Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

क्रीडा

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिटनेस चाचणी सुरू
नवी दिल्ली, १० ऑगस्ट/ वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेमध्ये २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार असून त्यासाठी काही भारतीय क्रिकेटपटूंच्या फिटनेस चाचणीला येथे आज सुरूवात करण्यात आली आहे. संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन, फिजिओ नितीन पटेल, गोलंदाजी प्रशिक्षक वेंकटेश प्रसाद आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंग यांच्या निगराणीखाली आज येथे काही क्रिकेटपटूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली असून उद्या मुंबईमध्येही काही क्रिकेटपटूंची फिटनेस चाचणी घेण्यात येणार आहे.

वाडाच्या नियमावलीविरुद्ध आम्ही आवाज उठविला इतकेच- झहीर
नवी दिल्ली, १० ऑगस्ट/ वृत्तसंस्था

‘वाडा’ची नियमावली अन्य खेळाडूंनाही जाचक वाटते. आम्ही त्याविरुद्ध आवाज उठविला इतकेच, अशी प्रतिक्रिया भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान याने व्यक्त केली आहे. ‘वाडा’च्या नियमावलीवर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने भारतीय क्रिकेटपटूंवर चहूबाजूंनी टीका होत आहे. त्याबाबत आज येथे पत्रकारांनी झहीरला विचारले असता तो म्हणाला, की या नियमावलीचा जगभरातील अन्य खेळाडूंनाही जाच वाटतो आहे. मात्र त्याविरुद्ध कोणी तक्रारीचा सूर काढलेला नाही. आम्ही त्याविरुद्ध आवाज उठविल्याने आम्हाला सर्वाच्या टीकेचे धनी व्हावे लागत आहे.

सानिया अंतिम सामन्यात पराभूत
व्हॅन्क्यूअर, १० ऑगस्ट/ पीटीआय

येथील ७५,००० हजार डॉलर्सचे बक्षिस असलेल्या वॅन्क्यूअर खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्याने भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाचे सलग दुसरे आयटीएफ अजिंक्यपद जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अंतिम फेरीत सानियाला कॅनडाच्या स्टेफनी डुबोइसने पराभूत केले. उपान्त्य पूर्व आणि उपान्त्य फेरीतील नेत्रदीपक कामगिरीमुळे सानिया या स्पर्धेचे जेतेपद पटकावून सलग दुसरे आयटीएफ अजिंक्यपद पटकावेल असे साऱ्यांनाच वाटत होते. पण सानियाला अंतिम फेरीत स्टेफनीने १-६, ६-४, ६-४ असे पराभूत केले.

हेडिंग्ले कसोटीसाठी फ्लिन्टॉफ फिट होता..
हेडिंग्ले, १० ऑगस्ट/वृत्तसंस्था

हेडिंग्ले येथील चौथ्या अ‍ॅशेस कसोटीत खेळण्यासाठी अँड्रय़ू फ्लिन्टॉफ ‘फिट’ होता; पण इंग्लंडचा कर्णधार अँड्रय़ू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक फ्लॉवर यांनीच त्याला डावलण्याचा निर्णय घेतला असे खळबळजनक विधान फ्लिन्टॉफचा एजंट अँड्रय़ू चॅन्डलर याने केले आहे. काल ही लढत संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत इंग्लंडच्या माजी कर्णधार मायकेल आथरटन याने फ्लिन्टॉफला न खेळवण्याचा निर्णय कुणाचा होता असा थेट प्रश्न स्ट्रॉसला केला तेव्हा हा निर्णय कर्णधार व प्रशिक्षकाचा होता, असे त्याने सांगितले होते.

विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघाचे प्रसारमाध्यमांकडून कौतुक
सिडनी, १० ऑगस्ट, वृत्तसंस्था

अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने मिळविलेल्या विजयामुळे येथील प्रसारमाध्यमांनी रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील संघाचे तोंडभरून कौतुक केले आहे. द डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राने म्हटले आहे की, पाँटिंगच्या संघाने आपल्या जुन्या शत्रूला चारी मुंडय़ा चीत केले. फक्त तीन दिवसांत कसोटीचा निकाल लावणाऱ्या पाँटिंगच्या संघाची कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे. रिकी पाँटिंग याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीतील हा संस्मरणीय विजय आहे.

इंग्लंडने पराभवामुळे घाबरू नये
ब्रिटीश प्रसारमाध्यमांचे मत
लंडन, १० ऑगस्ट, वृत्तसंस्था
चौथ्या कसोटीतील पराभवाममुळे इंग्लंडच्या खेळाडूंनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे मत इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनी व्यक्त केले आहे. या पराभवामुळे खचून न जाता इंग्लंड संघाने पाचव्या आणि निर्णायक कसोटीत विजय मिळविण्याच्या निर्धारानेच मैदानात उतरायला हवे, असेही येथील वृत्तपत्रांनी म्हटले आहे.

