Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

व्यक्तिवेध

केवळ पुण्या-मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्य व देशभरातील घराघरांमध्ये सध्या एक नाव अगदी रामबाण इलाजासारखे घेतले जात आहे. ते म्हणजे ‘टॅमिफ्लू’ गोळी! अक्षरश: वाऱ्याच्या वेगाने फोफावणाऱ्या ‘स्वाईन फ्लू’च्या संसर्गावर उपलब्ध असलेले एकमेव औषध. एखादा संसर्ग वा आजार मेक्सिको, अमेरिका, युरोप असा दुसऱ्याच्या दारी येतो आणि त्या संदर्भातील घडामोडींचे वृत्त एरवी आपण फक्त वाचतो-पाहतो. पण, आता तर आपल्याच दारी हे ‘संसर्गसंकट’ धडकले आहे. पुणे हा त्याचा केंद्रबिंदू. विद्येचे माहेरघर, निवृत्तांचे शहर,

 

क्रीडानगरी अशी ओळख असलेल्या पुण्याला आता ‘स्वाईन फ्लू’चे शहर असे संबोधले जाऊ लागले आहे. कोणत्याही गोष्टींची एरवी चोखंदळपणे निवड करणाऱ्या पुणेकरांसाठी सध्या तरी एका गोष्टीला पर्याय नाही. ती म्हणजे ‘टॅमिफ्लू’. म्हणूनच डॉ. नॉर्बर्ट बिशोफबर्जर यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. कारण?.. डॉ. नॉर्बर्ट हे आहेत ‘टॅमिफ्लू’चे जनक! डॉ. नॉर्बर्ट हे मूळचे ऑस्ट्रियामधील रसायनशास्त्र या विषयातील संशोधक. इन्सब्रुक विद्यापीठामधून पदवी प्राप्त केल्यानंतर स्वित्र्झलडमधील झुरिच येथील विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठामधून त्यांनी ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री’ या विषयात पीएच. डी. दर्जाचे संशोधन केले. पीएच. डी. नंतरचे अद्ययावत संशोधन करण्यासाठी त्यांनी हारवर्ड विद्यापीठ गाठले. १९८६ ते ९० या कालावधीत जेनेटेक या कंपनीच्या ‘डीएनए सिन्थॅसिस ग्रुप’ मध्ये ते कार्यरत होते. १९९० मध्ये जीलीड कंपनीमध्ये ‘ऑरगॅनिक केमिस्ट्री’ या विभागाचे संचालक म्हणून डॉ. नॉर्बर्ट यांनी सूत्रे स्वीकारली. तेथून सुरू झाला ‘टॅमिफ्लू’च्या संशोधनाचा प्रवास. डॉ. नॉर्बर्ट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने १९९३ मध्ये संशोधनाला प्रारंभ केला. विषाणूजन्य संसर्गावर तोंडाद्वारे घेता येणारी गोळी (टॅबलेट) विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. ९६ साली या गोळीची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. ‘इन्फ्लुएन्झा’ वर विकसित करण्यात आलेली आणि वैद्यकीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आतापर्यंतची एकमेव गोळी म्हणून तिचा लौकिक आजही कायम आहे आणि सध्या तर तिची निकड अधिकच जाणवते आहे! ‘इन्फ्लुएन्झावर, म्हणजेच विषाणूजन्य संसर्गावर नाकाद्वारे उपचार करण्याची पद्धती (इनहेलन्ट) अस्तित्वात होती. परंतु, अशा प्रकारचा संसर्ग झालेल्या रुग्णांना प्रामुख्याने श्वसनाचा त्रास जाणवतो. त्यामुळेच ‘इनहेलर्स’च्या उपयुक्ततेबद्दल शंका व्यक्त करण्यात येत होती. श्वसनमार्गाला टाळून फुफ्फुसांपर्यंत पोचू शकेल, असे औषध विकसित करण्याचे आव्हान होते,’ असे या संशोधनाची पाश्र्वभूमी कथन करताना डॉ. नॉर्बर्ट सांगतात. नवीन सहस्रकाच्या प्रारंभी ही गोळी बाजारपेठेत दाखल झाली. तत्पूर्वी, रोशे या स्वित्र्झलडमधील जगप्रसिद्ध कंपनीला तिचे बाजारपेठीय हक्क व यापुढील काळात ‘टॅमिफ्लू’ संदर्भात विकसन करण्याचे अधिकार विकण्यात आले. अर्थात, डॉ. नॉर्बर्ट व जीलीड कंपनी यांनी ‘टॅमिफ्लू’चे बौद्धिक स्वामित्व हक्क आपल्याकडेच ठेवले. वैद्यकीय क्षेत्र हे केवळ संशोधनापुरतेच मर्यादित राहिलेले नसून त्याच्या बाजारपेठेचा विस्तार कल्पनेच्या पलीकडील आहे. म्हणूनच वैद्यकविश्वामध्ये कित्येक तत्त्वनिष्ठ प्रश्न उपस्थित झाले आहे. पंचावन्न वर्षीय डॉ. नॉर्बर्ट यांनाही अशाच द्वंद्वाला सामोरे जावे लागले. विशेषत:, ‘टॅमिफ्लू’चे हक्क हस्तांतरित करताना त्यांच्यावर टीका करण्यात आली. जर्मनीमधील एका टॅब्लॉईडच्या माहितीनुसार डॉ. नॉर्बर्ट यांनी वार्षिक कमाई आहे साडेचार लाख पौंड. या व्यतिरिक्त कंपनीने त्यांना समभागांचाही मोठा वाटा दिला असून लक्षावधी पौंडचा बोनसही त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जात आहे. रोशेकडून विकत घेतल्यानंतर विविध देशांच्या शासनांकडून ‘टॅमिफ्लू’ वितरित केली जाते. या ‘व्यवहारा’ मधील मोठी टक्केवारीही डॉ. नॉर्बर्ट यांना प्राप्त होत आहे. ‘स्वाईन फ्लू’ पासून मुक्ती मिळविण्याच्या युद्धामध्ये सध्या तरी जीवनावश्यक औषधांच्या नफेखोरीविरोधातील लढाईत पांढरे निशाण फडकाविण्यावाचून गत्यंतर नाही!