Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

ठाण्यात होणार स्वाईन फ्ल्यूची तपासणी
निकृष्ट मास्क वाटणाऱ्यांवर कारवाई होणार
ठाणे/प्रतिनिधी -
पुणे, मुंबईप्रमाणे ठाणे जिल्ह्यातही स्वाईन फ्ल्यूचे तीन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मात्र या रोगाची तपासणी करणारी यंत्रणा ठाण्यात नसल्याने निदान होण्यास विलंब होत आहे, त्यामुळे निधीची काळजी न करता तात्काळ स्वाईन फ्ल्यूच्या तपासणीची यंत्रणा सामान्य रुग्णालयात सुरू करावी. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय मास्कचे वितरण करणाऱ्या संस्था अथवा राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज जिल्हा नियोजनाच्या बैठकीत दिले.

सुरक्षेतील भगदाडांमुळे एमटीएनएलची संपर्क व्यवस्था धोक्यात?
सोपान बोंगाणे

ठाणे ते भांडूप या परिसरात असलेले एक लाख ६५ हजार दूरध्वनी ग्राहक आणि लाखोंच्या घरात असलेल्या इंटरनेट व मोबाइलधारकांच्या संपर्काचे प्रमुख साधन असलेली कोटय़वधी रुपये किमतीची अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असलेल्या चरई या मुख्य दूरध्वनी केंद्रासह या भागातील अन्य लहान-मोठय़ा सर्वच दूरध्वनी केंद्रांची सुरक्षा यंत्रणा कमालीची कुचकामी व ढिसाळ असल्याच्या तक्रारी आहेत. दूरध्वनी केंद्रातील सर्वच मेटल डिटेक्टर्सही दोन वर्षांपासून नादुरुस्त झाले असून, देशात होत असलेल्या अतिरेकी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर एखादे घातपाताचे कृत्य घडल्यास ठाणे ते भांडूप परिसरातील ‘एमटीएनएल’ची संपर्क यंत्रणा कोलमडून या भागाचा जगाशी संपर्क तुटू शकतो, अशी भीती त्यातील जाणकार व्यक्त करीत आहेत.

सहजीवन संमेलनात मान्यवरांचा गौरव
ठाणे/प्रतिनिधी

सहजीवन फाऊंडेशन या संस्थेतर्फे आयोजित राज्य पातळीवरील सहजीवन संमेलन नुकतेच गडकरी रंगायतनमध्ये संपन्न झाले. फाऊंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष व सुप्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शाहू रसाळ यांच्या पुढाकाराने या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा भारतीय अध्यात्मरत्न हा पुरस्कार डॉ. रसाळ यांनी सद्गुरू वामनराव पै यांना सन्मानपूर्वक प्रदान केला. या पुरस्कारामध्ये स्वत:चे ४० हजार रुपये, तर संध्याराणी रसाळ यांनी ५१ हजार रुपये असे एकूण एक लाख एक हजार रुपये जीवन विद्या मिशनच्या कर्जत येथील प्रकल्पास देणगी म्हणून दिले.

ठामपा उपायुक्त निंबर्गी यांच्या चौकशीचे आदेश
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे महापालिकेत उपायुक्तपदाची बढती मिळाल्यानंतरही सचिवपदी राहण्याचा आग्रह धरणारे प्रभुराज निंबर्गी यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश नगरविकास विभागाने पालिका आयुक्तांना दिले आहेत. पालिकेत उपायुक्तपदी बढती मिळाल्यानंतरही सत्ताधाऱ्यांची मर्जी सांभाळून सचिव आणि मुख्य लेखापरीक्षक अशी महत्त्वाची, मात्र उपायुक्त दर्जापेक्षा कनिष्ठ दर्जाच्या पदावर निंबर्गी कार्यरत होते. मध्यंतरी त्यांची बदली झाल्यानंतरही सत्ताधारी पक्षाने त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे वादग्रस्त ठरलेले निंबर्गी आता चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘आम्हाला गृहीत धरू नये’ कुणबी सेनेचा इशारा
शहापूर/वार्ताहर :
भात उत्पादक शेतकऱ्यांची एकही समस्या सोडवता न आलेल्या शरद पवार यांच्या पक्षाचे नाव न घेतलेले बरे. किमान शिवसेना शेतकऱ्यांसाठी पोटतिडकीने लढे तरी देते, तरीही आमचा पाठिंबा शिवसेनेसह कुणीही गृहीत धरू नये. येत्या विधानसभेसाठी कार्यकर्त्यांकडे विचारमंथन करून कदाचित स्वबळावरही निवडणूक लढण्याचा इशारा कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि शरद पवार सत्ताधारी ज्येष्ठ नेते आहेत या भावनेने त्यांना जवळ केले, परंतु त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेतला नाही.

