Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

लोकमानस

ऐक्य नको, पक्षीय पातळीवर जनहिताचे काम हवे

 

रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून पराभूत झाल्यापासून त्यांनी एकसारखा रिपाइंच्या ऐक्याचा घोष सुरू केला आहे.
घडलेल्या चुकांमधून माणसाला आत्मभान येते आणि ते आले नाही तर त्या माणसाजवळ विचार करण्याची वृत्ती नाही आणि विचारही नाही असे समजले जाते. पराभवातून का होईना रामदास आठवलेंना ते भान आले. तरीही आठवले पुन्हा जुनीच चूक करत आहेत. निवडणुकीतील पराभवाचे अवडंबर माजवून ते ऐक्याच्या नावावर आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पाण्यातल्या माशाला तहान लागणे हे जितके आश्चर्यकारक किंवा वेडेपणाचे आहे तितकेच आठवलेंनी ऐक्य ऐक्य करणे वेडेपणाचे आहे.
काँग्रेस हे जळते घर आहे, असे बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. पुढे असेही म्हटले होते की, त्या जळत्या घराला जो कोणी वाचवण्याचा प्रयत्न करील त्यालाही त्याची झळ लागल्याशिवाय राहणार नाही. शिर्डी मतदारसंघात आठवले यांना याचा प्रत्यय आला. गेली २० वर्षे रामदास आठवले यांनी काँग्रेसचे आश्रित राहून राजकारण केले. त्यांनी आपली पक्षसंघटना मजबूत करून पक्षाचे प्रतिनिधी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका इत्यादी संस्थांमधून निवडून आणण्यात कधीच स्वारस्य दाखवले नाही. त्यांचे राजकारण व्यक्तीभोवती फिरत राहिले त्यामुळे त्यांना चौकटीच्या बाहेरचे राजकारण करता आले नाही.
गेल्या दशकभराच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये दखल घ्यावी, असे राजकारण कुठल्याही रिपाइंच्या गटाने केलेले नाही. अपवाद प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप, बहुजन महासंघ. केरळचे राज्यपाल आणि स्वयंघोषित नेते रा. सू. गवई यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या खुराडय़ात राहून व्यक्तिगत पदे पदरात पाडून घेतली. रामदास आठवले यांची मजल स्वत:ची खासदारकी व एखादी आमदारकी या पलीकडे गेलेली नाही. प्रा. जोगेंद्र कवाडे हे तळ्यात मळ्यात अशी अस्थिर भूमिका घेत राहिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचा आधार घेतला तर नामदेव ढसाळ यांची पँथर फक्त वाढदिवस साजरे करण्यापुरती मर्यादित राहिली. राजकारणात मतदारसंघाला फारच महत्त्व आले आहे. सद्य:स्थितीत प्रकाश आंबेडकर यांचा अकोला मतदारसंघ वगळला तर कोणत्याही रिपाइं नेत्यांना स्वत:चा मतदारसंघ नाही. ज्यांना स्वत:चे मतदारसंघ नाहीत त्यांना राजकारणात काडीचीही किंमत नाही. अशा नेत्यांकडून रिपाइं ऐक्याला स्वाभिमानी राजकारणाची दिशा मिळेल, अशी आशा करणे चुकीचे ठरेल. ‘सत्ताधारी जमात व्हा’ याचा अर्थ रिपाइं नेतृत्वाने नीटपणे समजून घेतला पाहिजे. उपकाराची भीक म्हणून मिळालेले एखादे मंत्रिपद किंवा आमदारकी म्हणजे पूर्ण सत्ता नाही. राजकारणाबरोबर सामाजिक, आर्थिक, साहित्यिक, सांस्कृतिक व औद्योगिक इत्यादी क्षेत्रात महत्त्वाच्या पदावर तुमची माणसे असायला हवीत.आंबेडकरी जनतेने ऐक्याला पूर्णविराम देऊन रिपाइंतील जो पक्ष चांगले कार्यक्रम देईल त्या पक्षाला पाठिंबा द्यावा.
प्रदीप नाईक, मुंबई

उत्सवांचा उत्साह आवरा
सर्व जाती-धर्म-पंथांच्या लोकांना नम्र विनंती की स्वाइन फ्लूची साथ पसरू नये म्हणून येत्या काही महिन्यांत येत असलेले सर्व सण-उत्सव वैयक्तिक पातळीवर साजरे करावेत आणि सार्वजनिक स्वरूपाचे सण, उत्सव, सभा मेळावे यांना आवर घालावा. किंबहुना रद्दच करावेत.
काही दिवसांपुरते सिनेमागृहे, प्रार्थनास्थळे वा खाजगी क्लासेसनाही जाणे टाळावे. ही जरी संचारस्वातंत्र्यावर बंधने वाटली तरी सार्वजनिक आरोग्यास उद्भवलेला धोका त्यापेक्षा गंभीर आहे, हे कृपया लक्षात घ्यावे. अशी पावले उचलण्याकरिता सरकारी आदेश येईपर्यंत वाट पाहू नये.
हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य आहे, हे स्वाइन फ्लूच्या संदर्भात सर्वधर्मीयांना सिद्ध करता येईल.
वीणा गवाणकर, वसई

