Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

जलवाहिनी फुटल्याने उपनगरांना पाणी नाही
कोल्हापूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ या िरगरोडवरील एक मोठय़ा व्यासाची जलवाहिनी सोमवारी फुटल्यामुळे कोटय़ावधी लीटर पाणी वाहून गेले. परिणामी पाणीपुरवठा करणारे मोठे जलकुंभ

 

भरलेच नाहीत. त्यामुळे शहराला लागून असलेल्या बहुतांश उपनगरांना आज पाणीपुरवठाच झाला नाही. गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून संतप्त झालेल्या उपनगरातील रहिवाशांनी आज ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. जलवाहिनीची दुरुस्ती झाल्यानंतर सायंकाळी उपनगरांना पाणीपुरवठा करण्यात आला.
रिंगरोडवर रस्ते विकास महामंडळाचे काम सुरू आहे. पोकलॅन यंत्राच्या साहाय्याने रस्त्याची खुदाई सुरू असताना पोकलॅनचे भले मोठे दात्रे मुख्य जलवाहिनीला लागल्यामुळे जलवाहिनीच फुटली. करोडो लीटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. साळोखे नगर, कळंबा, राजारामपुरी आदी परिसरातील त्या त्या भागाला पाणीपुरवठा करणारे जलकुंभ पाण्याविना रिकामे राहिले. त्यामुळे आज बहुतांश उपनगरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. मोठी मुख्य जलवाहिनी फुटल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने सोमवारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करून ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर आज सायंकाळी उपनगरांना कमी दाबाने का होईना पण पाण्याचा पुरवठा झाला.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. जलवाहिनी फुटली या एकमेव कारणामुळे पाणीपुरवठय़ाचा खेळखंडोबा सुरू आहे. काही उपनगरांना गेल्या तीनचार दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे पाणी विकणाऱ्यांनी आज चांगला धंदा केला. विशेष म्हणजे िरगरोडवरील झोपडपट्टीनजीकच्या एका ओढय़ातील पाणी खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्यांनी उचलले आणि ते विकले. याच िरगरोडवर गेल्या वर्षभरापासून एक जलवाहिनीला गळती लागली आहे. पण आजतागायत ही गळती शोधून काढता आलेली नाही. रस्त्यावरून वाहणारे पाणी खासगी टँकरमध्ये सर्रास भरले जाते आणि ते विकले जाते.
संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर एकूण पाच ठिकाणी व्हॉल्व आहेत. त्यापैकी चार व्हॉल्व गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त आहेत. करोडो रुपयांची विकासकामे करणाऱ्या महापालिका प्रशासनाकडून हे व्हॉल्व बदलण्यासाठी २५ लाख रुपये मिळत नाहीत याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. पाणीपुरवठा योजनेची जी कामे चालू आहेत त्यातूनच हे व्हॉल्व बदलावेत अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
उपनगरांना पाणीपुरवठाच झाला नाही. त्यामुळे बादलीभर पाण्यासाठी महिलांना धावाधाव करावी लागली. पाणीपुरवठय़ात गेल्या वर्षभरापासून विस्कळीतपणा आला आहे. पण प्रशासनाने तिकडे दुर्लक्ष केल्याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त केला जातो आहे.