Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

महापालिकेची तपासणी केंद्रेच दयनीय अवस्थेत
पुणे, १० ऑगस्ट/ खास प्रतिनिधी

कोणाला खोकला झालाय, कोणाला सर्दी झालीय तर कोणाला ताप येतोय.. ‘स्वाइन फ्लू’च्या या प्रश्नथमिक लक्षणांनी भेदरलेले शेकडो पालक आपल्या मुलाबाळांसह दाटीवाटीने मिळेल तसे तासन्तास रांगेत उभे आहेत.. प्रतीक्षा आहे, डॉक्टरांकडून निदान होण्याची.. दुसरीकडे डॉक्टर हतबल.. रडकुंडीला आलेले.. दोन- तीन डॉक्टर दिवसभरात किती जणांची तपासणी करू शकणार.. हे दयनीय चित्र आहे ‘स्वाइन फ्लू’ च्या प्रश्नथमिक तपासणीसाठी महापालिकेने सुरु केलेल्या कोथरुड येथील महापालिकेच्या सुतार दवाखान्यातील केंद्राचे.

‘टॅमिफ्लू’ संशयितांना वेळेवर देणे आवश्यकच!
विषाणूच्या ‘म्युटेशन’चा धोका नाही
पुणे, १० ऑगस्ट / खास प्रतिनिधी

‘टॅमिफ्लू’चा जास्त वापर केल्यास ‘स्वाइन फ्लू’चा विषाणू या औषधाला सरावेल, ही भीती आताच्या परिस्थितीत अनाठायी आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूची प्रश्नथमिक लक्षणे दिसताच टॅमिफ्लूचा लगेचच वापर करणे आवश्यक आहे. त्याच्या वापरासाठी रुग्णाच्या तपासणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही, असे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेचे (एनआयव्ही) संचालक डॉ. ए. सी. मिश्रा यांनी स्पष्ट केले. स्वाइन फ्लूला कारणीभूत ठरलेल्या ‘एच१एन१’ या विषाणूच्या जनुकांच्या रचनेत बदल (म्युटेशन) होत असल्याचे अजून तरी पाहायला मिळालेले नाही, असेही ते म्हणाले.

शहरात २० लाखांहून अधिक सर्जिकल मास्कची विक्री
पुणे, १० ऑगस्ट/ खास प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांत शहरात २० लाखांहून अधिक सर्जिकल मास्कची विक्री झाली असून वाढती मागणी पूर्ण करण्याकरिता उद्याही पुण्यासाठी आठ लाख मास्क उपलब्ध केले जाणार आहेत. तथापि, उत्पादकांनीच आता त्याच्या किमतीत वाढ केली असल्याने चार रुपयांमध्ये ते देणे शक्य होणार नाही, असे केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या वतीने आज स्पष्ट करण्यात आले.
स्वाइन फ्लूचा सामना करण्यासाठी केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टच्या पुढाकाराने युद्ध पातळीवर मास्क उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

अखिल मंडई मंडळाची दहीहंडी रद्द
‘स्वाइन फ्लू’च्या पाश्र्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मंडळ आणि पोलिसांचा पुढाकार
पुणे, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

सध्या वेगाने पसरत असलेल्या ‘स्वाइन फ्लू’ या संसर्गजन्य रोगाचा प्रसार रोखण्याकरिता यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सवातील गर्दी टाळण्यासाठी मंडळांसह पोलीस पुढे सरसावले आहेत. अखिल मंडई मंडळाने कार्यकर्त्यांशी चर्चा करून यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजनच रद्द केले असून हुतात्मा बाबू गेनू मंडळाने देखावा रद्द केला आहे. पोलीस व मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आज याबाबत निर्णय घेण्यात आला.

‘नव्या फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी’
स्वाइन फ्लूविषयी सर्व काही..

नव्या फ्लूचा हा आजार संसर्गजन्य आहे. खोकणे, शिंकणे, बोलणे अशा क्रियांतून घसा व नाकातील स्त्रावांच्याद्वारे हा विषाणू रोगी व्यक्तींकडून हवेत पसरतो. अशा व्यक्तींशी तीन फुटांच्या आत संपर्क आल्यास हा आजार दुसऱ्या निरोगी व्यक्तीला होतो. हवेत तरंगणारे हे विषाणू एखाद्या पृष्ठभागावर बसतात. या पृष्ठभागाला एखाद्या निरोगी माणसाचा स्पर्श होऊन तोच हात नाकाला, तोंडाला किंवा डोळ्यांना लागल्यास हा आजार होऊ शकतो म्हणून आपले हात सातत्याने साबण, पाण्याने धुवावेत. खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरावा किंवा टिश्यू पेपर (कागदी रुमाल) धरावा.

