Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

अग्रलेख

निधर्मी स्वाइन फ्लू!

 

सध्या पुणे, मुंबई, अहमदाबाद, बडोदे, चेन्नई आदी शहरांमध्ये पसरलेला ‘स्वाइन फ्लू’ निधर्मी आहे आणि सर्वार्थाने तो सर्वधर्म समभावी आहे. ‘स्वाइन फ्लू’चा धर्म एकच, तो म्हणजे शरीरात प्रवेश करून त्याला पोखरणे. ‘स्वाइन फ्लू’चा विषाणू शरीरात शिरताना तो त्या देहाचा धर्म पाहात नाही, त्याला सगळेच सारखे! हा ‘स्वाइन फ्लू’ ज्याला होतो, तो लगेच इहलोक सोडून जातो, असेही समजण्यात अर्थ नाही. रुग्णालयातून घरी परतणाऱ्यांच्या तुलनेत मरणाऱ्यांची संख्या बेताची आहे. याचा अर्थ त्याविषयी काळजीच करायची नाही, असा नाही. ‘स्वाइन फ्लू’मुळे मरणाऱ्यांचे प्रमाण पाहिले तर एकूण रुग्णांच्या ०.००८ टक्के एवढेच असल्याचे सांगितले जाते. तरीही आपल्याकडल्या राजकारण्यांना त्याचेही भांडवल केल्याशिवाय राहवत नाही. आगामी सणांच्या निमित्ताने कोणती काळजी घ्यायला हवी, या संबंधात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत काही हिंदुत्ववाद्यांनी, आमच्या धर्माच्या सणांवर र्निबध लादता काय, असे फूत्कार सोडल्याचे बोलले जात आहे. हा शुद्ध आचरटपणा झाला. गोकुळाष्टमीच्या पारण्याला फोडल्या जाणाऱ्या दहीहंडीसाठी काय किंवा सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांची नयनरम्य देखावे पाहायला काय, जे येतात ते बहुतांशी हिंदूच असतात. मोठय़ा प्रमाणावर एकत्र आलेल्या या नागरिकांमध्ये एखादा तरी ‘स्वाइन फ्लू’चा रुग्ण असेल तर किती जणांना त्याची बाधा होईल, याची या मूर्खाना कल्पना तरी आहे का? अशा अवस्थेत दुर्दैवाने मृत्यूचे तांडव माजले तर या गर्दीत मरणारे बहुतांशी हिंदूच असतील. थोडक्यात उत्सवात गर्दी करणारे हिंदू गेले तरी आपल्याला त्याचे सोयरसुतक नाही, असेच या राजकारणी हिंदुत्ववाद्यांना म्हणायचे आहे काय? इथे हिंदू-मुस्लिम यांचा संबंध येतोच कुठे? झापडे लावून वावरणाऱ्यांच्याही बोकांडी ‘स्वाइन फ्लू’चे विषाणू बसल्याशिवाय राहणार नाहीत. हा गंभीर रोग आहे आणि त्याने पुण्यात आतापर्यंत रिदा शेख ते श्रुती गावडे असा अतिशय गंभीर प्रवास आत्तापर्यंत केला आहे. वृत्तपत्रांनी हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला असला तरी इलेक्ट्रॉनिक वृत्तमाध्यमांनी तो त्याहीपेक्षा धक्कादायक पद्धतीने घेतला आहे. ‘पुणे में अब तक चार मरे’ हे सांगण्याएवढीच त्यांच्या बुद्धय़ांकांची एकूण पातळी असायची शक्यता आहे. माणसाच्या जिवाला ते इतके हलके समजत असावेत, की त्यांच्यामुळे हा एक नवा ‘मीडिया मॉन्स्टर’ तर उभा राहणार नाही ना, असे वाटावे. आज समाजात जी काही घबराट निर्माण झाली आहे, तिच्या मुळाशी सरणावर ओतल्या जाणाऱ्या या बातम्याही आहेत. ज्याला आपण एन्फ्लुएन्झा म्हणून ओळखतो तो साधा फ्लू जगभरात रोज सरासरी ५७२ बळी घेऊ शकतो, तर इथे ‘स्वाइन फ्लू’ दिवसाला तीन वा चार बळी घेताना दिसत आहे. रोगांची लागण कशा पद्धतीने होते आणि त्याचा फैलाव कसा होतो, याची जागतिक आरोग्य संघटनेने जी पाहणी केली आहे, तीनुसार सर्वसाधारणपणे मध्यमवयीन स्त्री-पुरुषांमध्ये होणारी लागण कोणत्याही उपचारांशिवायही बरी होते. अमेरिकेतल्या २.