Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

राज्य

‘मास्क संपले.. घाबरू नका’
पुणे, १० ऑगस्ट /खास प्रतिनिधी

‘स्वाईन फ्लू’पासून बचाव करण्यासाठी अमेरिकन बनावटीचा ‘एन ९५’ मास्क वापरावा, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असल्याने शहरातील बहुतेक सर्व औषध विक्रेत्यांकडील सर्व प्रकारचे मास्क संपलेले आहेत. तथापि, मास्क उपलब्ध नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, स्वच्छ स्कार्फ वा रुमाल बांधूनही स्वाईन फ्लूपासून स्वत:चे संरक्षण करणे शक्य आहे, असा निर्वाळा शहरातील अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

रुग्णालयांमध्ये गर्दी आणि संताप
पुणे, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

कोणाला खोकला झालाय, कोणाला सर्दी झालीय तर कोणाला ताप येतोय.. ‘स्वाईन फ्लू’च्या या प्राथमिक लक्षणांनी भेदरलेले शेकडो पालक आपल्या मुलाबाळांसह दाटीवाटीने मिळेल तसे तासंतास रांगेत उभे आहेत.. प्रतीक्षा आहे, डॉक्टरांकडून निदान होण्याची.. दुसरीकडे डॉक्टर्स हतबल.. रडकुंडीला आलेले.. दोन- तीन डॉक्टर दिवसभरात किती जणांची तपासणी करू शकणार.. हे दयनीय चित्र आहे ‘स्वाईन फ्लू’ च्या प्राथमिक तपासणीसाठी महापालिकेने सुरु केलेल्या कोथरुड येथील महापालिकेच्या सुतार दवाखान्यातील केंद्राचे.

डॉक्टरांसाठीही ‘हेल्पलाइन’ हवी!
पुणे, १० ऑगस्ट/ खास प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’ ने घाबरलेल्या नागरिकांमुळे शहरातील बालरोग तज्ज्ञांच्या दवाखान्यांबरोबरच जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टरांचे दवाखानेही ओसंडून वाहत आहेत. या आजाराबाबतच्या गैरसमजामुळे समुपदेशन करण्यातच डॉक्टरांचा बराच वेळ खर्ची पडत असून रोज बदलणाऱ्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे उपचाराबाबत या डॉक्टरांचाही आता गोंधळ उडाला आहे.

स्वाईन फ्लू
* ‘स्वाईन फ्लू’ म्हणजे काय?
हा आजार डुकरांतील ‘इन्फ्लूएंझा ए’ या प्रकारच्या विषाणूच्या संसर्गामुळे स्वाइन फ्लू होतो. त्यामुळे श्वसनाचा विकार अधिक बळावतो.

उगाच बाऊ नको..
*स्वाईन फ्लू एखाद्या सामान्य फ्लू सारखाच असतो. त्यामुळे एकदम घाबरून जाऊन इस्पितळांकडे धाव घेण्याची गरज नाही.
*आपल्याकडे कोणत्याही गोष्टींबाबत विचार करताना संयम पाळला जात नाही. स्वाईन फ्लूच्या साथीसंदर्भातही तसेच आढळून आले..पण संयम पाळणे, शांत राहाणे कठीण असले तरी ते कृतीत आणण्याची गरज आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे -मनोहर जोशी
नागपूर, १० ऑगस्ट/ प्रतिनिधी

राज्यात पुन्हा युतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. सत्ता आल्यास उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी व्यक्त केली. युतीच्या वाटय़ाला आलेल्या काही मतदारसंघांची अदलाबदल होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पु.भा. भावे जन्मशताब्दी समारंभासाठी मनोहर जोशी सोमवारी नागपूर येथे आले.

कोळी समाजाच्या मोर्चाला धुळ्यात हिंसक वळण
पोलीस गोळीबारात एक ठार ’ शिवसेनेतर्फे आज धुळे बंद
धुळे, १० ऑगस्ट / वार्ताहर
महाराष्ट्र कोळी समाज संघातर्फे अनंत तरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चानंतर तरे यांना ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले. तत्पूर्वी, पोलिसांनी केलेल्या लाठीमारात जवळपास २० जण जखमी झाले. संतप्त जमावाने यावेळी परिवहन महामंडळाच्या तीन बसेस काही दुकानांवरही दगडफेक केली.

गोदावरी बचाव अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पाच दिवसात एक कोटीचे सागवान जप्त

चंद्रपूर, १० ऑगस्ट/प्रतिनिधी

दक्षिण चंद्रपूर वनवृत्ताने सिरोंचाच्या सीमावर्ती भागात सुरू केलेल्या गोदावरी बचाव अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पाच दिवसांत एक कोटीचे सागवान जप्त करण्यात वनखात्याला यश आले आहे. या मोहिमेमुळे सीमावर्ती भागातील तस्करांनी पळ काढला आहे.

आंबोलीतील पर्यटन संकुल गेली तीन वर्षे धूळ खात पडून
अभिमन्यू लोंढे , सावंतवाडी, १० ऑगस्ट

आंबोलीचा थंड हवेच्या ठिकाणी पर्यटन संकुल प्रकल्पासाठी प्रत्येकी दोन बेड व स्वयंमपूर्ण ३० निवास कक्षाचे बांधकाम व पायाभूत सुविधांसह पावणेदोन कोटी रुपयांचा सिमेंट काँक्रीटचा प्रकल्प २००६ मध्ये पूर्ण होऊनही प्रत्यक्षात पर्यटनाकरिता तो कार्यान्वित झाला नाही.आंबोली पर्यटनचा संकुलाकरिता केंद्र शासन सहाय्यता निधीतून सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा प्रकल्प तीन वर्षे पूर्ण होऊनही अद्याप धूळ खात पडला आहे.

