Leading International Marathi News Daily

मंगळवार, ११ ऑगस्ट २००९

विविध

‘स्वाईन फ्लूच्या मुकाबल्यासाठी केंद्रीय पथके राज्यांमध्ये पाठविणार’
नवी दिल्ली, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

देशभरात वेगाने पसरत चाललेल्या स्वाईन फ्लूच्या महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र सरकारने आज अनेक पावले उचलली असून केंद्राच्या संयुक्त वा अतिरिक्त सचिव स्तराच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्रत्येक राज्यात पथके पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी तसेच या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी येत्या दोन दिवसात केंद्रीय आरोग्य खात्याचे स्वतंत्र वेबसाईट सुरु होणार आहे.

ऑस्ट्रेलियात आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला
इंदोर, १० ऑगस्ट / पीटीआय

भारतीय विद्यार्थ्यांवर वाढत्या हल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच आणखी एका भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने भारतीयांच्या संरक्षणाची हमी दिल्यानंतरही इंदोरच्या मोहित मंगल या युवकाला बेदम मारहाण झाली आहे.

मायकल जॅक्सनच्या मृतदेहाचा दफनविधी पूर्ण
लंडन, १० ऑगस्ट/ पीटीआय

‘किंग ऑफ पॉप’ मायकल जॅक्सन याच्या मृतदेहाचा दफनविधी कोणत्याही मोठय़ा समारंभाशिवाय पूर्ण करण्यात आला. २५ जूनला पन्नास वर्षीय मायकल जॅक्सनचा मृत्यू झाला होता. हॉलिवूड टेकडय़ांमधील फॉरेस्ट लॉन स्मशानभूमीमध्ये जॅक्सनचा मृतदेह दफन करण्यात आला, असे ‘मिरर ऑनलाईन’ या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दफनविधीच्यावेळी होऊ शकणारी मायकल जॅक्सनच्या चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी जॅक्सन कुटुंबीयांनी दफनविधीची जागा शेवटपर्यंत गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेच्या कारणास्तव मायकलचा देह हलविण्याचाही विचार कुटुंबीयांनी केला होता. ‘मायकल जॅक्सनच्या मृतदेहाचा दफनविधी पूर्ण करण्यात आला आहे. परंतु जॅक्सन कुटुंबीय व ‘फॉरेस्ट लॉन’चे व्यवस्थापन यांच्याशिवाय कोणालाही दफनविधीचे ठिकाण ठाऊक नाही’, असे स्मशानभूमी व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले. लॉस एंजल्स येथे यापूर्वीच मायकल जॅक्सनसाठी स्मृतिसमारोह झाला असल्याने कोणत्याही पारंपरिक विधीशिवाय जॅक्सनच्या मृतदेहाचे दफन करण्याचे जॅक्सन कुटुंबीयांनी ठरवले. गेल्या आठवडय़ात वैद्यकीय तपासणीसाठी बाहेर काढण्यात आलेल्या जॅक्सनच्या मेंदूचे दफनविधीपूर्वी देहात पुनरेपण करण्यात आले.

इराकमध्ये बॉम्बहल्ल्यांत ४१ ठार, १५० जखमी
बगदाद, १० ऑगस्ट/वृत्तसंस्था

इराकमध्ये आज पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला. इराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मोसुलमध्ये आज पहाटे स्फोटकांनी भरलेले दोन ट्रक धडकवून घडवून आणण्यात हल्ल्यात २५ जण ठार तर ७० जण जखमी झाले. तर बगदादच्या उपनगरांत दोन ठिकाणी झालेल्या स्फोटांत आणखी १६ जण ठार तर सुमारे ८० जण जखमी झाले. इराकच्या उत्तर भागात असलेले मोसुल हे शहर मुख्यत: सुन्नीबहुल आहे. मात्र ख्रिश्चन आणि शिया मुस्लिमांचीही संख्या तेथे लक्षणीय आहे. आज सकाळचा हल्ला मोसुलनजिकच्या खजनान या छोटय़ा गावात झाला. कुर्दिश वंशाच्या शबाक टोळीची वस्ती या गावात आहे. स्फोटकांनी भरलेले दोन ट्रक पहाटे या गावावर धडकविण्यात आले. या स्फोटात गावातील ३५ घरे उद्ध्वस्त झाली. या पाठोपाठ बगदादमध्येही सकाळी दोन वेगवेगळ्या उपनगरांत दोन शक्तिशाली स्फोट झाले. या स्फोटांमध्ये अनुक्रमे ९ व ७ जण जखमी झाले. तर अनुक्रमे ४६ व ३५ जण जखमी झाले.

