Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

साताऱ्यात स्वाइन फ्लूचे ८ संशयित रुग्ण दाखल
सातारा, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

साताऱ्यात आज नव्याने ८ संशयित रुग्ण दाखल झाले असून, येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील आपात्कालीन स्वाइन फ्लू नियंत्रण कक्षात तपासणीसाठी संशयित रुग्णांची आज दिवसभर झुंबड उडाली होती. २५१ लोकांनी तपासणी करून घेतली. जिल्हा रुग्णालयात आज दाखल झालेल्या आठ रुग्णांमध्ये पाचगणीचे २, मुंबईचे ३, पुणे येथील २ व कराड येथून आलेल्या १ संशयित रुग्णांचा समावेश होता.त्यापैकी पुणे येथील दोन रुग्ण परत गेले असून, सध्या जुने ५ व नवीन ५ असे एकूण १० रुग्णांवर पथकातील डॉक्टर्स उपचार करीत आहेत.

सोलापुरात स्वाइन फ्लूच आणखी दोन संशयित रुग्ण
सोलापूर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

सोलापूर महापालिकेच्या संसर्गजन्य रोग रुग्णालयात मंगळवारी स्वाइन फ्लूचे आणखी दोन संशयित रुग्ण दाखल झाले असून त्यामुळे आता अशा संशयित रुग्णांची संख्या पाच झाली आहे. तर शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकमेव रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असल्यामुळे त्यास येत्या एक-दोन दिवसात घरी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
काल सोमवारी पालिका संसर्गजन्य रोग रुग्णालयात स्वाइन फ्लूचे तीन संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी आणखी तीन रुग्णांना दाखल करण्यात आले.

आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ऋचा पुजारीला रौप्यपदक
कोल्हापूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या आशियाई बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या कु. ऋचा पुजारी हिने १६ वर्षाखालील मुलींच्या गटात रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत व्हिएतनाम हाँग थि नू वाय ने सुवर्णपदक तर उझबेकिस्तान सॅरव्हिनॉझने कांस्यपदक मिळविले. या स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या एकूण ९ फेऱ्यांमध्ये ऋचाने भूतानच्या सोनम चोडेम, तुर्कमेनिस्तानच्या विलेझा त्झईल, भारताच्या शाल्मली गागरे यांचा पराभव केला. तर कजागिस्तानच्या शोल्पन काईदरोवा, व्हिएतनामच्या ब्रोई किम फूंग, हाँग सिन्ह वाय, तसेच भारताच्या आर.भारती यांच्याबरोबरचे सामने बरोबरीत सोडवले.

स्वाइन फ्लूच्या भीतीने सांगली भागात घबराट
सांगली, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लूचा आजार राज्यात वाढत असतानाच सांगली जिल्ह्य़ात अनेक संशयितांनी खासगी व शासकीय रुग्णालयांत धाव घेतली असून, घबराट पसरली आहे. त्यातच मुंबई, पुण्यासह अन्य शहरांतून प्रचंड संख्येने नागरिक आपल्या मूळ गावाकडे हजारोंच्या संख्येने आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही नागरिकांची झोप उडाली आहे. दरम्यान, महापालिका व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाने यंत्रणा सज्ज ठेवली असून, अद्याप जिल्ह्य़ात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला आहे, तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करीत स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रबोधन सुरू केले आहे.

कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी नाक्यांवर पथके
कोल्हापूर, ११ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

राज्यात गंभीर वळणावर प्रवास करीत असलेल्या स्वाइन फ्लूचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्य़ातील शासकीय यंत्रणा स्वाइन फ्ल्यूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहे. या रोगाला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर शहरात पुण्या-मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारावरील जकात नाके, रेल्वे स्थानक व विमानतळावर खास पथके तैनात करण्यात आली असून या रोगाची लक्षणे असलेल्या नागरिकांनी स्वत:हून आपल्या आजाराची माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने येथे एका पत्रकार परिषदेत करण्यात आले.

अजस्त्र कंटेनर रुत्ल्याने वाहतूक विस्कळीत
शाहूवाडी, ११ ऑगस्ट / वार्ताहर

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील शाहूवाडी तालुक्यात जुळेवाडी खिंडीत १२२ चाके असणारा अजस्त्र कंटेनर वळणावर रुतल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सदरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बडोद्याहून विजेचे ट्रान्सफॉर्मर घेऊन रत्नागिरीस निघालेला कंटेनर (जी.जे. १८ ए.टी. ९०००) हा जुळेवाडी खिंडीत साईडपट्टय़ावर खचल्याने सोमवारी सायंकाळी सहा वाजता रुतून बसला. यामुळे पूर्ण महामार्ग बंद झाला आहे. शाहूवाडी पोलिसांनी कोल्हापूरहून येणाऱ्या वाहनांना बांबवडय़ातून सरूडमार्गे मलकापूर असा तर मलकापूरहून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक अमेणी घाटमार्गे कोकरूड अशी वळवली आहे. मार्ग माहिती नसणाऱ्या वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली आहे. आज रात्री उशिरापर्यंत कंटेनर काढण्याचे काम सुरू होते. पण त्यात यश आले नाही. दरम्यान पुण्याहून कंटेनर काढण्यासाठी यंत्रणा आणली आहे. पोलिसांची मोठी तारांबळ उडाली असून उद्या सकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. १५९ टनाचा हा कंटेनर असल्याचे कळते.

टोलनाक्याचे सर्वेक्षण करणाऱ्यंना सोलापुरात धमकावून मारहाण
सोलापूर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

टोलनाक्याचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या खासगी कंपनीच्या व्यवस्थापक व त्याच्या सहकाऱ्याला धमकावून मारहाण केल्याप्रकरणी उत्तर सोलापूर शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत वानकर व त्यांचा मुलगा गणेश वानकर यांच्या विरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादच्या जयलक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सोलापुरातील चार टोलनाक्यांचे सर्वेक्षण करण्याचा मक्त घेतला आहे. त्यानुसार कंपनीचे व्यवस्थापक नारायण गोविंद नंबिपार व त्यांचे सहकारी अधिकारी अंबाजी तांदळे हे देगाव टोळनाका येथे उभे राहून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची माहिती घेत होते. मात्र त्यावेळी या टोलनाक्याचा मक्ता घेतलेले वानकर पिता-पुत्र तसेच त्यांच्या साथीदारांनी नंबिपार व तांदळे यांच्या कामात अडथळा आणला. नंतर नंबिपार व तांदळे हे दोघे पोलिसांत तक्रार देण्यासाठी निघाले असता सिध्देश्वर मंदिराजवळ वानकर पिता-पुत्राने त्यांना अडविले आणि दमबाजी करीत बेदम मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

जकातप्रश्नी १४ ऑगस्टपासून व्यापार, वाहतूक बेमुदत बंद
कोल्हापूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

जकात रद्द करण्याबद्दलचा निर्णय शासनाने घेतला नाही तर, १४ ऑगस्टच्या रात्रीपासून व्यापार, उद्योग आणि वाहतूक बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय आज येथे झालेल्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आनंद माने हे होते.
जकात रद्द करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर व्यापारी व वाहतूकदार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत चर्चा झाली. जकात रद्द करावी यासाठी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाला सात दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत जकात रद्द करण्याचा निर्णय झाला नाही तर जकातविरोधी आंदोलन तीव्र केले जाणार आहे. दिनांक १३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे आणि दिनांक १४ ऑगस्टच्या रात्रीपासून व्यापार, उद्योग व वाहतूक बेमुदत बंद ठेवण्याचे आंदोलन सुरू केले जाणार आहे. चेंबर ऑफ कॉमर्सच्या आज झालेल्या बैठकीला संलग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरेश जैन, ललित गांधी, दिलीप बगाडे, सुरेश इंग्रोळे, प्रदीपभाई कापडिया, सुरेश गायकवाड, भाऊ घोगळे, वैभव सावर्डेकर, सनद कोरडे, राहुल नष्टे, डॉ.पी.आर.पाटील, आशिष अहुजा, बी.ए.शेख वगैरे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

‘एसबीएन’च्या वतीने भ्रष्टाचारावर परिसंवाद
सातारा, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

येथील एसबीएन चॅनेलच्या ‘भूमिशिल्प’ मालिकेच्या १०५ व्या भागानिमित्त ‘भ्रष्टाचार’ या विषयावर येत्या गुरुवारी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या नवीन सभागृहात परिसंवाद होणार आहे, अशी माहिती एस.बी.एन. चे संचालक तुषार भद्रे यांनी दिली. या परिसंवादात भूमिशिल्पचे सादरकर्ते ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. धैर्यशील पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, माहिती अधिकारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी राऊत यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. नागरिकांनाही आपले विचार या परिसंवादात सहभागी होऊन मांडता येणार आहेत. सु-स्वराज्य फाऊंडेशनच्या सहकार्याने होणाऱ्या या परिसंवादात लेखी अथवा दूरध्वनी करूनही प्रश्न पाठविता येतील. त्याचाही समावेश केला जाईल. संपर्कासाठी दूरध्वनी क्र. २२९१९१ (मोबाईल ९८२२२७६०७३) संचालक, एसबीएन चॅनेल १६ रामकृष्ण कॉलनी, पोवई नाका, सातारा. या परिसंवादाचे चित्रीकरण करण्यात येणार असून स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट रोजी) त्याचे प्रक्षेपण केले जाणार असल्याचे तुषार भद्रे यांनी सांगितले.

मिरजेत ‘भाजप’चे आंदोलन
मिरज, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

काँग्रेस आघाडी शासनाला ‘चले जाव’ म्हणत रविवारी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेल भरो आंदोलन केले. मिरज शहरातील मुख्य मार्गावरून काढलेल्या मोर्चानंतर ६४ आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून जेलभरोची औपचारिकता पूर्ण केली. काँग्रेस आघाडी शासनाचा निष्क्रिय कारभार व महागाईविरोधात जनक्षोभ प्रदर्शित करण्यासाठी भाजपने जेलभरो आंदोलन जाहीर केले होते. सकाळी मंगळवार पेठेतील शिवाजी पुतळ्यापासून भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस आघाडी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत मोर्चा काढला. हा मोर्चा राणाप्रताप चौकात आल्यानंतर पोलिसांनी अडविला. कार्यकर्त्यांनी कायदेभंग करीत स्वतला अटक करवून घेतली. आंदोलनाचे नेतृत्व आमदार सुरेश खाडे, ज्येष्ठ नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर, नगरसेवक मकरंद देशपांडे व शहर अध्यक्ष ओंकार शुक्ल आदींनी केले.

गुड मॉर्निग पथकाला वकिलाकडून शिवीगाळ
आटपाडी, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

उघडय़ावर शौचास जाण्यास प्रतिबंध केल्याने संतापलेल्या आटपाडी तालुक्यातील राजेवाडी येथील एका वकिलाने ग्रामसेवक व पंचायत समिती प्रशासनाला शिवीगाळ करून दमदाटी केली. या कृत्याच्या निषेधार्थ तालुका ग्रामसेवक संघटनेने संबंधित वकिलाने माफी मागेपर्यंत कामकाज बंद आंदोलन सुरू केले आहे. राजेवाडी येथील अ‍ॅड. सचिन सातपुते या वकिलांना गुड मॉर्निंग पथकाने भल्या पहाटे अटकाव केला. विस्तार अधिकारी के. आर. पाटील, ग्रामसेवक ए. पी. मोरे व पथकाच्या अन्य सदस्यांनी त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. पण या वकील महाशयांनी या पथकातील सदस्यांनाच शिवीगाळ केली. राज्य शासनाच्या गुड मॉर्निंग पथकाची वाहनेही फोडण्याची धमकी दिली. या घटनेनंतर ग्रामसेवकांनी राजेवाडी येथील या वकिलांनी माफी मागेपर्यंत गावातील ग्रामसेवकांचे काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष बी. ए. चव्हाण यांनी या प्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या वकिलाच्या या वर्तनाबद्दल तालुका वकील संघटनेला एका पत्राद्वारेही सूचित केले आहे. त्यामुळे एका वकिलाच्या चुकीमुळे ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे.

ग्रंथालय सेवकांचे धरणे आंदोलन कोल्हापूर,
११ ऑगस्ट / प्रतिनिधी

सार्वजनिक ग्रंथालय सेवकांची वेतनश्रेणी, सेवाशर्ती निश्चित कराव्यात, वाचनालयांना भरघोस अनुदान वाढवून मिळावे या मागणीसाठी आज कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तानाजी मगदूम, एच.पी.पाटील, बाबासाहेब कावळे, दत्ता देशपांडे, बाबासाहेब पाटील, विजय नलवडे, सर्जेराव पाटील, उत्तम नलवडे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. सार्वजनिक वाचनालयात काम करणाऱ्या सेवकांची वेतनश्रेणी व सेवाशर्तीची मागणी पुढे आल्यानंतर शासनाने वेळोवेळी समित्या नेमल्या. या समित्यांचे अहवालही शासनाकडे सादर झाले. पण निर्णय कोणताच घेतला गेला नाही. ग्रंथालय कायदा होवून ४० वर्षे झाली. पण ग्रंथालय सेवक वेतनश्रेणी आणि सेवाशर्तीपासून वंचित आहेत. ग्रंथालय सेवकांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात आणि न्याय द्यावा अशी विनंती ग्रंथालय संघाच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.

बार असोसिएशनचा ग्रंथालयासाठी निधी
कोल्हापूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

जुन्या महत्त्वपूर्ण न्यायनिवाडय़ाचे संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. पक्षकारांना न्याय देण्यासाठी या ग्रंथालयाबरोबरच अद्ययावत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करावा असे आवाहन बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य अँड राजेंद्र रघुवंशी यांनी आज येथे बोलताना केले. आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या ग्रंथालय नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून नूतनीकरण करण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच नूतन न्यायाधीशांचा सत्कार या संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. वकिलांनी महिन्यातून किमान तीन ते चार दिवस वेळात वेळ काढून गरजू आणि गरीब लोकांसाठी मोफत सल्ला द्यावा, असे आवाहन आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी या वेळी बोलताना केले. वकिली व्यवसायातील अडचणी व असुरक्षिततेबद्दल अ‍ॅडव्होकेट वेलफेअर फंडमधील दुरुस्ती लवकरात लवकर मंजूर करून घ्यावी असे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे यांनी सांगितले. अ‍ॅड.प्रशांत देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे यांनी प्रश्नस्ताविक केले. उपाध्यक्ष अ‍ॅड. विजय चव्हाण यांनी आभार मानले.