अनधिकृत औषध विक्रीवर बंदी घालण्याची मागणी
वाडा/वार्ताहर

वाडा, कुडूस परिसरातील काही औषध विक्रेत्यांकडून अनधिकृतरीत्या औषधांची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असून, या औषधांचा वापर काही तरुण नशेसाठी करीत असल्याचे उघड झाले आहे.
अनधिकृतरीत्या होत असलेल्या या औषधांची विक्री थांबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अमिन सेंदू यांनी तहसीलदारांकडे केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांच्या दुकानांतून ठराविक तरुणांकडून वारंवार खरेदी होत असलेल्या या औषधांचा वापर हे तरुण नशा येण्यासाठीच करीत असून, यामुळे सार्वजनिक हिताला बाधा येऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येत आहे. यामुळे या औषधांच्या विक्रीवरच बंदी आणावी, अशी मागणी सेंदू यांनी केली आहे.

टेबल टेनिस स्पर्धेत ममता, ओंकारचे यश
डोंबिवली/प्रतिनिधी

येथील यश जिमखान्यात आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरी गटात मुंबईचा ओंकार तोरगलकर याने, तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या ममता प्रभू हिने यश मिळविले आहे. या दोघांनी सरळ लढत देऊन टॉपस्पिन, बॅकहॅण्ड आणि फोरहॅण्ड करत ही स्पर्धा जिंकली. ज्युनिअर गर्ल्स गटात नागपूरच्या मल्लिका भांडारकर, पुरुष गटात ठाण्याच्या आकाश दामले, युवा तरुण गटात पुण्याच्या सन्मय परांजपे, युवती गटात ठाण्याच्या प्रीती मोकाशी हिने यश मिळवले आहे. यशस्वी स्पर्धकांना नगरसेवक रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते चषक, स्मृतिचिन्ह आणि बक्षिसांची रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी यतिन टिपणीस, सचिन चिटणीस, शिरीष बेणारे, राजून वडनेरकर, दिलीप वडनेरकर उपस्थित होते.

मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी प्रगती कॉलेजमध्ये स्पर्धा
डोंबिवली/प्रतिनिधी -
अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवस्थापनात त्याची अंमलबजावणी कशी करायची, या विषयावर प्रगती महाविद्यालयात १२ व १३ ऑगस्ट रोजी ‘प्रश्नईड’ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन केले आहे. प्रगती महाविद्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी नऊ वाजता या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. प्रश्नचार्य डॉ. ए. पी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वषार्पासून विद्यार्थी हा उपक्रम साजरा करत आहेत. यावेळी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील ७५ महाविद्यालयांतील विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. बीएमएस आणि बी. बी अ‍ॅण्ड आयच्या अभ्यासक्रमावर आधारित या कार्यक्रमात स्पर्धा घेण्यात येतात. विशेषकरून मॅनेजमेंटचे कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणी असते. आपले कौशल्य या स्पर्धेच्या माध्यमातून दाखविण्याची एक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. सहा ते सात प्रकारच्या स्पर्धाचा यामध्ये अंतर्भाव असतो, असे संयोजक वैभव रामी, संतोष अय्यर यांनी सांगितले. पूजा दोशी, विजयानंद अय्यर, भूषण दप्तरदार, प्रतीक सरवणकर, अमोल खेडुलकर, अक्षय तारी, तेजस देशपांडे हे या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमाला बजाज अलायन्झ, अर्जुन असोसिएट, सीम टेक्नॉलॉजी, आयकॉन यांनी सहकार्य केले आहे.