बिहारमधील बस-ट्रक अपघातात नऊ ठार
औरंगाबाद, १० ऑगस्ट / पीटीआय
बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात प्रवाशी बस आणि स्टेशनरीचा ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात नऊ भाविक ठार आणि आणखी २० जण जखमी झाले आहेत. यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहेत.उत्तर प्रदेशातील हिंदूंचे प्रसिद्ध धर्मक्षेत्र विंध्यांचल येथून बिहारमधील जेहनाबादकडे प्रस्थान करणाऱ्या या भाविकांच्या बसचा जाकिया गावानजीक अपघात झाला, असे सुत्रांकडून समजते.या अपघातात सह जण जागीच ठार झाले, तर रुग्णालयात नेत असताना तीन जणांचा मृत्यू झाला. जखमींवर नजीकच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

जजीराज वासवानी यांचे निधन
नाशिक, १० ऑगस्ट / प्रतिनिधी

प्रसिद्ध चित्रपट निर्माते व वितरक जजीराम वासवानी यांचे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ६४ वर्षांचे होते. मराठी चित्रपट व्यवसायात त्यांचे योगदान मोलाचे आहे. सून लाडकी सासरची, मराठा बटालियन, कुंकू लावते माहेरचं, माहेर माझे पंढरपूर, सासर माझे मंदीर, भाऊबीज या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. सध्या त्यांची ‘चालत्या गाडीत नको बाई’ व ‘आई हिंदुस्थानी’ या चित्रपटांची जुळवाजुळव सुरू होती. त्यांचे चित्रिकरणही लवकरच नाशिकमध्ये सुरू होणार होते. त्या दरम्यानच त्यांचे अचानक निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला. पंचवटी अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजाभाऊ भास्करे, मुन्नाभाई भट्टड, अरूण रहाणे, विशाल जगताप, पप्पू खंडागळे आदींसह विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.

सिंधुदुर्गमध्ये प्रति महाबळेश्वर तयार करण्याची योजना
सावंतवाडी, १० ऑगस्ट/ वार्ताहर

तिलारी- रामघाट- पारगड या सह्याद्रीच्या पट्टय़ात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पातील हवेवर वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी दिली. सावंतवाडी-दोडामार्ग तालुक्याचा सह्याद्री पट्टा आणि चंदगड- गडहिंग्लज तालुक्यातील प्रदूषणविरहित भागाला प्रति महाबळेश्वर बनविण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. कुपे या त्यांच्या गावी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आंबोली-कुंभवडे, कुंभवडे- केगदवाडी- पारगड व पारगड- रामघाट- तिलारी हा पट्टा प्रति महाबळेश्वर करण्याचा मानस असून त्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी ३०० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील काही भाग आणि चंदगड व गडहिंग्लज तालुक्यात हे प्रति महाबळेश्वर असणार आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी दोन हजार कोटी रुपये शासनाने दिल्यास हिंदुस्थानात सिंधुदुर्गाचा लौकिक होईल. या भागात पर्यटनाची खाणच आहे. तेथे विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात येऊ शकतात. त्यासाठी दूरदृष्टीची गरज आहे, असे कुपेकर म्हणाले.

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचाऱ्यांची नवी संघटना
देवरुख, १० ऑगस्ट/ वार्ताहर
९ ऑगस्टच्या क्रांतीदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी ही नवी संघटना स्थापन करण्यात आली असून, अध्यक्षपदी देवरुखचे दत्तात्रय तथा बंडय़ा भस्मे यांची निवड करण्यात आली आहे.जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे असंख्य प्रश्न रेंगाळत आहेत. दिशाहीन झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रभावी व्यासपीठ निर्माण करण्याच्या हेतूने नवी संघटना अस्तित्वात आली असल्याचे भस्मे यांनी सांगितले. संघटना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.नव्या संघटनेची कार्यकारिणी खालीलप्रमाणे :- उपाध्यक्ष- गजानन साळुंखे (गुहागर), सचिव- परशुराम निवेंडकर (रत्नागिरी), खजिनदार- रंजन मिशाळे (लांजा), उपसचिव- सुनील तुळसकर (राजापूर) यांसह संघटक म्हणून शैलेश वाघाटे, दीपक डोळे व प्रकाश झेपले यांची नेमणूक करण्यात आली आहे.

देवरुखात १६ ऑगस्टला जिल्हास्तर लिटिल चॅम्पस् गायन स्पर्धा
देवरुख, १० ऑगस्ट/ वार्ताहर
संगमेश्वरचे माजी आमदार रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त देवरुख शहर शिवसेनेतर्फे १६ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय लिटिल चॅम्पस् गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निवडफेरीसाठी २७ स्पर्धकांनी सहभाग घेतला, त्यापैकी १२ स्पर्धकांची अंतिम स्पर्धेसाठी निवड होणार आहे. अंतिम स्पर्धा गवळी समाज सभागृहात १६ ऑगस्ट रोजी होणार असून, प्रथम क्रमांकास १० हजार १०१, द्वितीय क्रमांकाला नऊ हजार १०१ व तृतीय क्रमांकाला पाच हजार १०१ अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील १४ वषार्ंखालील लहानग्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.