दिल्लीतही दहशतीचे वातावरण, तीन शाळांना आठवडाभर सुटी
नवी दिल्ली, १० ऑगस्ट/खास प्रतिनिधी

हाय प्रोफाईल शाळांमधून स्वाइन फ्लू हळूहळू आता राजधानी दिल्लीतही पाय पसरू लागला आहे. स्वाइन फ्लूच्या दहशतीमुळे आज दिल्लीतील तीन शाळा आठवडय़ाभरासाठी बंद करण्यात आल्या. गुरगावमध्येही आज दिवसभरासाठी चार शाळा बंद ठेवण्यात आल्या. दिल्लीतील सातशे ते आठशे शाळांमध्येईस्ट ऑफ कैलाशमधील दिल्ली पब्लिक स्कूल आणि संस्कृती स्कूलपाठोपाठ आज नवी दिल्लीच्या हुमायूँ रोडवरील रघुबीर सिंह ज्युनियर मॉडर्न स्कूलही बंद ठेवण्यात आली. मॉडर्न स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांंना स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. अन्य शाळांतील काही वर्ग आज बंद ठेवण्यात आले. दिल्लीत सुमारे सातशे ते आठशे शाळांमध्ये कार्यरत असलेल्या पालक संघटना स्वाइन फ्लूच्या वाढत्या प्रसारामुळे दहशतीत आहेत. गुरगाव, नोईडा आणि गाझियाबादमधील शाळांमध्येही पालकांनी स्वाइन फ्लूचा धसका घेतल्याचे चित्र होते.स्वाइन फ्लूची विद्यार्थ्यांंमध्ये लागण टाळण्यासाठी पालकांची संघटना सतर्कता आणि प्रतिबंधक उपाययोजनांवर भर देत आहेत. दिल्लीत आतापर्यंत स्वाइन फ्लूची बाधा झालेल्या १७८ रुग्णांना उपचारांनंतर सुटी देण्यात आली असून ५८ रुग्णांवर अजून उपचार सुरु आहेत.

अमेरिकेतील भारतीय चित्रपट महोत्सवात ‘पाथेर पांचाली’, ‘आगंतूक’, ‘रुदाली’
लॉस एंजेलिस, १० ऑगस्ट / पीटीआय
अटलांटा येथे २१ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सातव्या वार्षिक भारतीय चित्रपट महोत्सवात सादर होणाऱ्या १२ चित्रपटांमध्ये सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’ आणि ‘आगंतूक’ यांच्यासह ‘रुदाली’ आणि ‘सलाम बॉम्बे’चा समावेश आहे.राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी)च्या माध्यमातून या चित्रपटांची निवड करण्यात आली असून, येथील हाय म्युझियममध्ये तो दाखविण्यात येणार आहे. यंदाच्या चित्रपटांची निवड हाय म्युझियमच्या मीडिया आर्टस् विभागाच्या क्युरेटर लिंडा डबलर आणि इंडो-अमेरिकन फिल्म सोसायटीचे संचालक ए. अग्निहोत्री यांनी केली आहे. ‘डान्स ऑफ द वाइंड’ या चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ होईल.

तैवानला चक्रीवादळाचा जबर तडाखा; १२ ठार, ५२ बेपत्ता
तैपेई, १० ऑगस्ट/पी.टी.आय.

चीन व तैवानच्या किनाऱ्याला मोराकोत या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला असून तैवानमध्ये त्याने किमान १२ जणांचे बळी घेतले आहेत. तर आणखी ५२ जण बेपत्ता आहेत. या वादळामुळे तैवानमध्ये गेल्या ५० वर्षांतील सगळ्यात भीषण पूर आले आहेत.मोराकोतने तैवानमध्ये तब्बल अडीच मीटर एवढा अतिप्रचंड पाऊस झाला आहे. परिणामी अनेक पूल वाहून गेले असून मोठय़ा प्रमाणावर नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. या वादळ व पावसामुळे तैवानमधील रेल्वे, रस्ते व हवाई वाहतूक पार कोलमडून गेली आहे. तर दक्षिण व मध्य तैवानमध्ये सगळीकडे पुराने थैमान मांडले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तैवानमधील एका स्थानिक चित्रवाणी वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार एका गावातील सुमारे २०० घरे दरडींखाली गाडली गेली आहेत. या गावातील प्राथमिक शाळा या प्रकारात पूर्ण उद्ध्वस्त झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तैवानच्या इतिहासात हे एक अतिभीषण संकट समजले जात आहे.