Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका कर्मचारी संप तीव्र; पाणीपुरवठाही बंद
पंढरपूर, ११ ऑगस्ट,वार्ताहर

राज्यातील २२७ नगरपरिषदांचे कर्मचारी बेमुदत संपावर गेले असून संपात सहभागी झालेल्या पंढरपूर नगरपरिषदेचा संपाचा ९ वा दिवस असून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार न केल्याने पंढरपूर न.पा.चे पाणीपुरवठा, रोड लाईट कर्मचारी संपात उतरल्याने मंगळवारचा पाणीपुरवठा झाला

 

नाही. सकाळी पाणी न आल्याने नागरिकांची अन भाविकांची मोठी तारांबळ उडाली.
नागरिकांना व आलेल्या भाविकांना पाण्याची सोय व्हावी याकरिता नगराध्यक्ष सतीश मुळे व सहकारी नगरसेवक घेऊन सुधाकर परिचारक दूध वाहतूक संघाच्या दुधाचे टँकरमधून शहराचे विविध भागात विशेषत: पश्चिमद्वार, देऊळ परिसर, गांधी रोड, जुनी व नवी पेठ या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
दरम्यान राज्यातील न.पा. कर्मचाऱ्यांचा संप तातडीने लक्ष घालून मिटवावा यासाठी आमदार सुधाकर परिचारक मुंबईस गेले असून त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे, तर चर्चेसाठी पंढरपुरातून न. पा. समन्वय समिती जनरल सेक्रेटरी सुनील वाळुजकर, कामगार अध्यक्ष महादेव अदापुरे हे मुंबईस गेले आहेत.
सोमवारी मध्यरात्रीपासून पाणीपुरवठा कर्मचारी, रोड लाईट कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. संपात सर्व ३५० कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी संपावर गेल्याने पंढरीच्या नागरिकांची अन आलेल्या भाविकांची अवस्था बिकट झाली आहे.
कर्मचारी संपावर गेल्याने शहर कचरामय झाले आहेच अशातच शहरात स्वाइन फ्लूचे संशयीत रुग्ण आढळले अशी जोरदार अफवा सोमवारी रात्री पसरल्याने नागरिकातून चिंता व्यक्त होत होती. काहींनी कुटीर रुग्णालयाचे अधिकारी वायदंडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल जोशी, डॉ. संग्रामसिंह गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरात तसा प्रकार नाही लोकांनी घाबरून जाऊ नये असे सांगितले.
शहरात मास्कसाठी लोकांनी मेडिकल दुकानातून गर्दी केली असून शहरात मास्कचा तुटवडा जाणवत आहे. तर काहींनी याचा फायदा उठवत एक मास्क दीडपट किमतीला विकले, अशी चर्चा चालू आहे. पंढरीत स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळले, ते सोलापूरला रवाना केले अशी चर्चा मंगळवारी शहरात पसरल्याने काहींनी सकाळचे शाळेचे वर्ग सोडून दिले.
इचलकरंजीत मोर्चा्र
इचलकरंजी- सहाव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज आपले आंदोलन अधिक तीव्र केले. आयजीएम रुग्णालय, पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनीही यामध्ये सहभाग घेतला. यामुळे सुमारे एक हजार रुग्णांना उपचाराविना परतावे लागले, तर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागली. कर्मचाऱ्यांनी शहरातून मोर्चाही काढला.
सहावा वेतन आयोग मिळावा, यासाठी गेले दहा दिवस नगरपालिकेच्या सर्व विभागांतील कर्मचारी संपावर आहेत. आज संघटनेच्या आदेशानंतर आरोग्य व पाणीपुरवठा या अत्यावश्यक विभागांतील कर्मचाऱ्यांनीही आंदोलनामध्ये सहभाग घेतला. रात्री बारापासून पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे शहरातील कोणत्याही भागाला आज पाणीपुरवठा होऊ शकला नाही. या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागली.
आयजीएम रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्यासह तीनशे कर्मचाऱ्यांनी आज आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे आयजीएम सकाळी सात वाजल्यापासून बंद राहिले. अंतर व बाह्य़ रुग्ण विभागामध्ये दररोज सुमारे एक हजार रुग्ण उपचार घेतात. मात्र आज या रुग्णांना उपचाराविना परत जावे लागले, तसेच दाखल असलेल्या अनेक रुग्णांना परत पाठविण्यात आले. त्यामुळे आयजीएमचा परिसर आज मोकळामोकळा दिसला. अनेक वॉर्डामध्ये बेड रिकामे असल्याने शुकशुकाट होता. ज्या रुग्णांना इतरत्र दवाखान्यात हलविणे अशक्य होते त्यांच्यासाठी प्रत्येक विभागात एक वैद्यकीय अधिकारी ठेवण्यात आला होता. डिस्चार्ज देताना बिल अदा करण्यासाठी कर्मचारी नव्हता. आयजीएमचे प्रशासकीय अधिकारी शॉम्युअल डिसोझा यांनी एका कर्मचाऱ्याकडून हे काम करून घेतले व स्वत: बिले करण्यासाठी मदत केली.
दुपारी बाराच्या सुमारास मुख्याधिकारी त्रिंबक डेंगळे पाटील, नगराध्यक्ष विजयसिंह देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.होसकल्ले, पोलीस निरीक्षक फुलचंद चव्हाण, नगरसेविका किशोरी आवाडे यांनी आयजीएमला भेट दिली व रुग्णांची विचारपूस केली. ज्यांना परत पाठविता येत नाही व ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे, अशा रुग्णांना परत पाठवू नये, असा आदेश दिला.