Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

‘स्वाईन फ्लूच्या मुकाबल्यासाठी केंद्रीय पथके राज्यांमध्ये पाठविणार’
नवी दिल्ली, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

 

देशभरात वेगाने पसरत चाललेल्या स्वाईन फ्लूच्या महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने आज अनेक पावले उचलली असून केंद्राच्या संयुक्त वा अतिरिक्त सचिव स्तराच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्रत्येक राज्यात पथके पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी तसेच या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी येत्या दोन दिवसात केंद्रीय आरोग्य खात्याचे स्वतंत्र वेबसाईट सुरु होणार आहे. स्वाईन फ्लूची लागण टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा तसेच मुलांना घराबाहेर न पाठविण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्री गुलामनबी आझाद यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत दिला.
स्वाईन फ्लूबद्दल सतर्कता बाळगण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सर्व राज्यांशी पत्रव्यवहार करून या महामारीचा मुकाबला करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली. पण अशा पत्रव्यवहाराचा फारसा उपयोग होत नसल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आता केंद्रीय कॅबिनेट सचिवांच्या मदतीने अन्य मंत्रालयांतून ३५ संयुक्त व अतिरिक्त सचिवांची प्रतिनियुक्ती करून त्यांना उद्या स्वाईन फ्लूविषयी प्रशिक्षण देण्याचा व त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक राज्यात केंद्राचे पथक पाठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ही पथके राज्य सरकारशी चर्चा करतील आणि स्वाईन फ्लूच्या उपचारासाठी सरकारी व खासगी इस्पितळे निश्चित त्यांची जबाबदारी ठरवतील, असे आझाद यांनी आज सायंकाळी शास्त्री भवनात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. स्वाइन फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी शाळा व महाविद्यालये बंद करायचे की नाही, हा निर्णय केंद्राने राज्य सरकारांवर सोपविला आहे. शाळा व महाविद्यालये बंद ठेवणे हा इलाज नसल्याचे मत आझाद यांनी व्यक्त केले. शाळांना सुटय़ा देऊनही मुले बाजारात, पार्कमध्ये आणि मॉल्समध्ये जाणार असतील तर त्याला अर्थ राहणार नाही. मुलांना घराबाहेर पडू न देणे हाच त्यावरचा उपाय आहे. स्वाईन फ्लूची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी व कार्यालयांमध्ये न जाणे व प्रसार टाळण्यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
स्वाईन फ्लूच्या निदानासाठी देशात १८ प्रयोगशाळा अस्तित्वात असून या बाबतीत खासगी इस्पितळांच्या प्रयोगशाळांच्या सक्षमतेचीही चाचणी करण्यात येईल. स्वाइन फ्लूच्या चाचणीसाठी सहा तास लागतात आणि प्रतिव्यक्ती १० हजार रुपये खर्च येतो, असे सांगून आझाद म्हणाले की, आतापर्यंत केंद्र सरकारने अशा सुमारे चार हजार चाचण्या केल्या आहेत. सध्या देशात चाचणीसाठी २७ हजार किटस् असून आणखी २० हजार किटस् मागविण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या किटस् तयार करण्यात भारतीय औषध कंपन्यांना यश आल्यास त्यांची किंमत वीस पटींनी कमी होईल. स्वाइन फ्लूला निष्प्रभ करणारी लस अजून जगात कुठेही तयार झालेली नसून भारतातील तीन औषध कंपन्या त्यात पुढाकार घेत आहेत. अशा लशीचे जगात कुठेही उत्पादन झाल्यास भारत ती विकत घेईल, असे आझाद यांनी स्पष्ट केले. स्वाईन फ्लूवरील औषध टॅमी फ्लूची खुल्या बाजारात उपलब्ध न करण्याचा सरकारचा निर्णय कायम असून पुढच्या दोन तीन दिवसात ७५ लाख गोळ्या वाटण्यात येतील, असे आझाद यांनी सांगितले.
देशात स्वाईन फ्लूची लागण झालेले एकूण ८६४ रुग्ण असून त्यापैकी ५२३ रुग्णांना प्राथमिक उपचारांनंतर सुटी देण्यात आली आहे. आणखी ३४१ रुग्ण इस्पितळांमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत पुण्यात ३, तर मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नईमध्ये प्रत्येकी एक असे एकूण सहा जण स्वाइन फ्लूमुळे मृत्युमुखी पडले आहेत. देशभरात स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह असलेल्या ४०८४ रुग्णांपैकी ६३३ रुग्णांची ओळख विमानतळांवर झाली असल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांनी येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर चौकशी कायम ठेवण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये स्वाइन फ्लूचे रुग्ण शोधून काढण्यासाठी सक्तीने माहिती घेण्याचे निर्देश हवाई सुंदऱ्यांना देण्यात आले आहेत. दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर चार थर्मल स्कॅनर लावण्यात आले आहेत. थर्मल स्कॅनर्समुळे स्वाईन फ्लूची बाधा झालेल्या व्यक्ती शोधण्याचे प्रमाण पाच टक्क्यांवरून २० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे देशभरातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर थर्मल स्कॅनर्स लावण्यात येतील, असे आझाद यांनी सांगितले. स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढतच जाणार असून या संकटासाठी पूर्ण सज्जतेसह तयार राहावे लागेल, असे आझाद म्हणाले.