--------------------------------------------------------------------------

कारेन पावलिलो आणि पाणघोडय़ांचा अभ्यास
कारेन पावलिलो ही झिंबाब्वेतील तुर्गवे नदीतील पाणघोडय़ांचा अभ्यास करतेच, पण या पाणघोडय़ांच्या बचावासाठीही झटते. आफ्रिकेतील मोठय़ा सस्तन प्रश्नण्यांमधील सर्वाधिक धोकादायक प्रश्नणी; असं पाणघोडय़ांच्या बाबतीत म्हटलं जातं. कारेन या भूभागाला तिची मातृभूमी समजते. त्या भूमीत बरेच पाणघोडे वावरतात. त्यामुळे तिला पाणघोडय़ांबद्दल ममत्व वाटतं. हे पाणघोडे तुर्गवे नदीच्या अनेक प्रवाहांमध्ये वास्तव्यास असतात.

मेंदूतील न्यूरॉन्सही घेतात छोटासा ब्रेक
रोज रात्रीची शांत झोप ही माणसाला मिळालेली फार मोठी देणगी आहे. या विश्रांतीच्या काळातच शरीराची झीज भरून निघते. झोपेचा आतापर्यंत अनेकांनी अभ्यास केलेला आहे, पण त्यातील सगळे कळले आहे अशातला भाग नाही. आपण जेव्हा झोपलेलो असतो तेव्हा माणसाच्या मेंदूत नेमक्या काय क्रिया होत असतात की, झोपेतही मेंदू जागाच असतो अशी अनेक कोडी आहेत. अगदी गाढ झोपेत असतानाही मेंदूचे काम चालू असते. मेंदूच्या पेशी काम करीत असतात.

ऑलिव्हर लॉजचे शोध
कहाणी बिनतारी संदेशवहनाची -२२ मँचेस्टरच्या ओवेन्स कॉलेजात लॉजनं गणिताच्या प्रश्नध्यापकपदासाठी अर्ज केला, पण तो नामंजूर झाल्यानं त्यानं १८८१ साली लिव्हरपूलच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये नव्यानंच उघडलेल्या भौतिकशास्त्र विभागात शिकवण्यासाठी अर्ज केला आणि त्याच्या आतापावेतो झालेल्या थोडय़ाफार प्रतिमेमुळे त्याला ती नोकरी मुलाखतीशिवाय मिळाली! तिथं भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत काय काय असावं, हे ठरविण्यासाठी युरोपातल्या इतर महाविद्यालयांच्या भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळा आपल्याला बघायला मिळाव्यात यासाठी त्यानं केलेला अर्ज मंजूर झाला आणि लॉज अनेक मोठमोठय़ा महाविद्यालयांना भेट देऊन आला.

‘ग्लोबल वॉर्मिग’ला आळा घालण्यासाठी
‘ग्लोबल वॉर्मिग’ हा शब्द आणि त्यामागे दडलेले विलक्षण भयावह परिणाम गेल्या दोन-तीन दशकांत पृथ्वीवर वेगवेगळय़ा प्रकारे जाणवू लागले आहेत. पर्यावरणवादी, जीवसंशोधक, विचारवंत, जागतिक पुढारी यांच्यापासून थेट सामान्य नागरिकाला ग्लोबल वॉर्मिग विरुद्ध परिणामकारक उपाययोजना करावयाची नितांत जरुरी भासू लागली आहे. पृथ्वीवर वाढणारी लोकसंख्या, काँक्रीटचा वापर करून विस्तारित जाणारी महानगरे, लांबलचक साकारणारे रस्ते, प्रदूषित वायू ज्यामध्ये कर्बवायू, सल्फर डाय ऑक्साईड, अमोनिआ, क्लोरीन फ्लोरीन यांचा भरपूर समावेश असतो. यांची निर्मिती करणारे कारखाने, आकसत चाललेल्या जंगलांचे आच्छादन, प्रदूषित घटक मोठय़ा प्रमाणात विरघळलेले नद्यांचे पाणी, नाश न होणाऱ्या, विरघळू न शकणाऱ्या केरकचऱ्यांचे डोंगर इ. असंख्य कारणांमुळे पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या थरामध्ये बदल घडत आहे.

