य हेळसांड केली जाते. हे बदलायला पाहिजे.
अजित के. प्रधान