२ टक्के मृत्यूमागे नेहमीचा म्हणजेच साधारण फ्लू कारणीभूत असतो, असे ही पाहणी म्हणते. संपूर्ण जगात दरवर्षी पाच लाख लोकांना साधारण फ्लूमुळे मृत्यू येतो, तर याच आकडेवारीचा आधार घेऊन ‘स्वाइन फ्लू’मुळे मरणाऱ्यांचे प्रमाण दरवर्षी १२०० च्या आसपास असेल, असा या ताज्या पाहणीचा अंदाज आहे. थोडक्यात ‘स्वाइन फ्लू’बद्दल घाबरून जायचे कारण नाही, असेच बहुतेक तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. पुण्यात सर्वाधिक रुग्ण का, तर पुणे शहरात गलिच्छपणा वाढला आहे म्हणून. दिल्लीच्या संसर्गजन्य रोगाविषयीच्या राष्ट्रीय पाहणी पथकानेच हा निष्कर्ष काढला आहे. पुणे हे सर्वात घाणेरडे शहर आहे, हे त्यांच्या तज्ज्ञांनीच स्पष्ट केले आहे. ज्यांनी पुणे शहराचा आजवर खेळखंडोबा केला, त्या सर्वानाच ही सणसणीत चपराक आहे. आपल्या आरोग्य मंत्रालयाने कदाचित त्यामुळेच असेल, ‘स्वाइन फ्लू’ने भारतातले मृत्यूचे प्रमाण अमेरिकेपेक्षा थोडे कमी जास्त असण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. अमेरिकेत ‘स्वाइन फ्लू’चे ४३६ बळी पडले, पण तिथे एकही शाळा बंद करण्यात आली नव्हती. अमेरिकेत गेल्या आठवडय़ात ‘स्वाइन फ्लू’चे ३० हजार संशयित रुग्ण होते. हा आकडा त्या मागल्या आठवडय़ापेक्षा खूपच बरा होता, कारण त्या आठवडय़ात एक लाख ३० हजार संशयित रुग्ण होते. याचाच अर्थ सात दिवसात एक लाखजण उपचार घेऊन घरी परतले, असा होतो. आपल्याकडे भीतीपोटी नव्हे, तर लवकरात लवकर ‘स्वाइन फ्लू’चा प्रसार रोखला जावा, म्हणून शाळा बंद करायचा आदेश पुण्यात देण्यात आला आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये हा नवा फ्लू फार झपाटय़ाने पसरतो, हे लक्षात घेऊन पुण्यात शाळा, महाविद्यालये आठवडाभर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काल आम्ही ‘स्वाइन फ्लू’ विषयी लिहिलेल्या अग्रलेखात या निर्णयाचे स्वागत केले आहे. केवळ भयगंड पसरावा म्हणून नव्हे, तर ‘स्वाइन फ्लू’ आटोक्यात यावा, या उद्देशाने घेतलेला हा निर्णय उपयुक्त ठरू शकतो. पुण्यात एक आठवडाभर शाळा, महाविद्यालये बंद ठेवली जात असतील, तर मुंबईतही तसा निर्णय घेतला जाणे अपरिहार्य आहे. मुंबईची व्याप्ती आणि गर्दीमुळे एकमेकांबरोबर निर्माण होणारी जवळीक लक्षात घेऊन मुंबईतही या निर्णयाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मुंबईत अजून तरी ‘स्वाइन फ्लू’ पुण्याएवढा फोफावला नाही, पण तो जलदगतीने पसरला तर काय होईल ते सांगता येणे अवघड आहे. पुण्याप्रमाणेच मुंबईतही ‘लालबागच्या राजा’पासून इतर अनेक ठिकाणी भाविक गर्दी करतात. यावर्षी अशा गर्दीच्या ठिकाणी जायचे स्त्री-पुरुष, लहान मुले, मुली यांनी टाळले तर हा प्रसार लवकर आटोक्यात आणता येईल. पुणे शहरात अतिशय प्रतिष्ठेच्या अशा मानल्या गेलेल्या हत्ती गणपतीच्या कार्यकर्त्यांनी यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने करायचे ठरवले आहे. ‘लोकसत्ता गणेशोत्सव मंचा’तले हे प्रमुख मंडळ आहे. पुण्याच्या अखिल मंडई मंडळाने तसेच दगडूशेठ हलवाई गणपतीच्या सुवर्णयुग तरुण मंडळाने यंदाची दहीहंडी रद्द केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुंबईत आपल्या दहीहंडीला आवरते घेतले आहे. हे निर्णय निश्चितच जनतेच्या हिताचे आहेत. पुण्या-मुंबईच्या मंडळांनी आपापल्या दहीहंडीला आणि गणेशोत्सवाच्या भव्यतेस आळा घातला तर समस्त नागरिकांच्या ते हिताचे ठरणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवले गेले तर ‘स्वाइन फ्लू’ आटोक्यात आणता येतो, हे ‘मेक्सिको मॉडेल’ ने दाखवून दिले आहे. मेक्सिकोत ‘स्वाइन फ्लू’चा प्रसार रोखण्यासाठी रस्त्यावर चिटपाखरू येणार नाही, हे पाहिले गेले आणि त्यानंतरच्या काही दिवसात या रोगाचा प्रसार थांबला. गणेशोत्सवाच्या दरम्यानच रमझानचे रोजे सुरू होतात. नमाज पढायच्या निमित्ताने आणि उपवास सोडायच्या निमित्ताने जी गर्दी होते, तिथेही ‘स्वाइन फ्लू’ पसरायचा धोका आहे. मुस्लिमांना त्यासंबंधात काही सूचना केल्या तर तो काही धर्मात केला जाणारा हस्तक्षेप नव्हे. मुस्लिम समाजाचेही त्यात सार्वजनिक हितच आहे. या अरिष्टात कुणीही मरता कामा नये, हा या सर्व धावपळीमागचा उद्देश आहे. ‘स्वाइन फ्लू’ हा कुणालाही होऊ शकतो आणि तो धर्म पाहून होत नाही. तेव्हा प्रत्येकानेच काळजी घेणे गरजेचे आहे. मुंबईत रोज उपनगरी गाडय़ांखाली किमान १०-१२ जण मरत असतात, पण म्हणून कुणी लोकलने प्रवास करायचे टाळत नाही. फार तर गाडीत चढणारा प्रत्येकजण ‘आलिया भोगासी’ म्हणून म्हणत असेल, यापलीकडे दुसरे कुणाच्या हातात काय आहे? पाच सहा दशकांपूर्वी युरोपातले तत्त्वज्ञ आणि साहित्यिक फ्लू, न्यूमोनिया सारख्या रोगानेच दगावले, म्हणून कुणी आपला लिहायचा वा जीवनाचे तत्त्वज्ञान सांगायचा बाणा सोडला नाही. ‘स्वाइन फ्लू’पेक्षा साधारण फ्लू हा जास्त घातक होता, हे आजवर स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ असा नव्हे की, ‘स्वाइन फ्लू’ कडे दुर्लक्ष व्हावे. त्याला धैर्याने तोंड द्यायला हवे. सरकार काय करते वा काय करत नाही, यापेक्षा आपण काय करतो, ते प्रत्येकाने पाहणे आवश्यक आहे. हा विषाणू समाजातून हद्दपार करायचा तेवढा एकच मार्ग आपल्या हातात आहे.