Leading International Marathi News Daily

बुधवार, १२ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कोळी समाजाच्या प्रश्नाबाबत शरद पवार यांची अनुकूलता
सोलापूर, ११ ऑगस्ट / प्रतिनिधी

महादेव कोळी समाजातील सेवेतून कमी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या तसेच समाजाचे अन्य प्रश्न

 

सोडविण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अनुकूलता दर्शविली आहे.
सोलापूर येथील दौऱ्यात शासकीय विश्रामगृहात कोळी समाजाचे प्रतिनिधी पंचप्पा हुग्गे, सुधाकर सुसलादी, लक्ष्मण पापरकर, डॉ. सुभाष ननवरे, भारती कोटी, कमल ढसाळ यांच्या शिष्टमंडळाने श्री. पवार यांची भेट घेऊन कोळी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आपल्या व्यथा मांडल्या. गेल्या २४ जुलै रोजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी सर्व राजकीय पक्ष प्रमुखांच्या संमतीपत्राची मागणी केली. त्यानुसार काँग्रेस आणि राष्ट्रवादी वगळता अन्य सर्व पक्षांनी कोळी समाजाच्या प्रश्नाबाबत संमतीपत्र दिल्याचे निदर्शनास आणून दिले. सदर बैठकीच्या वेळी ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचीही उपस्थिती होती. श्री. पवार यांनी वस्तुस्थिती समजावून घेऊन प्रश्नाबाबत सकारात्मकता दर्शविली.
कोळी समाजातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात १५-६-१९९५ ची व्याप्ती २००५ पर्यंत वाढविण्यात यावी. तसेच जात पडताळणी समितीवर निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करावी. समितीचे कामकाज शासनाच्या विधी व न्याय खात्याअंतर्गत चालविण्यात यावे. या प्रमुख मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही कोळी समाजाच्या प्रश्नावर सहानुभूती व्यक्त केली. या वेळी मोहिते-पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे उपस्थित होते.