कर्णबधिर विद्यालयातील मुलांचे अनोखे रक्षाबंधन..
ठाणे/प्रतिनिधी

मानवी जीवनात नातेसंबंधांना किती महत्त्वाचे स्थान आहे हे आपण सारेच जाणतो. विद्यार्थी-शिक्षक, बहीण-भाऊ, आई-मूल, मित्र-मैत्रिणी ही सगळी नाती किती वेगवेगळी, विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आदर, बहिणीला भावाबद्दल माया, तर भावाला बहिणीबद्दल ममता.. सारी नाती अशी स्नेहाची, प्रेमाची, आपुलकीची, बंध जोडणारी, बंध जपणारी. दैनंदिन जीवनात आपला अनेकांशी संबंध येतो, अनेक लोक आपल्याला सहकार्य करतात, त्यांना राखी बांधून कृतज्ञता व्यक्त करावी, या हेतूने जव्हेरी ठाणावाला कर्णबधिर विद्यालयातील इयत्ता चौथी ते सातवीची मुले बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेशन रोड, समाजकल्याण कार्यालय, पोलीस स्टेशन, स्टेट बँक ऑफ इंडिया येथे राखी बांधायला गेली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका बागेश्री वेलणकर, शिक्षिका अरुणा पाटील, सुजाता चितळे, मनीषा गवळे, जया पराडकर, विलास शेंडगे हे विद्यार्थ्यांसमवेत होते. बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य प्रबंधक सुनील ढवळे, स्टेट बँक ऑफ त्रावणकोरचे मॅनेजर अशोककुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर नागवेकर, पोलीस निरीक्षक सचिन साळवी, तसेच समाजकल्याण कार्यालयातील सहाय्यक सल्लागार संगीता शिर्के यांनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या सर्व मुलांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व उत्स्फूर्तपणे बक्षिसे दिली.

रिपाइंच्या कार्यालयावर समाजवादी कार्यकर्त्यांचा हल्ला
भिवंडी/वार्ताहर :
शहरातील राजकीय वादातून रिपाइं (आठवले)च्या शाखा अध्यक्षास समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करीत त्यांच्या कार्यालयाची मोडतोड केल्याची घटना घडली. या हल्ल्याप्रकरणी कुंभारवाडा पोलिसांनी सपाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नवी वस्ती भागातील नेहरूनगर येथील रिपाइं शाखा अध्यक्ष हासिफ अन्सारी हे आपल्या दोघा सहकाऱ्यांसह कार्यालयात बसले असता, त्याच भागात राहणारा समाजवादी पार्टीचा कार्यकर्ता मुन्ना जळाद व्हिडीओवाला याच्याशी त्याची बाचाबाची झाली. यावेळी मुन्नाने रात्री ११च्या सुमारास आपल्या दहा साथीदारांसह रिपाइंच्या वॉर्ड शाखेवर हल्ला करून कार्यालयातील सामानाची नासधूस केली. यावेळी रिपाइं शाखा अध्यक्ष अन्सारी यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. या हल्ल्याप्रकरणी मुन्ना व त्याच्या दहा साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र आरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश आल्याने रिपाइं कार्यकर्त्यांत संतापाची लाट पसरली आहे.

रिक्षा-ट्रक अपघातात एक ठार
भिवंडी/वार्ताहर

भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने प्रवासी रिक्षाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भिवंडीकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या एका रिक्षाला ठाण्याहून येणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकने अंजूरफाटय़ाजवळील होली मेरी शाळेसमोर जोरदार धडक दिली. या अपघातात मनीष मोहन म्हात्रे (२२) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लघु व मध्यम उद्योजकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा
ठाणे/प्रतिनिधी-
लधु व मध्यम उद्योग विकास चेंबर ऑफ इंडियाच्या वतीने लघु व मध्यम उद्योजकांना प्रशिक्षित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मुंबईत करण्यात आले आहे. ३, अप्पर ग्राऊंड मजला, समृद्धी व्हेंचर पार्क, हॉटेल तुंगा पॅरेडाईजच्या बाजूला, मरोळ एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, अंधेरी (पू.), मुंबई येथे ही कार्यशाळा होणार आहे. लघु व मध्यम उद्योजकांना निविदा प्रक्रिया, नोंदणी, संधी, आव्हाने, फायदे, कागदापत्रांची पूर्तता, निविदापूर्व पात्रता आदींचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाणार आहे. संपर्क-२८२५०४१५.

