Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी नाक्यांवर पथके
कोल्हापूर, ११ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

राज्यात गंभीर वळणावर प्रवास करीत असलेल्या स्वाइन फ्लूचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर जिल्ह्य़ातील शासकीय यंत्रणा स्वाइन फ्ल्यूचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहे. या रोगाला

 

लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर शहरात पुण्या-मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारावरील जकात नाके, रेल्वे स्थानक व विमानतळावर खास पथके तैनात करण्यात आली असून या रोगाची लक्षणे असलेल्या नागरिकांनी स्वत:हून आपल्या आजाराची माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने येथे एका पत्रकार परिषदेत करण्यात आले.
स्वाइन फ्लूच्या उपाययोजना, नागरिकांनी घ्यावयाची काळजी आणि लक्षणे यांची माहिती देण्यासाठी महानगरपालिकेत एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर उदय साळोखे, जिल्हा पोलिस प्रमुख यशस्वी यादव, पक्षप्रतोद अजित राऊत, विरोधी पक्षनेते मधुकर रामाणे, आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर देशमुख यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी हे आवाहन केले. स्वाइन फ्लूचा मुकाबला करण्यासाठी कोल्हापुरात आयसोलेशन रुग्णालयात ३५ खाटांचा एक स्वतंत्र कक्ष तैनात करण्यात आला असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात २५ रुग्णांच्या उपचाराची सोय करण्यात आली आहे. आवश्यकता वाटल्यास स्थानिक वैद्यकीय व्यावसायिकांशी चर्चा करून उपचाराच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यात येईल असे स्पष्ट करताना आयुक्त सिंघल यांनी स्वाइन फ्लूमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असे स्पष्ट केले. हा रोग आटोक्यात आणण्यासाठी जनजागृती आणि रोगाची लक्षणे असलेल्या रुग्णांनी स्वत:हून माहिती देणे या दोन प्रमुख बाबी अवलंबून असून या गोष्टी कटाक्षाने पाळल्या गेल्या, तर हे आव्हान कठीण नाही असे ते म्हणाले.
दरम्यान कोल्हापुरात सोमवारी सायंकाळी स्वाइन फ्लूचे दोन संशयित रुग्ण आयसोलेशन रुग्णालयात दाखल झाले होते. मयंता संजय पाटील (वय १६) व प्रीती विनोद चंदवाणी (वय ३५) हे दोन रुग्ण स्थानिक रुग्णालयात उपचार घेत होते. तथापि तेथील रुग्णालयाच्या व्यवस्थापनांनी या रुग्णांची एकूण लक्षणे पाहून त्यांना आयसोलेशन रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. यानुसार हे रुग्ण रुग्णालयात दाखल झालेही. परंतु रात्री हे दोन्ही रुग्ण कक्षातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोणतीही कल्पना न देता आपल्या घरी निघून गेल्याने रुग्णालयीन व्यवस्थेची मोठी तारांबळ उडाली होती. या दोन्ही रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला असल्याची शक्यता असल्यामुळे संबंधित रुग्णांनी तत्काळ पुन्हा कक्षात दाखल व्हावे असे त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले. तथापि रुग्ण दाखल होण्यास तयार नसल्याने मध्यरात्रीपर्यंत हा घोळ कायम होता. अखेर जिल्हा प्रशासनाच्या वतीने संबंधित रुग्णांना तातडीने नोटीस बजावण्यात आली. यानंतर हे दोन रुग्ण दाखल झाले. त्यांच्या रक्ताचे व घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले असून ते राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
पत्रकार परिषदेत महापालिका आयुक्त विजय िंस्ांघल यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांना पुणे वा मुंबईकडील कार्यक्रम शक्यतो लांबणीवर टाकण्याची तसेच पुण्यामध्ये नोकरी वा शिक्षणाच्या निमित्ताने असलेले नागरिक कोल्हापुरात परतले तर त्यांची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले.
हा रोग हवेतून पसरत असल्याने संबंधित रुग्णांनी लक्षणे दिसू लागताच तातडीने कक्षामध्ये दाखल झाल्यास त्याच्यावर उपचार सहज शक्य आहे असे सांगून ते म्हणाले, सध्या सणांचा हंगाम सुरू झाला आहे. गोकुळअष्टमी पाठोपाठ येणारा गणेशोत्सव या गर्दीशी संबंधित सणांच्या काळातच हे आव्हान उभे राहिले आहे. शक्यतो नागरिक गर्दीपासून दूर राहिले तर रोगाचा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकेल.