Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

साऊंड, मंडप मालकांचे ‘काम बंद’; उत्सव होणार सुनेसुने
इचलकरंजी, ११ ऑगस्ट / वार्ताहर

गणेशोत्सवास पंधरवडय़ाचा अवधी उरला असला, तरी त्यातील डॉल्बीचा वादाचा दणदणाट आतापासून सुरू झाला असून दहीहंडी व स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आवाज, मंडप व

 

दीपमाळांअभावी होणार आहे. शहर व परिसरातील साऊंड, मंडप, जनरेटर व लाईट संघटनेच्या वतीने उत्सव काळात काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या परिणामाचे सावट पडू लागले आहे. संघटनेकडून साहित्याचा पुरवठा न झाल्याने मोठय़ा मंडळाच्या मंडपाचे खांबही उभारले गेले नाहीत.
जिल्हा प्रशासनाने यंदा डॉल्बीवरचे र्निबध कडक केले आहेत. परिणामी मर्यादित आवाजातील डॉल्बीला अनुमती देणाऱ्या स्थानिक पोलिसांनी वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य मानत डॉल्बीचालकांना गणेशोत्सवात डॉल्बी लावल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल अशा नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांच्या या निर्णयानंतर गेल्या आठवडय़ात शहर व परिसरातील साऊंड, मंडप, जनरेटर व लाईट संघटनेची बैठक झाली. डॉल्बीला परवानगी नाकारल्याने संघटनेने उत्सवकाळात कोणतेही मंडळ, संस्था, संघटनेला मंडप, साऊंड, जनरेटर, लाईट आदी कसलेही साहित्य न पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे निवेदन पोलिस, प्रशासन व राजकीय प्रमुखांना देण्यात आले. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी संघटनेने काम बंद आंदोलन चालू ठेवले आहे. त्याचा पहिला फटका दहीहंडी व स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास बसला आहे.
स्वातंत्र्यदिनी शहरात रस्तोरस्ती जिलेबी व मिठाईचे स्टॉल उभारले जातात. अनेक ठिकाणी दहिहंडी उत्साहाने साजरी केली जाते. तथापि मंडप व अन्य साहित्याच्या संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केल्याने दहीहंडी व स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम साजरे करणाऱ्या संयोजकांची चांगलीच गोची झाली आहे. गांधी कँप, सरस्वती मंडळ, शाहू कॉर्नर आदी मोठय़ा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाचे काम रक्षाबंधनावेळीच पूर्ण झालेले असते. तथापि त्यांनाही साहित्याअभावी उत्सवाची तयारी करण्यावाचून थांबावे लागले आहे. या प्रकरणी कोणता निर्णय होतो यावर शहरातील पाचशेवर गणेशोत्सव मंडळांची तयारी अवलंबून आहे.