मानाच्या दहीहंडीत होणार बक्षिसांची उधळण
ठाणे/प्रतिनिधी -
शहराला दहीहंडी उत्सवाचा लौकिक मिळवून देणारी आणि मानाची म्हणून ओळखली जाणारी टेंभीनाक्यावरील दहीहंडी यंदाही मोठय़ा उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यावेळी खासदार आनंद परांजपे, उपशहरप्रमुख नरेश म्हस्के, शहरप्रमुख रमेश वैती, टेंभी नाका मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार शेडगे आदी उपस्थित होते. दिवंगत आनंद दिघे यांची मानाची हंडी म्हणून ओळखला जाणारा हा दहीहंडी उत्सव नेहमीच भव्य व नावीन्यपूर्ण पद्धतीने साजरा करताना, त्यातील शालीनता जपण्याचा कटाक्ष असतो. यंदा मुंबईतील गोविंदा पथकासाठी एक लाख ५१ हजार, तर महिला गोविंदा पथकासाठी ५१ हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून, सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकास रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या हंडीला सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित राहणार आहेत. तसेच शहरातील होतकरू कलाकार आपला कलाविष्कार सादर करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यांगितले.

स्वाइन फ्ल्यूच्या वाढत्या प्रसारामुळे अंबरनाथची दहीहंडी रद्द
बदलापूर/वार्ताहर -
पुण्यासह मुंबईमध्ये स्वाईन फ्ल्यूने घातलेल्या थैमानामुळे काहीजण दगावले, तसेच असंख्य नागरिकांना याचा त्रास जाणवत आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दीमुळे स्वाईन फ्ल्यूचे प्रमाण वाढत आहे. याच कारणामुळे अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे लावण्यात येणारी दहीहंडी कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश युवक अध्यक्ष महेश तपासे यांनी दिली. पुण्यापाठोपाठ मुंबईला स्वाईन फ्ल्यूचा विळखा पडलेला आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा अशा प्रकारची खबरदारी घेण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. याच धर्तीवर दहीहंडीचा कार्यक्रम रद्द केला आहे. शहरात तसेच आदिवासी पाडय़ांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क उपलब्ध झाल्यानंतर वाटप करण्यात येईल, अशी माहितीही तपासे यांनी दिली.

वाडय़ातील मॅरेथॉन स्पर्धेत ईश्वर मोरे विजेता
वाडा/वार्ताहर -
तालुका कला, क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऑगस्ट क्रांती’ वर्षा मॅरेथॉनमध्ये १५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभागी होऊन स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार दामू शिंगडा यांनी केले, तर बक्षीस समारंभ खासदार सुरेश टावरे यांच्या हस्ते करण्यात आला. चार गटांमध्ये ही स्पर्धा झाली. २१ किलोमीटरच्या खुल्या गटामध्ये ईश्वर मोरे याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला सात हजार ७७७ रुपये रोख, आकर्षक चषक बक्षीस देण्यात आले. १९ वर्षांखालील मुलींच्या गटात (सात कि.मी.अंतर) साधना सवरा हिने प्रथम क्रमांक मिळविला. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात (पाच कि.मी. अंतर) दिगंबर बरक याने प्रथम क्रमांक मिळविला, तर १७ वर्षांखालील मुलींच्या गटात (तीन कि.मी.) साधना मलकरी हिने प्रथम क्रमांक पटकाविला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कला, क्रीडा समितीचे अध्यक्ष योगेश पाटील, त्यांचे सहकारी संदीप दुपारे, संतोष बुकले, बी.के. पाटील, अशोक गव्हाळे आदींनी विशेष परिश्रम घेतले होते.