Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ऋचा पुजारीला रौप्यपदक
कोल्हापूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या आशियाई बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या कु. ऋचा पुजारी हिने १६ वर्षाखालील मुलींच्या गटात रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत व्हिएतनाम हाँग थि नू

 

वाय ने सुवर्णपदक तर उझबेकिस्तान सॅरव्हिनॉझने कांस्यपदक मिळविले.
या स्पर्धेत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या एकूण ९ फेऱ्यांमध्ये ऋचाने भूतानच्या सोनम चोडेम, तुर्कमेनिस्तानच्या विलेझा त्झईल, भारताच्या शाल्मली गागरे यांचा पराभव केला. तर कजागिस्तानच्या शोल्पन काईदरोवा, व्हिएतनामच्या ब्रोई किम फूंग, हाँग सिन्ह वाय, तसेच भारताच्या आर.भारती यांच्याबरोबरचे सामने बरोबरीत सोडवले. तर अंतिम नवव्या डावामध्ये ऋचाने प्रथम मानांकित व्हिएतनामच्या नँगेन थाईमाई हँग हिच्यावर थरारक विजय मिळवला व सहा गुणांसह स्पर्धेतील रौप्यपदक पटकाविले.
दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट या दरम्यान झालेल्या या स्पर्धेमध्ये व्हिएतनाम, कझाकिस्तान, इराण, मंगोलिया, भूतान, उझबेकिस्तान, श्रीलंका, तुर्कमेनिस्तान व यजमान भारत या देशातील निवडक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत ऋचाला नववे मानांकन मिळाले होते. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेतून ऋचाची या आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली होती. या स्पर्धेमध्ये पटकावलेल्या या रौप्यपदकामुळे ऋचाची २०१० साली होणाऱ्या आशियाई आणि जागतिक बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.