Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

विविध
(सविस्तर वृत्त)

ऑस्ट्रेलियात आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला
इंदोर, १० ऑगस्ट / पीटीआय

 

भारतीय विद्यार्थ्यांवर वाढत्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने भारतीयांच्या संरक्षणाची हमी दिल्यानंतरही इंदोरच्या मोहित मंगल या युवकाला बेदम मारहाण झाली आहे. इंदोरच्या जुना पालासिया भागातील रहिवासी असलेल्या मोहितवर काल रात्री १ वाजून ३० मिनिटांनी हा हल्ला झाला.
सिडनीतील शॉपिंग मॉलमध्ये मॉल सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या मोहितवर कामाला जात असताना चार ऑस्ट्रेलियन तरुणांनी मारहाण केली. प्रथम मोहितच्या डोक्यावर बिअरची बॉटल फोडली. नंतर बेसबॉलच्या बॅटने त्याच्या कंबरेवर आणि पायावर या तरुणांनी बेदम चोप दिला, असे सुत्रांकडून समजते.
या घटनेबाबत इंदोरमध्ये ऑटोमोबाइलचा व्यवसाय करणारे मोहितचे वडील अनिल मंगल यांनी सांगितले की, मोहितची प्रकृती आता बरी आहे. माझ्या मुलाचे कुणाशीच शत्रूत्व नाही. सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा हा एक भाग असावा, असे ते पुढे म्हणाले. अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मोहित ऑस्ट्रेलियाला गेला. एस. एम. कृष्णा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना भारतीय विद्यार्थ्यांवरील हा चौथा हल्ला आहे.