ग्रामीण भागात घरपट्टी कमी करावी
दारिद्रय़रेषेखालील बेघरांना पक्की घरे देण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्यच आहे. निवडणुका आल्या की सरकार तोंड भरून आश्वासने देते, परंतु त्या आश्वासनांची पूर्तता मात्र होत नाही. ‘खेडय़ांकडे चला’ अशी घोषणा सरकार करते. परंतु खेडय़ातील लोकांना वीज-पाणी यांसारख्या सुविधा मात्र पुरवीत नाही. ग्रामीण भागात घरपट्टी मोठय़ा प्रमाणात आकारली जाते. येथील जनतेचा सरकारने कधी विचारच केलेला नाही. शहरातील लोकांनी खेडय़ात घरे बांधली परंतु ती वर्षांनुवर्षे बंदच आहेत. खेडय़ात राहणाऱ्या काही लोकांना उत्पन्नाचे साधन नाही. तरी त्यांना भरमसाट घरपट्टी भरावी लागते. म्हणून बेघरांना पक्की घरे देण्याची घोषणा करताना त्यांना लागणाऱ्या सुविधा आणि घरपट्टी यांचा प्रथम विचार करावा.
विश्वनाथ विचारे, वांद्रे, मुंबई

‘अवघा रंग..’च्या कलाकारांचा अनुल्लेख का?
विनायक परब यांनी ‘अवघा रंग एकचि झाला’ या नाटकाच्या अमेरिकेतील प्रयोगाविषयी लिहिलेला वृत्तांत (२ ऑगस्ट) वाचला. आजच्या पिढीचे आणि जुन्या पिढीलाही जवळचे वाटावे, असे हे संगीत नाटक अमेरिकेमध्ये झेंडा फडकावून आल्याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन! मी कुटुंबीयांसमवेत हे नाटक पाच वेळा पाहिले! २०० व्या प्रयोगापुढे घोडदौड करत असलेले हे नाटक इतर अनेक रसिक मित्रमंडळींनी पाहावे म्हणून मी त्यांना सतत उद्युक्त करत आहे.
याचे कारण हे नाटक सर्वार्थाने समर्थपणे तोलून धरले आहे ते बुजुर्ग संगीत गायक नट प्रसाद सावकार, अमोल बावडेकर यांनी आणि संपूर्ण नाटकाचा केंद्रबिंदू आहे ती म्हणजे जेनीच्या भूमिकेतील कलावती- स्वरांगी मराठे! जणू जेनी या अमेरिकन मुलीची भूमिका तिच्याकरताच लिहिली असावी, असे वाटते. उत्कृष्ट अभिनय, नृत्य, बहारदार गायन आणि अत्यंत देखणे रूप (परदेशी ‘लुक्स’सह!) असल्याने स्वरांगीने या भूमिकेचे अक्षरश: सोने केले आहे. ‘कठीण कठीण, कठीण किती’ या नाटय़पदासाठी स्वर आणि तानबाजीमुळे ती हमखास ‘वन्स मोअर’ घेते. एवढे सर्व सांगण्याचे कारण असे की, स्वरांगी मराठेचा उल्लेखही लेखात केलेला नाही हे अनवधानाने(?) घडले असे आम्ही मानायचे का? याचबरोबर मीना नेरूरकरांच्या अत्यंत कच्च्या आणि सदोष नाटय़संहितेवर पुनल्रेखन करून अंतिम नाटय़रूप आणि नाटक घट्ट बांधण्याचे काम ज्यांनी परिश्रमपूर्वक केले ते ज्येष्ठ नाटय़कर्मी अशोक समेळ यांचा उल्लेखही नसावा, हेही अनवधानानेच? ‘पिल्लू उडोनिया’ ही उत्कृष्ट अभंगरचना करणारे प्रा. अशोक बागवे तसेच संगीताची मुख्य बाजू संभाळणारे कमलेश भडकमकर आणि मिथिलेश पाटणकर यांचाही नामोल्लेख नसावा हेही खटकते.
मिलिंद गोखले, गिरगाव, मुंबई

बातमीपत्रे पाहून आजारपण येईल!
स्वाइन फ्लूच्या साथीने देशात थैमान घातले असून लागण होण्याच्या भीतीने नागरिक घाबरून गेले आहेत. लोकांनी घाबरून जाऊ नये यासाठी सरकारने, प्रसारमाध्यमांनी, तसेच सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे जनजागृती मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. दूरचित्रवाणी चॅनेलवर साथीबाबत बातमीपत्र प्रसारित करताना एकच बातमी किती वेळा दाखवावी याबाबत र्निबध घातले गेले पाहिजेत; अन्यथा लोक बातमी पाहूनच आजारी पडतील! घटनेचा बाऊ करून लोकांमध्ये घबराट निर्माण करण्याचे काम या वाहिन्या करीत आहेत. लोकांनीही बातमीपत्रे एकसारखी बघत बसू नये. कारण तेच तेच पाहत राहिल्याने मानसिकता बदलून आपल्याला हा रोग झाला आहे, असे वाटण्यास सुरुवात होते.
संजय भवर, कोपरगाव