Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

जतमधून विधानसभेसाठी लढण्याची तयारी- शेंडगे
जत, ११ ऑगस्ट/ वार्ताहर

आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीच्या नेत्यांनी आदेश दिल्यास जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत, असे प्रतिपादन

 

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रकाश शेंडगे यांनी केले.
जत येथे आयोजित भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रकाश शेंडगे बोलत होते. दुष्काळात कायम पिचत पडलेल्या जत तालुक्यातील जनतेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कायम झुलवत ठेवले आहे. या तालुक्यात पाणी, वीज व रस्ते यांची मोठी समस्या आहे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी येथील जनता मोठय़ा प्रमाणात स्थलांतरित होत आहे. आपण या तालुक्यातील नसलो तरीही आपले आजोळ या तालुक्यातील कंठी हे आहे. शिवाय आपण या तालुक्यातील दहा हजारांहून अधिकजणांना मुंबईतील गोदीत रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या तालुक्याच्या विकासाची आपल्याला चांगलीच जाण आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीच्या नेत्यांनी आदेश दिल्यास जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आपण तयार आहोत, असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख यांच्यासह भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ. पद्माकर कुलकर्णी व मुकुंद बंडगर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत जत मतदारसंघातून आमदार प्रकाश शेंडगे यांनाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली.
या बैठकीस भाजप-शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.