--------------------------------------------------------------------------

स्वाइन फ्लूचा दैनंदिन व्यवहारांवर परिणाम
पुणे, १० ऑगस्ट/विशेष प्रतिनिधी

स्वाइन फ्लू पसरत चालल्याचा परिणाम पुणेकरांच्या दैनंदिन व्यवहारांवर होत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. गर्दी टाळणे, नाईलाज म्हणून एकत्र येताना मास्क-रूमालाचा वापर करणे या बाबींवर पुणेकर कटाक्षाने भर देत आहेत. शाळा एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय आज दुपारी झाला, मात्र तोपर्यंत सकाळच्या सत्रातील बहुतेक शाळा भरल्या होत्या. शाळेत जाणारी मुले मास्क लावून जाताना दिसत होती. मंडईसारख्या ठिकाणी तर शेकडा ऐंशी टक्के व्यक्ती तोंडाला मास्क किंवा रूमाल लावून आले होते. नेहमी गर्दी होणाऱ्या ठिकाणांवरील गर्दी निम्म्यापेक्षा अधिक कमी झाली आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या पुणेकरांची संख्या घटली असल्याचे विविध बागा, मैदाने पाहता लक्षात येते. तसेच लहान मुलांनी भरून जाणारी मैदानेही रिती झाली आहेत. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या अवघ्या दहा टक्क्य़ांवर आली आहे. कोथरूडच्या सिटी प्रश्नईड चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी याबाबतची माहिती दिली. नेहमी शनिवारी तसेच रविवारी चित्रपटगृहाच्या क्षमतेच्या चाळीस ते पन्नास टक्के प्रेक्षक येतात, मात्र आता हे प्रमाण दहा टक्क्य़ांवर आले आहे. त्यामुळे केवळ दहा टक्के प्रेक्षकांसाठी चित्रपटगृह चालविण्यापेक्षा तीन दिवसांची सक्तीची विश्रांती चित्रपटगृहाच्या चालकांना हवीशी वाटणारी अशीच असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

पुण्यात चित्रपटाचे शूटिंगही रद्द
पुणे, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’च्या संसर्गामुळे पुण्यात चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्सच बंद करण्याची वेळ आलेली नाही, तर बॉलिवूडच्या तारे-तारकांचा समावेश असलेले शूटिंगही रद्द करावे लागले आहे. ‘करण जोहर निर्मित ‘कुर्बान’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे परिसरात होणार होते. त्यासाठी संबंधित युनिटमधील कर्मचारी, तंत्रज्ञ पुण्यात येऊन पाहणी करून गेले होते. लवकरच प्रत्यक्ष चित्रीकरणाला प्रश्नरंभ करण्यात येणार होता. लोकप्रिय अभिनेत्री करिना कपूर, अभिनेता सैफ अली खान आणि विवेक ओबेरॉय यांची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहे. पुण्यातील ‘स्वाइन फ्लू’चा धोका लक्षात घेता बॉलिवूडच्या या ताऱ्यांनी पुण्यापासून दूर राहणेच पसंत केले आहे,’ असे वृत्त एका वाहिनीवर झळकविण्यात येत होते.

पुणे-नगर रस्त्यावर हडपसरच्या तरुणाचा खून
शिरुर, १० ऑगस्ट/वार्ताहर

पुणे-नगर रस्त्यावर रांजणगाव गणपती जवळील शेळके वस्ती लगत हडपसर येथील तरुणाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी पुणे-नगर रस्त्यावर टोलनाक्याजवळ निवृत्ती दत्तात्रय गिरी (वय ४०) यांचा मृतदेह आढळून आला. निवृत्ती गिरी हे हडपसर येथील ए. जी. औटे इंजिनिअरिंग कॉलेज येथे शिपाई म्हणून कामास होते. मृत गिरी यांचा गळा दाबून खून झाल्याचे शवविच्छेदनात आढळून आले आहे. गिरी यांच्या डोक्यासही मुका मार लागलेला होता. असे पोलिसांनी सांगितले. या खूनप्रकरणी अज्ञात इसमाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक ओतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. टी. घोडके तपास करीत आहेत. मृत गिरी यांच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा असा परिवार असल्याचे समजते.

‘स्वाइन फ्लू’ प्रतिबंधास आता कार्यकर्ता प्रशिक्षण
पुणे, ९ ऑगस्ट / खास प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता भासू नये, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण रक्तपेढीने ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ च्या सहकार्याने कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. त्यामधून प्रशिक्षित झालेले ७५ कार्यकर्ते वैद्यकीय मदतनीस म्हणून १५ उपचार केंद्रांवर कार्यरत राहणार आहेत. ‘आयएमए’ चे डॉ. शरद आगरखेडकर व माया तुळपुळे यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले. २२ स्वयंसेवी संस्थांमधील ७५ कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झाले. पालिकेच्या उपचार केंद्रांबरोबरच गृहसंकुले, कार्यालये आदी ठिकाणी जनजागृती करण्यासाठी हे कार्यकर्ते उद्यापासून मोहीम हाती घेणार आहेत. पुढील रविवारीसुद्धा प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असून त्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा - डॉ. अतुल कुलकर्णी - ९२२६८२४३३६, सचिन कुलकर्णी - ९७६३७०४८१८ आणि बाळासाहेब फाटक - ९८२२६१००२४.