भारताने विजयाचे खाते उघडले; चेतन आनंद विजयी
एकेरीत मुटाटकर, मिश्र दुहेरीत विष्णू व बालन आणि पुरूष दुहेरीमध्ये रुपेशकुमार व थॉमस पराभूत
हैदराबाद, १० ऑगस्ट/ पीटीआय
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत आजचा दिवस भारताचा नाहीच असे साऱ्यांना वाटत होते. कारण भारताला सुरूवातीपासून एकही यश मिळाले नव्हते. भारत आपले विजयाचे खाते उघडण्यासाठी आतूर होता. मायदेशात स्पर्धा होत असताना देखील विजय मिळत नसल्याने प्रेक्षकही काहीसे नाराज दिसत होते. पण चेतन आनंदने ही मरगळ झटकून टाकली आणि भारताच्या विजयाचे खाते उघडले. चेतनने पुरूष एकेरीमध्ये कोरियाच्या जी उन होंगवर २१-८, २१-१६ असा विजय मिळविला.

‘फिफा’च्या अध्यक्षांना क्रीडामंत्री गिल भेटणार
नवी दिल्ली, १० ऑगस्ट/ वृत्तसंस्था

भारतात फुटबॉलच्या प्रसारासाठी केंद्रीय क्रीडामंत्री एम. एस. गिल हे ‘फिफा’चे अध्यक्ष जोसेफ ब्लॅटर यांना उद्या झुरिच येथे भेटणार आहेत. या वेळी गिल यांच्यासमवेत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे मावळते सरचिटणीस अल्बटरे कोलॅको असतील. ही माहिती केंद्रीय क्रीडा सचिव ई. श्रीनिवास यांनी पीटीआयशी बोलताना दिली.गिल हे सध्या स्वित्र्झलडमध्ये अन्य कामासाठी गेले आहेत. ‘फिफा’चे अध्यक्ष जोसेफ ब्लॅटर यांनी एप्रिल २००७ मध्ये भारताला भेट दिली होती. त्या वेळी त्यांनी भारतात फुटबॉलच्या गुणात्मक प्रसारासाठी ‘विन इन इंडिया विथ इंडिया’ नावाची महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली होती. त्यानुसार ‘फिफा’ने भारतात आठ कृत्रिम हिरवळीची मैदाने (अ‍ॅस्ट्रो टर्फ) तयार करण्यास मान्यता दिली आहे. ब्लॅटर यांच्याबरोबरच्या भेटीत गिल हे भारतात फुटबॉलची मोठी स्पर्धा घ्यावी अशी मागणी करतील, असे सांगितले जात आहे.

पी. सॉलोमन दुहेरी मुकुटाचा मानकरी
ठाणे, १० ऑगस्ट/ क्री.प्र.
निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमाने स्व. मीनाताई ठाकरे रंगायतनात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ५६ व्या राष्ट्रीय हौशी शरीर-सौष्ठव स्पर्धेत छत्तीसगढच्या पी. सॉलोमनने सुपर टॉल गटातील सुवर्णपदकांसह पश्चिम भारत श्री व भारत श्री किताब संपादन करून दुहेरी मुकुटाचा मान प्रथमच संपादन केला.भारत केसरी (४० वर्षांवरील) गटात टॉल गटातील महाराष्ट्राच्या अंकुश तेरवणकरने सलग तिसऱ्या वर्षी किताब संपादून हॅट्ट्रिक साधली. मात्र गेली ६ वर्षे भारत श्री किताब विजेत्याचा मान पटकावणाऱ्या महाराष्ट्राला यंदा विजयी दौड कायम राखण्यात अपयश आले. भारत उदय किताब पंजाबच्या जगतन सिंगने, भारत किशोर (२१ वर्षांखालील) किताब व भारतकुमार (२५ वर्षांखालील) हे दोन्ही किताब कर्नाटकच्या अनुक्रमे जे. व्हर्गिस व एस. एम. शिवमूर्ती यांनी पटकावले.या राष्ट्रीय स्पर्धेत १३ राज्यांतील २५० व्यायामपटूंनी भाग घेतला. भिवंडीचे महापौर जावेद दळवी यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. महाराष्ट्राचे ज्येष्ठ क्रीडा संघटक, प्रशिक्षक रमेश चव्हाण यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला.

पाकिस्तानी खेळाडूंचा भारतीय बुकींशी संबंध नाही
आयसीसीचा निर्वाळा
दुबई, १० ऑगस्ट/वृत्तसंस्था

श्रीलंकेतील मालिकेतील पाकिस्तानी खेळाडूंचा भारतीय बुकींशी संबंध आल्याच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर आय.सी.सी.च्या लाचलुचपत विरोधी आणि सुरक्षा पथकाने कसून चौकशी केली. मात्र कोलंबोतील त्या हॉटेलात त्या संदर्भात कुठलेही पुरावे सापडले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.आय.सी.सी. आणि त्यांचे सदस्य देश लाचलुचपत विरोधी असून असले प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत, असे आय.सी.सी.चे प्रमुख कार्यवाह हरुन लॉर्गट यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचे आरोप होताच त्याची कसून चौकशी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले व पाक खेळाडू या प्रकरणी निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला.