Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सोलापुरात स्वाइन फ्लूच आणखी दोन संशयित रुग्ण
सोलापूर, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

सोलापूर महापालिकेच्या संसर्गजन्य रोग रुग्णालयात मंगळवारी स्वाइन फ्लूचे आणखी दोन संशयित

 

रुग्ण दाखल झाले असून त्यामुळे आता अशा संशयित रुग्णांची संख्या पाच झाली आहे. तर शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एकमेव रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असल्यामुळे त्यास येत्या एक-दोन दिवसात घरी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
काल सोमवारी पालिका संसर्गजन्य रोग रुग्णालयात स्वाइन फ्लूचे तीन संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी आणखी तीन रुग्णांना दाखल करण्यात आले. विलास रामा सरगर (वय ४९, रा. कुमठे, सोलापूर) व कु. सोनिया थॉमस दास (१२, रा. फॉरेस्ट, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या घशातील लाळेचे व रक्ताचे नमुने घेऊन पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेत पाठविण्यात आल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत या संसर्गजन्य रोग रुग्णालयात चारपेक्षा अधिक रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून यात सर्दी, पडसे, खोकला असलेल्या परंतु स्वाइन फ्लूची भीती बाळगलेल्या रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून त्यांना त्याप्रमाणे औषधे देऊन घरी पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तथापि, २४ तास चालू असलेल्या या रुग्णालयात एका पाळीत दोन वैद्यकीय अधिकारी, दोन परिचारिका, दोन लिपिक, औषध निर्माता व रासायनिक तपासणी करणारा कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रदीप सवळे यांनी काल सोमवारी पत्रकार परिषदेत दिली होती. परंतु प्रत्यक्षात या रुग्णालयात फक्त एकच वैद्यकीय अधिकारी व एकच परिचारिका कार्यरत असल्याचे आढळून आले. तसेच तेथे स्वाइन
फ्लूविरोधी टॅमी फ्ल्यूच्या गोळ्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर पालिकेच्या अन्य १७ दवाखान्यांमध्ये स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जाणार असल्याचे जाहीर करूनही प्रत्यक्षात तेथे यंत्रणाच कार्यान्वित झाली नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व रुग्णांना संसर्गजन्य रोग रुग्णालयाकडेच धाव घ्यावी लागत आहे. तेथे रुग्णांची गर्दी वाढत असल्यामुळे गोंधळ होत असल्याचे चित्र दिसून येते.
दरम्यान, सकाळी सोलापूरचे पालकमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात स्वाइन फ्लूच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रणेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक धाकतोडे, पालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. प्रदीप सवळे आदींनी यंत्रणेची माहिती दिली.