जात पडताळणी समितीचे सहआयुक्त महावरकार यांच्या निलंबनाची मागणी
पुणे, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

जात पडताळणी समितीचे सहआयुक्त व्ही. के. महावरकर यांना त्वरित निलंबित करावे अन्यथा आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा आदिवासी महादेव कोळी युवक संघाचे अध्यक्ष नारायण वांभिरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
सहआयुक्त व्ही. के. महावरकर हे राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांच्या दबावाखाली काम करीत असल्यानेच जुन्नर, खेड, आंबेगाव या तालुक्यातील महादेव कोळी समाजातील व्यक्तींना त्वरित जात वैधता प्रमाणपत्र दिले जाते असा आरोप करून वांभिरे म्हणाले की, मात्र जिल्ह्य़ातील अन्य १० तालुक्यांतील समाज बांधवांना रितसर पुरावे सादर करूनही प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी केली जावी व ही चौकशी पूर्ण होईपर्यंत महावरकर यांना विलंबित करावे, अशी मागणी वांभिरे यांनी केली. या बाबत संबंधित विभागांना वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. १५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास जिल्ह्य़ातील साडेपाच हजाराहून अधिक समाजबांधव स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्महत्या करतील, असा इशाराही वांभिरे यांनी दिला. या प्रसंगी चंद्रकांत वाबळे, हिरामण गायकवाड, लक्ष्मण चव्हाण, बाजीराव शिंदे उपस्थित होते.

‘इस्कॉन’ मंदिरात कृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन
पुणे, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे १३ व १४ ऑगस्ट रोजी लष्कर परिसरातील दस्तूर शाळेजवळील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. अंदाजे एक लाख भाविक या महोत्सवात सहभागी होतील, अशी माहिती इस्कॉन पुणेचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू यांनी आज दिली. १३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० पासून भजन, कीर्तन, विविध स्पर्धा, प्रवचन, असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहाटेपासूनच भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत भगवान श्रीराधाकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची संधी सर्वाना उपलब्ध होणार आहे. याच दिवशी रात्री ९.३० ते १२.३० या वेळेत श्रीराधाकृष्णांच्या मूर्तीस पंचामृताने अभिषेक केला जाणार आहे.या सर्व सोहळ्यासाठी नाममात्र देणगी शुल्क आकारले जाणार आहे. आजपर्यंत सुमारे दहा हजार कुटुंबीयांनी आगाऊ नोंदणी केली आहे. अभिषेकासाठी सर्व साहित्य मंदिरात पुरविण्यात येणार आहे. भाविकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभू यांनी केले आहे.

पिंपळे सौदागर व रहाटणीत लाखाची चोरी
पिंपरी, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून पिंपळे सौदागर व रहाटणी येथे सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम अंबादास जोशी (वय ५४, रा. श्रीनगर, रहाटणी) व बिनू नारायण नायर (वय ३३, रा. व्दारका कॉर्डस सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. जोशी व नायर हे आठ तारखेला घराला कुलूप लावून बाहेर गेलेले असताना चोरटय़ांनी कडी कोयंडा उचकटून एक लाख सहा हजार रुपयांचा माल चोरुन नेला. अधिक तपास सहायक निरीक्षक सर्जेराव गावडे करीत आहेत.

विविध संघटनांकडून मास्कवाटप, व्याख्यानांचे आयोजन
पुणे, १० ऑगस्ट/विशेष प्रतिनिधी

स्वाइन फ्लूचा धसका घेतलेल्या पुणेकरांना मास्कवाटप, व्याख्याने-चर्चासत्र आदी लोकप्रशिक्षणाचे कार्यक्रम विविध पक्ष-संघटनांनी आयोजित केले. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदिराचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी हुतात्मा दिनाचे निमित्त साधून हुतात्मा स्मारकाजवळील मजुरांना मास्क व गुलाबपुष्पाचे वाटप केले. मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, ड्रायव्हर आदींनाही मास्कचे वाटप केले जाईल, असे माळवदकर यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कॅन्टोन्मेंट विभागातर्फे मास्कवाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे या विभागाचे अध्यक्ष प्रशांत मते यांनी कळविले आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जनजागरणाचा कार्यक्रम महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षा मृणाल कारखानीस यांनी आयोजित केला. त्यात सातशे मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी आमदार कमल ढोलेपाटील, वासंती काकडे, सुनील खाटपे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा मागासवर्गीय विभाग, वीर नेताजी मंडळ, स्पार्क, सारथी, जनता सहकारी बँक, आमदार विनायक निम्हण आदींनीही कार्यक्रमांचे आयोजन केले होते.