Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

‘बालगृहातील कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोग लागू करण्याचा प्रयत्न’
कोल्हापूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

निराधार व उपेक्षित बालकांचे भवितव्य घडविण्यासाठी झटणाऱ्या बालगृहांना आवश्यक निधी

 

देण्याबरोबरच अशा संस्थांतील कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोगाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे महिला व बालविकास मंत्री मदन पाटील यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटनेकडून चालविल्या जाणाऱ्या बालसंकुल संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी मदन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिवराव मंडलिक होते. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, माजी महापौर शिवाजीराव कदम, भिकशेठ पाटील, व्ही.बी.पाटील, एच.डी.पाटील, सुरेश शिपूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महिला व बालविकास धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे नमूद करून मदन पाटील म्हणाले की, राज्यात आज सुमारे ७ लाख मुले निराधार असून शासनाने सामाजिक बांधीलकी जोपासत अशा मुलांची जबाबदारी घेतली आहे. सुमारे ४५ हजार निराश्रीत मुलांची शासकीय बालकाश्रमात व्यवस्था केली असून नव्या बालकाश्रमातील प्रत्येक मुलापाठीमागे शासन ९५० रुपयांचे अनुदान दरमहा देत आहे.
स्त्री-भृणहत्या हे आजचे मोठे सामाजिक आव्हान असून स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी राज्यव्यापी कार्यक्रम व जनजागृती अभियानाचे आयोजन केले आहे असे सांगून श्री.पाटील म्हणाले, स्त्रीभृण हत्या रोखण्यासाठी बालहक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. अध्यक्षीय भाषणात खासदार मंडलिक म्हणाले, उपेक्षित स्त्रिया, निराधार बालकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी समाजातील सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून समर्पण भावनेने मदत करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असल्याचे सांगून श्री.मंडलिक म्हणाले, समाजाचा समतोल विकास साधण्यासाठी स्त्रियांना सर्व क्षेत्रात समान संधी देणे आवश्यक आहे. बालसंकुलातील विविध विकास कामांसाठी खासदार फंडातून ५ लाख रुपये देणार असल्याचेही श्री.मंडलिक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महिला व बालविकास मंत्री मदन पाटील यांच्या हस्ते बालसंकुल संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा, बालसंकुलातील माहेरवाशीण दांपत्यांचा तसेच दत्तक पालकांचाही सत्कार करण्यात आला. शिशुगृह व वात्सल्य बालसदनमधील कर्मचाऱ्यांचा खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रश्नरंभी संस्थेचे मानद कार्यवाह प्रश्न.सुरेश शिरोडकर यांनी स्वागत व प्रश्नस्ताविक केले. संस्थेचे मानद सहकार्यवाह भिकशेठ पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास प्रश्न.अनुराधा गुरव, श्रीमती शकुंतला पाटील, व्यंकाप्पा भोसले, बालकल्याण संकुलातील विद्यार्थी व कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.