Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

स्वाइन फ्लूच्या भीतीने सांगली भागात घबराट
सांगली, ११ ऑगस्ट/प्रतिनिधी

स्वाइन फ्लूचा आजार राज्यात वाढत असतानाच सांगली जिल्ह्य़ात अनेक संशयितांनी खासगी व

 

शासकीय रुग्णालयांत धाव घेतली असून, घबराट पसरली आहे. त्यातच मुंबई, पुण्यासह अन्य शहरांतून प्रचंड संख्येने नागरिक आपल्या मूळ गावाकडे हजारोंच्या संख्येने आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही नागरिकांची झोप उडाली आहे. दरम्यान, महापालिका व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाने यंत्रणा सज्ज ठेवली असून, अद्याप जिल्ह्य़ात स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण नसल्याचा दावा केला आहे, तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करीत स्वाइन फ्लूपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत प्रबोधन सुरू केले आहे.
पुणे येथे शाळा, महाविद्यालये, तसेच अनेक सार्वजनिक संस्थांना सुट्टय़ा देण्यात आल्यामुळे हजारो नागरिकांनी आपल्या मूळ गावाकडे धाव घेतली आहे. गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागात बाहेरून आलेल्या नागरिकांकडे लक्ष देण्यात येत आहे, तर अनेक नागरिक संशय आल्यानेही रुग्णालयांमध्ये दाखल होत आहेत. दरम्यान, जिल्ह्य़ातील आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे पुण्याहून आलेल्या तीन मुलींना स्वाइन फ्लू असल्याच्या संशयावरून त्यांना जिल्हा ग्रामीण रुग्णालयाकडे पाठविले असल्याचे आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक मारुती शिंदे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, टॅमीफ्लू या औषधाचा पुरेसा साठा आणि इतर आरोग्य सुविधा संबंधितांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मदतीसाठी ०२३३- २३७४६५१ ते ५५ व डॉ. आनंदा मोरे - ९८९०१६५०९० महापालिका : ९८२२१८५९२१, डॉ.राम हंकारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.